13 August 2020

News Flash

मुलगी शिकली प्रगती झाली

हल्ली मुलांना शेती करायला आवडत नाही.

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे. एक आई आपल्या मुलाचा जसा अभ्यास घेईल तसा कोणत्याही शिकवणीवर्गात घेतला जाऊ शकत नाही. कारण सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगलं वागणं, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. पुस्तकी ज्ञानाबरोबर समाजात वावरण्याचे धडे मुलांना तिच्याकडून मिळतात. सगळ्याच दृष्टीने सशक्त पिढी ती तयार करते. शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळते, जे इतर अनेक स्वातंत्र्यांशी निगडित असते.
स्त्रीशिक्षणाचं महत्त्व जोतिबा फुलेंनी दीडशे वर्षांपूर्वी ओळखलं होतं. १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली, आपल्या पत्नीला, सावित्रीबाईंना सुशिक्षित करून त्यांना ती चालवायला दिली. महर्षी कर्वेनी क्षेत्रात किती आणि काय कार्य केले ते सर्वश्रुत आहे. आपण २१ व्या शतकात राहणाऱ्यांनी शहरांपासून दूर असलेल्या गावात, खेडोपाडी, आदिवासी वस्त्यांमध्ये मुलींच्या शिक्षणाला मदत केली पाहिजे. सध्या तरुण पिढी या कामासाठी पुढे सरसावली आहे. काही अडचणींमुळे शाळा नीट चालत नाहीत, तेथील समस्यापूर्तीसाठी दानशूर, आपण समाजाचे ऋण थोडे तरी फेडूया असा विचार करणारे मदत करतात. सोयी उपलब्ध करून देतात. त्यामुळे मुली शिक्षणाबरोबर आवडत्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवू लागल्या आहेत.
शिक्षणाविषयी उत्सुकता असणारी एका आश्रमशाळेत भाकरी करणारी महिला पिठामध्ये अक्षरे गिरवून लिहायला, वाचायला शिकली. ती पाडय़ावरील महिलांना स्वच्छतेचे धडे देते. अक्षरओळख करवते. विक्रमगडजवळ एका आश्रमशाळेला भेट देण्याचा योग आला. बारावी कॉमर्स केलेली, पण पुढे परिस्थिती अनुकूल नव्हती म्हणून पुढे तिला शिक्षण घेता आले नाही. ती म्हणाली, तुमच्यासारख्यांकडून मी स्वच्छता, शुद्ध बोलणे, सर्वाना मानाने वागविणे हे शिकले. आता माझ्या मुलीला मी हेच शिकवते. ‘‘तिला भरपूर शिक्षण देणार आहे मी.’’ आश्रमशाळेला ती माहेर मानते. तिला जे जमेल ते शाळेतील मुलींना रविवारी येऊन शिकवते. तिच्या कामाचे मोल घरच्यांनी जाणले आहे, म्हणून त्यांचा तिला पाठिंबा आहे.
हल्ली मुलांना शेती करायला आवडत नाही. साताऱ्याजवळच्या गावात वडिलांची पंधरा एकर जमीन असलेला सूर्या असाच मुलगा. त्याला कोणत्याही अभ्यासाचा कंटाळा. पण कष्ट करायला तयार. त्याच्या बहिणीने ठरवले की, शेतीतून चांगलं उत्पन्न मिळू लागलं तर भाऊ शेतीत लक्ष घालेल. पुण्याच्या शेतकी विद्यालयातून पदवी घेण्याचं तिनं ठरवलं. पण वसतिगृहाचा खर्च बाबांना झेपणार नाही हे माहीत होतं. कर्ज काढून, प्राध्यापकांच्या मदतीने अर्धवेळ नोकरी करून तिने पदवी मिळवली. भावाला हाताशी धरला. इतर शेतकरी बांधवांच्या मदतीने तिनं शेती उत्पन्न दुप्पट केलं. सूर्या मार्गाला लागला, पैसे मिळू लागले. आई-वडील आनंदले. तिला लग्नाविषयी विचारू लागले. ती म्हणाली, ‘‘शेती असलेल्या मुलाशी मला लग्न करायचं आहे. आणखी एका कुटुंबाची प्रगती मी करेन.’’ हा आत्मविश्वास तिला शिक्षणाने दिला होता. ‘कोणत्याही क्षेत्रातील शिक्षणाचा उपयोग मुली कुटुंबासाठी करतात, म्हणून मुली जगवा, त्यांना शिकवा, सर्वाची प्रगती करा.

गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2016 1:25 am

Web Title: article about girl education
Next Stories
1 दु:खाशी दोन हात
2 अनुपम्य सुख सोहळा रे
3 करावे मनाचे
Just Now!
X