21 April 2019

News Flash

स्वतंत्र अस्तित्व..?

मूल संध्याकाळी शाळेतून घरी येतं.

मूल संध्याकाळी शाळेतून घरी येतं. त्यावेळी आपल्याकडे पाहुणे आलेले असतात. त्यांच्यातलं त्याच्याबरोबरीचं पहिली दुसरीतलं मूल घरातल्या खेळण्याच्या लाकडी घोडय़ावर बसून खेळत असतं. आत आल्यावर डबा-दप्तर ठेवलं की, मुलाचं त्याकडं लक्ष जातं. ते लगेच त्या खेळण्यातल्या घोडय़ावर बसलेल्या मुलाच्या हातातला घोडा हिसकावून घेतं. घरातले त्याचे आईवडील आपल्या मुलाला बाजूला करायचा प्रयत्न करतात, कधी डोळ्यानं दटावतात, ‘खेळू दे की त्याला’, असं म्हणतात. सहसा मूल ऐकत नाही. ते त्या घोडय़ाजवळच हटून बसतं. ते म्हणत असतं, ‘हा घोडा माझा आहे.’ मूल हट्टी असलं आणि आलेल्यांनी, त्यांच्या मुलाला तो घोडा सोडून द्यायला सांगितला, तरी तेही तसंच बसून राहातं! मग बहुधा दोघाही मुलांना रागावलं जातं. चिडचिड, रडारड होते.

एरवी रोजही हे घरातलं मूल काही आल्याआल्या लगेच ते खेळणं खेळतं, असं नाही. त्याचं ते खेळणं हे रिकामं राहिलं तरी एरवी त्याला चालतं. पण, ते ‘त्याचं स्वतंत्र खेळणं’ असतं आणि त्याला ते तसंच हवं असतं. शाळेतही अनेकदा, ही विशिष्ट बाकडय़ावर, विशिष्ट ठिकाणी बसण्याची प्रवृत्ती, शिक्षकांना अडचणीची होऊन, एक तर त्यासाठी शाळेला काही नियम करावे लागतात, सक्ती करावी लागते. कारण त्यांच्या त्या जागा स्वतंत्र आणि ठरलेल्या असाव्या, असं त्यांना वाटतं.

बालपणी उपडं वळणारं लहान मूल केव्हा एकदा रांगायला लागेल आणि आपण स्वतंत्र होऊ, याची आई वाट पाहाते. ते रांगायला लागतं, त्याचा आनंद होतो. तोवर ते रांगल्यामुळं वस्तूंची ओढाओढी करतं. त्या विस्कटतं, कागद फाडतं. रांगतारांगता वस्तूंना डोकं आपटून भोकाड पसरतं. तरी आईला पुढे वाटतं, हे एकदा पायांवर उभं राहून स्वतंत्रपणे चालायला लागलं की, याच्यामागं हिंडावं लागणार नाही. त्याचा त्रास कमी होईल, उलट ते आपल्याला वस्तू न्यायला-आणायला मदत करील. त्यांतलं ते काही करतंही, पण आता उंच आणि स्वतंत्र झाल्यामुळं, ते आपली आपण इतर उलाढालही करतं. ते टीव्ही लावतं, कपाटावरचा गेम काढून खेळत बसतं, घरातून बाहेर पडून रस्त्यावर जातं. त्यालाही खेळात स्वातंत्र्य हवं असतं. त्याची तिचाकी सायकल घेऊन, त्याला आता मोठय़ांसारखं रस्त्यावरून ‘स्वतंत्रपणे’ जायचं असतं.

एका मर्यादेपर्यंत त्याचं स्वतंत्र होणं, मोठं होणं आनंदाचं वाटतं. पण दुसऱ्या बाजूला, आता त्याचा त्रास सुरू होतो. पुढे तोल सांभाळायला आल्यावर दुचाकी सायकल येते. त्याच्या दुचाकी सायकलच्या बरोबरीनं आपण रस्त्यावरून पळावं किंवा छोटी दुचाकी त्याच्या बरोबरीनं चालवावी, असं त्याला वाटतं. सायकल हातात आली की, ‘माझं मी येतो, तुमचं तुम्ही गाडीवरनं या’ असं सांगणं सुरू होतं, जे ऐकण्याशिवाय आता फार पर्याय उरत नाहीत. शिकतानासुद्धा त्याला त्याच्यापद्धतीनं त्याच्या बरोबरीच्या मुलामुलींनी निवडलेल्या शाळेत, क्लासला जायचं असतं. हे करीत असताना, मुलाला शिक्षणापेक्षा, आपण आता त्या निमित्तानं आठदहा तास स्वतंत्रपणे बाहेर राहू शकतो, याचा नकळत आनंद असतो. त्याला वाटतं की, एकदा हे शिक्षण संपलं आणि आपल्याला नोकरी लागली की, आपण ‘खरे स्वतंत्र’ होऊ, आईवडिलांच्या बंधनांपासून मोकळे होऊ.

नोकरीला लागतानाचा आनंद पशापेक्षाही आता आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य देईल, त्याच गावात न राहण्याचं, आपल्याला हवं तसं वाहन घेण्याचं, बाहेर फिरण्याचं, मनाप्रमाणं मित्रमंडळी जोडण्याचं – अशी ‘अनेक स्वातंत्र्यं’ मिळतील, याचा आनंद असतो. तोही थोडा फार मिळतो. पण आपण काय काम करायचं, ते आपले वरचे कुणीतरी साहेब ठरवतात, आपल्या मनाप्रमाणं आपल्याला हवं ते काम करता येत नाही. आपल्याला हव्या त्या पद्धतीप्रमाणं करता येत नाही. ते करण्याच्या अनेक नव्या किंवा चांगल्या असलेल्या कल्पना अमलात आणण्याचं स्वातंत्र्य नाही – अशा अनेक गोष्टी लक्षात येतात. त्यातून घरी आईवडिलांकडं राहावं लागत असेल तर, त्यांची जाण्यायेण्यावर, काय केलं ते सांगण्यावर, खर्चवेचावर – अशी अनेक बंधनं आपल्या स्वतंत्रपणावर येतात, असं सारखं वाटतं. अस्वस्थता राहते. ‘अस्वस्थता नेहमी एकाकी असते.’ त्यामुळं, ती कमी व्हायला, ओघानंच आपण आपल्या मनासारखा जोडीदार निवडावा, असं वाटतं.

असं केलं तर, मग आपल्यावर इतकी बंधनं येणार नाहीत किंवा साध्या भाषेत म्हणायचं तर, आज आपण जे दोन विरुद्ध एक आहोत ते दोन विरुद्ध दोन होऊन, तुल्यबळ तरी होऊ. मग अस्वस्थताही कमी येईल आणि आपलं स्वातंत्र्यही वाढेल, निर्णय घेता येतील. मोठय़ांच्या सांगण्यावर बंधनं येतील. आपल्या मनाप्रमाणं वागण्याचं स्वातंत्र्य आपल्याला अधिक मिळेल. लग्न तर होऊन जातं. काही महिन्यांनी लक्षात येतं की, आपण दोन विरुद्ध दोन होणार होतो, ते आता तीन विरुद्ध एक झालो आहोत. मग कधी त्यावर खासगीत चर्चा, खरं तर वादविवाद होतात. दोघांचंही म्हणणं अनेकदा एकच असतं. हा म्हणतो, तुम्ही तीनही एक आहात, मला एकटं पाडता. तर ती म्हणते, तुम्हीच तीन एक आहात, मला एकाकी पडायला होतं. शेवटी एकाच नेहमीच्या तडजोडीवर येतं की, आपण दोघं त्यापेक्षा स्वतंत्र राहू, म्हणजे दोघांनाही हा त्रास होणार नाही. आपल्या घरी आपण स्वतंत्रपणे ठरवू तसं जगू शकू. तिथं काही दिवसांनी कुठल्याही निर्णयाच्या बाबतीत, एक तर ‘मी काय म्हणत होतो किंवा मी काय म्हणत होते’ असं तरी सुरू होतं, नाही तर ‘मला काय करायचं ते मी करीन, तुला काय करायचं ते तू कर’ असं सुरू होतं.

हे तसं कोणाच्या विशिष्ट जीवनाबद्दल नाही. विशिष्ट त्रास, दु:ख, अस्वास्थ्य का, याबद्दल आहे. आपण पाहिलं असेल की, बसमध्येसुद्धा तीन सीटऐवजी दोन सीटची बाकडी आधी भरतात. त्यावर बसल्यावरसुद्धा शक्यतो ऐसपस बसून, इतर कुणी आल्यास त्यांना बाजूच्या सीट मोकळ्या आहेत अशी खूण करून, आपल्या सीटवर बाजूला सामान ठेवून, ती सीट शक्यतो आपल्यापुरती ‘स्वतंत्र’ राहावी, याच्या प्रयत्नात मनुष्य नकळत असतो. ऑफिसमध्ये आपण तसे किती वेळ असतो, पण तिथं बसण्याची आपली खुर्ची, तिची दिशा, कामाचा विभाग – हे तसंच स्वतंत्र असावं, असं वाटतं. देवळात कीर्तनाला-प्रवचनाला बसले तरी, त्या-त्या श्रोत्यांचे बसायचे खांब ठरलेले असतात. ना ते खांब त्यांचे असतात, तरीही यांना यायला उशीर झाला, दरम्यान कुणी तिथं बसलं, तर खरं तर उरलेल्या मोकळ्या जागी बसावं. पण मनातून त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्वच जणू पुसल्यासारखं वाटतं. त्यासाठी, आपापल्या खांबाजवळच्या लोकांना उठवून दुसरीकडं बसायला सांगणारे महाभाग कमी नाहीत. जिथं प्रतिष्ठा, पसा, सत्ता, पदं आहेत, तिथं तर ही ‘स्वतंत्र अस्तित्वाची’ वृत्ती ही ‘लढाईच’ होऊन बसते.

कृपया समजून घ्यावं की, निसर्गाला विविधता, डोंगरदऱ्या, पशुपक्षी, झाडं, माणूस – अशी स्वतंत्रता मंजूर असते. ती आढळतेही. तिचा त्रासही नसतो, ती उलट पूरक असते. लक्षात येईल ते हे की, निसर्गाला स्वतंत्रता ही वैविध्य म्हणून आनंददायी असली तरी, ‘अस्तित्व’ ‘स्वतंत्र’ करण्याचे कुठले अनैसर्गिक प्रयत्न चालत नाहीत. कारण, ‘अस्तित्वाचे आविष्कार स्वतंत्र असले तरी, अस्तित्व एकसंध आहे, एकच आहे.’ अस्तित्वात, जाणिवेत स्वतंत्रता, वेगळेपणा, श्रेष्ठ-कनिष्ठ असं काही नाही. अस्तित्वाला स्वतंत्र, वेगळं, श्रेष्ठ ठरवण्याचे सारे खेळ मनाचे असतात. तो विस्तारलेला अवाजवी अहंकार असतो, त्यामुळंच ते सारे सुखाचा भास वाढवीत नेतात आणि दु:खात टाकतात.

नदीच्या अस्तित्वातही हिमालयापासून सागरापर्यंत वाहात राहण्याचं, वाटेत असंख्य कार्य करण्याचं, पण ‘तेवढंच’ स्वातंत्र्य आहे. पण अस्तित्वाचे काठ सोडून जाण्याचं नाही, उलट निसर्गक्रमानं महासागर गाठून, उरलंसुरलं अस्तित्व विरघळवून टाकण्याचं ‘स्वातंत्र्य’ आहे. मग त्यामुळे, महासागराएवढं विशाल होण्याचा चिरंतन आनंदही सहजतेनं मिळून जातो. मात्र त्यासाठी, स्वातंत्र्याच्या सीमा, कार्य आणि अस्तित्वातलं ऐक्य, समानता जाणून जगावं लागतं. मग आनंद रोजचाच आहे आणि जगाचा निरोप घेतानाही आहे.

सुहास पेठे

drsspethe@gmail.com

First Published on December 2, 2017 1:09 am

Web Title: kathakathan by suhas pethe part 8