वयाची साठी पार केली की आयुष्याचा सूर्यास्त डोळ्यासमोर असतो आणि सावल्याही लांब पडायला लागतात. नातवंडे, परिवार यातच दिवस पुढे ढकलणे इतकंच काय ते हातात असतं. मात्र काही जण याला अपवाद ठरतात. ‘जिंदगी चलने का नाम है’, हे त्यांचे ब्रीद असते, अशाच एक साठी ओलांडलेल्या शेतीप्रिय माणसाने गेल्या शंभर वर्षांपासून पडीक असलेल्या जमिनीला हिरवेगार केले. निवृत्तीनंतर ‘निवृत्ती’ने फुलवलेला मळा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

योग्य नियोजन आणि तांत्रिक मार्गदर्शन यासह शेतीवर असलेली निष्ठा यामुळे ही पडीक जमीन नव्या नवरी सारखी नटली आहे. हिरवा शालू पांघरलेले माळरान अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. साठी ओलांडललेल्या या व्यक्तीचं नाव आहे निवृत्ती भेंडे. निवृत्तीच्या वयात शेतीत त्यांनी दमदार पाऊल ठेवून अनेकांना धक्का दिला आहे. नेर तालुक्यातील लोहतवाडी या गावी असलेल्या त्यांच्या शेतीत त्यांनी सीताफळ शेतीचा प्रयोग केला आहे. दोन एकर शेतीत आता सहाशे झाडे डौलाने उभी आहेत.

जिद्द, परिश्रम, कामावरील निष्ठा यामुळे कोणतीही बाब अशक्य नसते हेच भेंडे यांनी सिद्ध करून दाखवले. निवृत्ती भेंडे यांचं वय ६५ वर्ष आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी वडिलोपार्जित शेतीत सीताफळ शेतीचा प्रयोग केला. यासाठी त्यांना नेर येथील चारुता नर्सरीचे संचालक सुरेश ठेंगरी व सीताफळ अभ्यासक रुपेश तिडके यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. या पडीक जमिनीत सीताफळ लागवडीचा आग्रह ठेंगरी आणि तिडके यांनी धरला. यात सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. परिणामी निवृत्ती भेंडे यांनी ही ओसाड जमीन फुलवण्याचा निर्धार पक्का केला. गेल्या शंभर वर्षांत ज्या जमिनीने कधी लागवड बघितली नव्हती ती जमीन गर्भार होण्याचे स्वप्न बघू लागली. जमीन कित्येक वर्षांपासून पडीक असल्याने तिथे नांगर लागत नव्हता. अखेर जेसीबीने जमीन खोलगट नांगरावी लागली. जमिनीतून दहा ते पंधरा किलो वजनाचे दगड निघू लागले. मात्र निर्धार कायम होता. डोळयात स्वप्न आणि मनगटात ताकद होती. म्हणूनच पाहता पाहता पडीक जमीन वहितीयोग्य झाली.

दोन एकर शेतीत सहाशे झाडे निवृत्ती यांनी लावली. पंधरा बाय पाच अशा अंतरावर ही झाडे बेड पद्धतीने लावण्यात आली. यासाठी सी गोल्डन ही जात निवडण्यात आली. दोन वर्षांपूर्वी लावलेली ही झाडे आता फळधारणा करू लागली आहे. एक फळ किमान अर्धा किलो वजनाचे होईल, असा अंदाज आहे. एका झाडाला कमीत कमी दहा किलो जरी फळे लागलीत तर पन्नास रुपये किलोने एक झाड पाचशे रुपयेचे उत्पादन देवू शकते, हा अंदाज आहे. यातून जवळपास तीन लाखांचे उत्पन्न होवू शकते. यंदा ही बाग प्राथमिक स्तरावर असून पुढील वर्ष पूर्ण ताकदीने उत्पादन हाती येईल असे भेंडे यांनी सांगितले. त्यांना तीन वर्षात दोन लाख रुपये खर्च येत आहे. त्यानंतर केवळ छाटणी आणि खते इतकेच काम शिल्लक राहणार आहे. अत्यंत अल्प पाण्यात सीताफळासारखे पीक शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारे आहे, असा विश्वास भेंडे यांनी व्यक्त केला.

निवृत्तीच्या वयात निवृत्ती भेंडे यांनी हे धाडस केले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग ही पिके शेतकऱ्यांना ना जगू देत ना मरू देत ! अशा स्थितीत सीताफळासारखी उत्पादने शेतीत घेतली तर निश्चितपणे समृद्धीची नवी वाट शेतकऱ्यांना गवसेल. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. अनेक तरुण आपल्या गावी परत आलेत. कोरोनाचे संकट ही सुद्धा नवी संधी आहे, असे समजून तरुणांनी शेतीत विविध प्रयोग केले तर विकासाचे दार उघडायला वेळ लागणार नाही.