सरनोबतवाडी येथील तलावात सापडलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या काही तासातच करण्यात कोल्हापूर पोलिसांना बुधवारी यश आलं आहे. शांताबाई शामराव आगळे (वय ८०) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून याबाबत संतोष निवृत्ती परीट याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “आज सकाळी सरनोबतवाडी जवळील तलावात एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी शोधकार्य सुरु केले असता राजारामपुरी पोलीस ठाण्यात शांताबाई आगळे ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिच्या नातेवाईकांना मृतदेह, कपडे व इतर वस्तू दाखवल्या असता त्या शांताबाई यांचा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं. त्यावरून शोध घेतला असता संतोष परीट (वय ३५, रा. टाकाळा कोल्हापूर) याने खून केल्याची माहिती मिळाली. ताब्यात घेतल्यावर त्याने खून केल्याची कबुली दिली. परीट हा शांताबाई व परिवाराला ओळखत होता. कर्जबाजारी परीट याची नजर शांताबाईच्या सोन्याच्या दागिन्यांवर होती. देवकार्य करण्याच्या बहाण्याने त्याने शांताबाईंना आपल्या घरी आणले आणून ठार मारून दागिने काढून मृतदेह तलावात टाकला”.