18 October 2019

News Flash

अंतर..!

असं का होत असावं, की मित्राचं पाच किलोमीटरवरचं घर

असं का होत असावं, की मित्राचं पाच किलोमीटरवरचं घर, आपण सहज जाऊन येऊ, असं वाटतं आणि पत्नीच्या भावाचं दोन किलोमीटरवरचं घर मात्र केवढा तरी वळसा वाटतो! ऑफिसमधल्या मित्राचं लग्न असलेलं कार्यालय, ‘अगदी दोन’ किलोमीटरवर वाटतं! पण तेच पत्नीच्या ऑफिसमधल्या कुणाचं लग्न असलेलं, अध्र्या किलोमीटरवरचं कार्यालयसुद्धा लांऽब वाटतं. हे घरात होतं, ऑफिसमध्ये होतं, नातेवाईकांच्यात होतं, मित्रामित्रांत, मत्रिणींच्यात होतं. मूळ भौगोलिक अंतरं तीच असून, ‘तसं’ का वाटतं?..

रविवारचा दिवस. सर्वाना सुट्टी असल्यामुळं मुलांना उठवण्याची, शाळेत पाठवण्याची गडबड नाही. एरवी स्वयंपाकघरात चहा-कॉफीपुरता वेळ देऊन पटकन आवरायला जावं लागतं, तेही आज नाही. त्यामुळं उशिरा उठून, कॉफीचे कप हातात नुसतेच घेऊन, पती-पत्नीच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. आठवडय़ाभरात गडबडीमुळं राहून गेलेला नव्या वस्तूच्या खरेदीचा विषय. ती आणायला आज मुहूर्त मिळेल यावर एकमत झालं. आज लवकर बाहेर पडून वस्तूची पुन्हा एकदा चौकशी करू, वाटलं तर अजून पाहू. ती केव्हा घरपोच होईल याची चौकशी करून संध्याकाळपर्यंत परतू. असा सगळा संवाद उत्साहानं, एकमतानं ठरत ठरत चाललेला होता. त्यातच संध्याकाळपर्यंत घरी परतलं तर चालणार असेल, तर मग घरच्या नाश्त्याला, स्वयंपाकाला सुट्टी देऊन, बाहेर जेवूनच घरी परतू, हेही ठरलं.

इतक्यात दरवाजावरची बेल वाजली. दोघांनी एकमेकांकडं बघितलं. चटकन उठून दार उघडायला जाणाऱ्या पतीला पत्नीनं खुणेनंच थांबवलं. इतका वेळ एकमनानं, समरसपणे चाललेल्या संवादाला ब्रेक लागला. पत्नीनं हळू आवाजात सांगितलं, ‘आज तरी काही लगेच उठून दरवाजा उघडायला जाऊ नका. बेल कुणाची आहे, ते मला माहितीच आहे.’ त्यालाही हे माहीत होतं, ती शेजारच्या काकांची असणार. त्यांचं तसं काही कामही नसणार. ते येणार, वृत्तपत्र वाचणार, गप्पा मारणार, मग पत्नीच्या मूडनुसार चहा किंवा चहा-नाश्ता दोन्हीही मिळणार.

आत्ताही तिच्या चेहऱ्यावर तेच भाव होते, ‘आत्ता तरी लगेच काही जाऊ नका. आज रविवार आहे, उठलो नाही, म्हणून ते परत जातील. असं काही कुठून लांब अंतरावरून ते आलेत का? िभतीपलीकडं तर ते राहतात. येतील पुन्हा तासाभरानं!’ सकाळी उठल्यापासून एकमनानं आणि सोबतीनं चाललेली गाडी आता अडखळली होती. त्याला वाटत होतं, जाऊ दे, आपले एके काळचे ऑफिसमधले साहेब आहेत, शेजारी आहेत. ते निवृत्त आहेत, हे खरं. पण म्हणून दारसुद्धा उघडू नये, हे योग्य नाही. आपली गडबड असेल तर बोलणं उरकतं घ्यावं, सांगावं. त्याला अनुभवानं हेही माहीत होतं, हे सारं तिला सांगून काही पटणार नाही. पुन्हा शब्दानं शब्द वाढणार. ती म्हणणार, तुम्हाला हे सांगणं जमणार नाही. सुट्टीचा दिवस म्हणून ते काही समजून लवकर हलणार नाहीत. एकदा चहापाणी मागं लागलं, की पुढचा सबंध सुट्टीचा दिवस ‘असाच’ जाणार.. पण त्याची पावलं दाराकडे वळलीच आणि तिची कट्टय़ाकडं! दोघंही त्या अर्थानं घरातच होते. तो बाहेर गेल्यामुळं फार झालं तर पाच-दहा फुटांवर, पण मनातलं अंतर मात्र शेदोनशे फूट लांब गेलं होतं..

हा तसा छोटासा, कधीही, कुठंही घडणारा प्रसंग आहे. वास्तविक पाहाता, आपल्याला लहानपणापासून ‘अंतर’ शब्द दोन ठिकाणांमधलं भौगोलिक अंतर या अर्थानं परिचित आहे. शाळा एक फर्लागभर अंतरावर असली आणि ती नावडती असली, तर ते अंतर मुलांना चालायला जड जातं, खूप वाटतं. इतर मुलं किती अंतरावरून येतात- असलं काही सांगून फारसा उपयोग होत नाही. त्यामुळं आईवडिलांना या फर्लागभर अंतरावरच्या शाळेतसुद्धा मुलांना गाडीवरून सोडावं-आणावं लागतं.

आपल्याला विरंगुळ्यासाठी कुठं चार-आठ दिवस बदल म्हणून, कौटुंबिक सहल म्हणून जायचं असेल, तर उलट मनुष्य जवळच्या अंतरावरचं ठिकाण शोधण्यापेक्षा आधी दूरच्या अंतरावरचं, चांगलं ठिकाण निवडतो. एरवी कामासाठी जवळच्या ठिकाणाच्या शोधात असलेला माणूस असल्या बाबतीत मात्र अधिक लांबचं अंतर निवडतो असं आढळेल.

घरातून कार्यालयात जायचं असेल किंवा असं सहल म्हणून कुठं शेकडो मल जायचं असेल कुठल्या तरी मार्गानं त्या त्या अंतरावरच्या ठिकाणी जायला लागणारा वेळ मात्र, कमीत कमी करण्याचा माणसाला प्रयत्न असतो. एखाद्या दुचाकीपासून विमानापर्यंत, त्या त्या अंतराप्रमाणं आपली वेळेची बचत करण्याची गरज, आर्थिक कुवत- याप्रमाणं मनुष्य वाहनांचे पर्याय काढतो. रेल्वेनं दोन दिवस चालणारा, प्रवास विमानानं दोन तासांत संपवून, तो मोकळा होतो.

यात तो आठ दिवसांचं-दोन दिवसांचं भौगोलिक अंतर दोन तासांवर आणीत नाही. पण त्या प्रवासाचा, वेळेचा त्रास वाचवून तो मात्र दोन तासांवर आणतो. इथं विचार करण्यासारखं हे आहे, की भौगोलिक अंतर हे तर तेवढंच राहाणार आहे. खेडी, गावं, शहरं सारे तितक्याच अंतरावर राहणार आहेत. आपल्याला आपल्या गरजांनुसार, त्या त्या गावी जावं-यावंही लागणार आहे. व्यवहार असो, कार्य असो, विरंगुळा असो की आणखी काही. मग अंतरात फरक करण्याचा प्रश्न तर येणार नाही. ते आहे तसंच स्वीकारावं लागतं. उरतो पर्याय, तो आपण पाहिला तसा वेळ-त्रास कमी करणाऱ्या वाहनाचा. तेही तसं मर्यादितच असतं.

मग असं का होत असावं, की आपल्या जिवलग मित्राचं पाच किलोमीटरवरचं घर, आपण जाता-येता सहज जाऊन येऊ, असं वाटतं आणि पत्नीच्या भावाचं दोन किलोमीटरवरचं घर म्हणजे, मात्र केवढा तरी वळसा वाटतो! पुढच्या रविवारी गेलं तर नाही का चालणार, असं का म्हणावंसं वाटतं? बरं, हे एवढय़ा बाबतीतच होतं असं नाही. आपल्या ऑफिसमधल्या जवळच्या मित्राचं लग्न असलेलं कार्यालय, हे इथं ‘अगदी दोन’ किलोमीटरवर आहे, असं नकळत वाटतं! त्यात काही मोठं अंतर आहे, असंसुद्धा वाटत नाही. पण तेच पत्नीच्या ऑफिसमधल्या कुणाचं लग्न असलेलं, अगदी अध्र्या किलोमीटरवरचं चौकातलं कार्यालयसुद्धा लांऽब वाटतं. आता एवढं लांब कधी जायचं, मग तिथं गर्दी असणार, पार्किंगचा प्रश्न आहे, आपल्याला खूप वेळ होईल – असे, जवळजवळ ते जाणं रद्द करणारे, विचार मनात का येतात?

हे घरात होतं, ऑफिसमध्ये होतं, नातेवाईकांच्यात होतं, मित्रामित्रांत, मत्रिणींच्यात होतं. मूळ भौगोलिक अंतरं तीच असून, आता हे सोपं, सहज, जवळ, जाता जाता – ‘असं’ काही बाबतीत वाटणारं अंतर – एरवी मात्र कधी कधी, एवढय़ा लांब कुठं जायचं, गर्दी खूप असतं, जायला वेळ होईल, रस्ता कऽस्सला आहे – असं तेच अंतर, ‘तसं’ का वाटतं? उघड आहे की, आता असं वाटणं भौगोलिक अंतरांवर नाही. कारण ती तर तशीही बदलता येत नाहीतच. दुचाकी, चारचाकी, रेल्वे, विमान – असे अंतरं गाठायला लागणारा वेळ आणि त्या अर्थानं अंतरं कमी करणारे वाहनांचे आपण मार्ग काढले, त्याचा उपयोगही करतो. पण त्यापलीकडची तशी अजून काही विद्या, क्षमता आपल्याजवळ आहे. ती म्हणजे आपुलकी, आत्मीयता, प्रेम!

ती असली, वापरली, तर तीच अंतरं एका वेगळ्या अर्थानं कमी करण्याचं सामथ्र्य त्यात आहे. उलट त्यांचा अभाव असला – दुरावा, संबंधातला कोरडेपणा – अशा गोष्टी असल्या, की तीच अंतरं वेगळ्या अर्थानं वाढवण्याचं आणि त्रासदायक करण्याचं सामथ्र्यही या मनाच्या क्षमतांत आहे. आपल्याला त्या क्षमतांची जाणीव नसली, तरी त्या आपल्या आपल्या पद्धतीनं काम करीतच असतात. म्हणून सुरुवातीला म्हटलं तसं, सुट्टीच्या सकाळचा, आणायच्या वस्तूतल्या एकमताचा आनंद होता, तोपर्यंत हे मानसिक अंतर नव्हतं. असं अंतर नसतं तेव्हा आनंद असतो, तोही होता. पण एकदा बेल वाजण्याचं निमित्त झाल्यावर विचारांत, करायच्या कृतींत, मतांत – अंतर वाढत चालल्यावर, हाच आनंद कमी होत गेला. हे कसं आणि का घडतं, याची जाणीव नसली, तर मन आपला उद्योग नकळत करीत राहातं आणि सुट्टीचा सगळा दिवसही वाईट घालवू शकतं.

म्हणून आपल्याच हितासाठी, आनंदासाठी हे ओळखून राहावं, की भौगोलिक अंतर कायम राहातं, ते अंतर गाठायला लागणारा वेळ, शक्य असेल तेवढं अधिक चांगलं वाहन वापरून, कमी करता येतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतर कायम असलं, वाहन कुठलंही असलं तरी निरपेक्ष स्नेहानं, आपुलकीनं, प्रेमानं कुठलंही अंतर, कितीही कमी करता येतं आणि जितकं कमी करता येईल, तेवढा आनंद वाढत जातो!

सुहास पेठे

 drsspethe@gmail.com

 

 

First Published on June 3, 2017 4:29 am

Web Title: kathakathan by suhas pethe sunday holiday