युवा आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांचा सल्ला

नागपूर : फडणवीस यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात काय केले याचे आत्मचिंतन करावे, गरज पडल्यास बाबा रामदेव यांच्याकडे जावे, असा सल्ला काँग्रेस नेते व राज्याचे युवा आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

नागपूर जिल्ह्य़ात मंगळवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान झाले. केदार त्यासाठी सावनेर मतदारसंघात आले होते. त्यांनी पाटणसावंगी केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर वृत्तवाहिन्यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गडकरी आणि फडणवीस यांनी संपूर्ण ताकद लावली, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, फडणवीस यांनी पाच वर्षांत लोकांसाठी आणि पक्षासाठी काय केले. विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना का नाकारले, खुद्द फडणवीस यांचे मताधिक्य का कमी झाले,  याबाबत त्यांनी आत्मचिंतन करावे, गरज पडल्यास सहा महिन्यांसाठी बाबा रामदेव यांच्याकडे जावे.

जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीची सत्ता येईल. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेण्याचा किंवा न घेण्याचा प्रश्न आता उपस्थित होत नाही, असे सांगून त्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडी का झाली नाही, याबाबत बोलणे टाळले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याची परवागनी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून घेतली आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यांच्या मदतीला येणे आवश्यक असते, असे केदार म्हणाले.