News Flash

गृहीत धरून जगताना..!

आपलं आयुष्य, अगदी दैनंदिन जीवनही अनेक गोष्टी गृहीत धरून-गृहीतकांवर चालतं.

आपलं आयुष्य, अगदी दैनंदिन जीवनही अनेक गोष्टी गृहीत धरून-गृहीतकांवर चालतं. साध्या बोलीभाषेत आपण एखादी गोष्ट गृहीत धरून, मानून पुढचा व्यवहार करतो, तेच हे गृहीतक! अशी गृहीतकं आपल्याला आयुष्यात मदत करतात, पण वेळी नुकसानही घडवून आणतात. बरं, ती अजिबात टाळावी तर तेही शक्य नसतं. म्हणून त्यावर थोडा वि करू या.

गृहीतकं ही आपल्या मनात इतकी मुरलेली असतात की, ती वेगळी आठवून आपण कुठला व्यवहार करतो, अशातलाही भाग नाही. आपल्या व्यवहारांमागं अनेक गृहीतकं काम करीत असतात, हे विचार केला तर लक्षात येईल. त्यांच्याविषयी सावध नसल्यामुळं अनेकदा अनपेक्षित घटना, ठरलेली कामं न होणं, अपयश, समज- गैरसमज – अशा अनेक गोष्टींना ती कारणीभूत ठरतात. त्यामुळं हा विचार गरजेचा आहे.

ऑफिसमध्ये एखाद्याबरोबर अनेक र्वष काम केलेलं असतं. स्वभाव माहिती असतात, विश्वास असतो. एकमेकांची कामं केलेली असतात. एखाद्या दिवशी आपण आजारपणामुळं घरी असतो. एखाद्या माणसाचा कामासाठी फोन येतो. त्याला माहिती असतं की, हे काम एरवी एकदोन दिवसांनी होईल. पण आपल्याला सांगितलं तर, आपण त्याची निकड लक्षात घेऊ आणि ते शक्यतो लगेच करू. आपण आज ऑफिसला जाणार नाही, हे कळल्यावर तो मनुष्य उद्या येतो, असंही सांगतो. पण ऑफिसमधले सहकारी काम करतील, हे गृहीत धरून आपण आत्मविश्वासानं सांगतो, ‘तुम्ही काळजी करू नका. त्या अमक्यांना भेटा, मी नसलो तरी, मी सांगितलं आहे म्हणून सांगा, ते तुमचं काम अवश्य करतील.’ तो मनुष्य उत्साहानं जातो. त्यांना भेटतो. पण त्यांचा प्रतिसाद तर लगेच मदत करण्याचा नसतोच. उलट ‘उद्या या’ या पद्धतीचा असतो. तो परत गेल्याचं कळतं. आपण एवढय़ा खात्रीनं होईल म्हणून सांगितलेलं काम सहकाऱ्यांनी केलं नाही, याचा थोडा रागही डोक्यातून जात नाही. त्यांची चूक आहे, असं वाटत राहातं.

मूळ चूक आपल्याकडेच असते. ती घडायला कारणीभूत असतं, ते ‘त्यांचे आपले एवढे संबंध आहेत, तर ते हे काम नक्की करतील’ हे ‘गृहीतक’! कालच नव्हे तर, कालपर्यंत जर माणूस तसा वागला तर, आज तो आपल्याशी, इतरांशी तसाच वागेल, असं आपण गृहीत धरतो. ते खरं ठरलं नाही म्हणून त्रास होतो. हे एवढंच नाही तर, कालपर्यंत जरी माणूस आपल्याशी जसा वागला, तसाच तो आज वागेल, असंही गृहीत धरण्यात अर्थ नसतो. कदाचित, त्याची आजची भूमिका वेगळी असू शकते. त्याची कारणं तशी साधी असली किंवा पारदर्शकता असली तर, आपल्याला काही वेळा कळतात. पण अनेकदा ते घडत नाही आणि समज- गैरसमज मनात मूळ धरतात, ते एका खोल रुतलेल्या काटय़ासारखे. कधी विरघळले, कधी प्रसंगानं निघाले तर, पुढं तो त्रास कमी होऊ शकतो. पण ते घडलं नाही तर, आतच राहिलेला काटा नुसतं कुरूपच निर्माण करीत नाही तर, कायम सलत राहणारं दुखही आपल्यामागं लावून देतो.

याच उदाहरणात थोडं पुढं गेलं तर, असंही घडू शकतं की आपण सांगूनही त्या सहकार्यानं आपल्या माणसाचं काम केलं नाही, याची त्याला जाणीव असते! कधीतरी तो ती जाणीव, क्षमा मागून चांगल्या शब्दांत व्यक्तही करतो. त्यानं तशी वेगळी भूमिका का घेतली, याचीही आपल्या लक्षात न आलेली कारणं तो आपल्याला समजावून सांगतो. त्यांत पूर्वी त्या व्यक्तीचा त्याला चांगला अनुभव आलेला नसतो, कुठं कधी त्याची अरेरावी, स्वभाव, झालेली फसवणूक- अशा काही गोष्टी त्याच्या लक्षात असतात. कधीकधी काही कारणं तशी साधी असतात. पण प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणं ती मनावर घेतली जातात. असंही कळतं की, ते सहकारी तिथं असताना, काम करायला तयार असतानासुद्धा, त्यांना डावलून ती व्यक्ती दरवेळी आपल्याकडं येते, एवढंसंही कुठं त्यांच्या मनात राहून गेलेलं असतं. अशी विघातक गृहीतकं टाळण्यासाठी असं करावं की, आत्मविश्वासानं ते तुमचं काम करतील असं म्हणण्याऐवजी, कुठलं गृहीतक मनाशी न धरता, ‘त्यांना भेटून विनंती करा, वाटलं तर मी फोन करतो, काम होतंय का पाहा!’- असं मोकळेपणानं सांगितलं तर, पुढचा बराचसा त्रास वाचेल.

माणसं जर आणखीच बेसावध असतील, गृहीतकांच्या या दुसऱ्या गफलती घडवण्याऱ्या बाजूची त्यांना कल्पना नसेल तर, अशी माणसं ठामपणे हे काम होईल, ते घडेल, तुम्ही अमक्यांना भेटा, ते काय सहज होईल – असं म्हणताना आणि तशा समजुतीत वावरताना आपल्याला दिसतील. असली गृहीतकं ही अर्थातच, अनेकदा भ्रामकच असल्यामुळं खरी ठरत नाहीत. त्या माणसाची निराशा होतेच, पण त्यांचा आपल्या शब्दांवरचा विश्वासही उडायला ती कारणीभूत ठरतात. गृहीतकांच्या बाबतीतल्या या दोन्ही बाजूंचं खरेपण आपण आपल्या, इतरांच्या आयुष्यातल्या घटनांवरून जरूर तपासून घेऊ शकतो.

मग गृहीतकांशिवाय जगलं तर चालेल का? तर तेही तसं पूर्णपणे शक्य नाही. आधी म्हटलं तसा आपला बराचसा व्यवहार एक प्रकारे गृहीतकांवर चाललेला असतो. म्हणजे असं की, जगताना काही अनुभव येतात. त्यानुसार विचारांचा आकार तयार होतो. तो स्मरणात राहतो. त्यावरून स्वाभाविकच, आजच्या किंवा भविष्यातल्या गोष्टी आपण ठरवतो. हे लक्षात घेण्याची गरज आहे की, त्यांतले काही भाग तांत्रिक असतात. तशा स्वरूपाची गृहीतकं आज किंवा भविष्यातही उपयोगी पडू शकतात. एक अधिक एक किंवा पाच गुणिले चार हे शिकल्यावर, मेंदूनं साठवलेलं उत्तर पुढं बदलत नाही, त्यानुसार सोडवत गेलेली किचकट गणितांची उत्तरंही बरोबर येतात, अपेक्षेप्रमाणं असतात.

अधिक पाहिलं तर, माणसाचा इतर संबंधातला व्यवहार, मंडईतल्या नेहमीच्या भाजीवाल्याकडून येणाऱ्या भाजीच्या बिलाचा अनुभव, त्यातलं गणित गृहीत धरल्याप्रमाणं बरोबर येतंच, पण पूर्वीप्रमाणेच आजच्या भाजीचा दर्जा तसाच असेल, असं गृहीत धरणं कदाचित चूक ठरू शकतं. कमी दर्जाची भाजी मिसळली जाऊ शकते, दुसरी एखादी भाजी आपल्याला नको असली तरी, शिल्लक आहे म्हणून, तिची भलावण करून आपल्या पदरात टाकली जाऊ शकते. एरवीचा त्यांच्याशी असलेला व्यवहार गृहीत धरण्यावर बरोबर चालला असला तरी त्यांची मर्यादा लक्षात घेऊनही वागावं लागतं.

यात गृहीत धरण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी आणि आपली सावधानता यांचा मेळ घालावा लागतो.

घर बांधायला निघाल्यावर ते अमुक दिवसांनी पूर्ण होणार, वर्षांअखेर परीक्षा होणार, अभ्यास केला की पास होणार, चालायला लागल्यावर आपण ठरलेल्या ठिकाणी पोचणार, विशिष्ट पसे मिळाले की आपल्या गरजा पूर्ण होणार- अशा असंख्य गृहीतकांवरच आपला व्यवहार रोज करता येतो. ती गृहीत न धरली तर, व्यवहारही अवघड होईल. जगण्याला, व्यवहाराला गृहीतकांची गरज आहे, तशीच ती त्यांच्या मर्यादा ओळखण्याचीही आहे.

काळ्या ढगांनी आकाशात दाटी केली, म्हणजे आता प्रचंड पाऊस पडणार, हे जरी काही पूर्वीच्या अनुभवांवरून गृहीत धरलं असलं तरी, पुढची जी पळापळ – कामांतले घाईगर्दीचे बदल आपण करतो, ते तसे करावे लागतीलच, असं नसतं. कारण, गृहीतकांच्या पलीकडे निसर्गही वागू शकतो आणि माणूसही! हे लक्षात असेल तर, मनुष्य दोन्ही गोष्टींच्या तयारीत राहील पण, गोंधळून चुका करणार नाही, धावपळ उडवणार नाही, अस्वस्थ होणार नाही. कारण, जोराचा वारा सुटून काही वेळात ते सारे ढग निघून जातात. पाऊसही पडत नाही. तसंच, आज माणूस चांगला आहे, उद्या असेल पण असेलच असं नाही, हे जसं खरं, तसंच तो आज वाईट आहे म्हणून उद्या वाईट असेल असंही नाही. तीच गोष्ट कामं, व्यवहार, संबंध, नातेवाईक, आयुष्यातल्या घटना- अशा असंख्य बाबतीत असते.

आपल्याला जगताना गृहीत धरण्याची गरज आणि त्यांच्या मर्यादा यांची जर सतत सावध जाणीव असेल तर, आपण स्वस्थ राहू शकू. कुठलीही गोष्ट शांतपणे घेऊ शकू!

सुहास पेठे

drsspethe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:20 am

Web Title: never take someone for granted
Next Stories
1 वाळूतल्या रेघोटय़ा
2 अनिश्चितता!
3 हातचा..!
Just Now!
X