22 January 2018

News Flash

ये शाम मस्तानी..!

राजा-राणी आनंदात राहू लागले, मात्र माझ्या ओटीत काही प्रश्न टाकून!

डॉ. नंदू मुलमुले | Updated: April 21, 2017 11:12 AM

राजा-राणी आनंदात राहू लागले, मात्र माझ्या ओटीत काही प्रश्न टाकून!

कुणी तरी सुरेखाला गाणं म्हणायची फर्माईश केली. तिने ‘ये शाम मस्तानी’ म्हणते असे म्हणेपर्यंत अश्विनने ‘तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा म्हण ना’ असा आग्रह धरला. ‘छान म्हणते हं, माझं आवडतं,’ अशी शिफारसही करून टाकली. एक क्षण अस्वस्थ झालेल्या सुरेखानं स्वत:ला सावरलं अन् ‘खानदान’मधलं नूतनच्या तोंडचं, राजेंद्र कृष्णचं लिहिलेलं गाणं काहीशा अनिच्छेने सुरू केलं, ‘मैं हू एक छोटीसी माटी की गुडिया, तुम्ही प्राण मेरे, तुम्ही आतमा हो..’

जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिकांच्या तोंडची बहुतांश गाणी पुरुष-गीतकारांनी (अगदीच एखाद दुसरा अपवाद) लिहिलेली आहेत याची तीव्र जाणीव मला त्या दिवशी, त्याक्षणी झाली!

प्रसंग कौटुंबिकच होता. अश्विन माझा डॉक्टर-कम-बिल्डर मित्र, त्याची बायको सुरेखा. त्याच्या फ्लॅट-स्कीमचा शुभारंभ झाला त्यानिमित्त त्यानं छोटी कौटुंबिक पार्टी ठेवली होती. सुरेखाचा आवाज चांगला, त्यात जुन्या चित्रपटांची तिला प्रचंड आवड. महाविद्यालयीन जीवनाच्या गप्पा रंगल्या तशी तीही रंगात येऊन सांगू लागली. राजेश खन्ना तिचा वीक पॉइंट. कॉलेजला कलटी मारून पावसात भिजत पाहिलेला ‘दो रास्ते’, सात वेळा पाहिलेला ‘आराधना’, ‘कटी पतंग’, ‘दुष्मन’ आणि इतर अनेक. लग्न होता होता राजेश खन्नाची लाट ओसरली, तरी तो आवडता होताच. मग ‘नमक हराम’ आला. ‘आणि मग?’ कुणी तरी सुरेखाला विचारलं. तिला काय म्हणायचं होतं ते शब्द जुळवेपर्यंत अश्विन पटकन म्हणाला, ‘मग मी तिचा हिरो झालो!’ सुरेखा कसंनुसं हसली हे मी टिपलं. ‘मग काय, हेच माझे हिरो!’ त्या ‘मग काय’मध्ये इतकं काही होतं, ते सांगता येत नव्हतं. कुणी तरी सुरेखाला गाणं म्हणायची फर्माईश केली. तिने ‘ये शाम मस्तानी’ म्हणते असे म्हणेपर्यंत अश्विनने ‘तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा म्हण ना’ असा आग्रह धरला. ‘छान म्हणते हं, माझं आवडतं,’ अशी शिफारसही करून टाकली.

एक क्षण अस्वस्थ झालेल्या सुरेखानं स्वत:ला सावरलं अन् ‘खानदान’मधलं नूतनच्या तोंडचं, राजेंद्र कृष्णनी लिहिलेलं गाणं काहीशा अनिच्छेने सुरू केलं, ‘मैं हू एक छोटीसी माटी की गुडिया, तुम्ही प्राण मेरे, तुम्ही आतमा हो..’ प्रसंग संपला. मी विसरूनही गेलो. वर्षभरानंतरची गोष्ट, मला सुरेखाचा फोन आला, ‘प्लीज घरी याल का? मला तुमची मदत हवीय.’ वेळ रविवार संध्याकाळची, ‘ये शाम मस्तानी’ची! मी विचार करीतच गाडी काढली.

सुरेखा-अश्विन माझे कौटुंबिक मित्र. सुरेखा व्यवसायाने ब्युटिशियन, मात्र तिच्या छंदामुळेच माझी तिची जास्त ओळख. चौफेर वाचन असलेली, जुन्या सिनेसंगीताची माहीतगार असलेली सुरेखा कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही उत्तम करी. जुन्या मराठी गाण्यांचा तिचा मोठा संग्रह होता. सुरेखाचा नवरा अश्विनही माझा जुना मित्र. थोडा तिरसट स्वभावाचा अश्विन ‘गणिती हुशार’ होता. सहसा डॉक्टरमंडळीत अभावाने आढळणारा व्यापार-व्यवहार गुण त्याच्याकडे होता. वैद्यकीय व्यवसायातून मिळणारा पैसा त्यानं रिअल इस्टेटकडे वळवायला सुरुवात केली, त्या क्षणी त्याच्यातला सुप्त बिल्डरही जागा झाला. त्यामुळे डॉक्टरकीच्या क्षेत्रात तो अग्रेसर नसला तरी त्याच्या उत्पनाची आकडेवारी डोळे दिपवून टाकणारी होती. सुखसमृद्धीची एकेक पायरी चढत जाणारं हे कुटुंब, त्यात माझी- एका मनोविकारतज्ज्ञाची गरज का पडावी?

प्रश्नाचं उत्तरही मला लवकरच मिळालं. सुरेखा एका दडपणाखाली असल्यासारखी हलक्या आवाजात सांगू लागली, ‘‘अश्विन डिस्टर्ब झालाय. तो वरच्या स्टडी रूममध्ये एकटाच बसलाय दारू पीत. हल्ली रोजच घेतो. बेचैन असतो. सारखा संतापतो. ‘तुम्हाला माझी कदर नाही, माझ्या मन:स्थितीची फिकीर नाही, या जगात कुणीच माझं नाही’ असे मेसेज मला, मुलाला, नव्या सुनेलाही करीत राहतो.’’ कारण? माझा प्रश्नार्थक चेहरा पाहूनच तिने खुलासा केला, ‘‘त्याला मोठा आर्थिक फटका बसलाय!’’

अश्विन आजवर फ्लॅट, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करायचा. त्यात त्याने प्रचंड पैसे कमावले होतेच. कुणी तरी त्याला सांगितले की बिल्डर व्यवसायात प्रचंड पैसा आहे. त्याने एका बिल्डरसोबत भागीदारी केली. कागदोपत्री हे सगळं उत्तमच होतं. करोडोचा नफा होता. पण मध्यंतरी मंदी आली. सगळी गणितं कोलमडली. बिल्डरशी रोज वादावादी होऊ  लागली. त्यात अश्विनचा स्वभाव तिरसट. रोजची फोनवर आरडाओरडी. मग अश्विनची तणातणी. सुरेखाला हे सारं असह्य होऊ  लागलं.

‘‘मी कित्येकदा सांगितलं त्याला, तुझा या उद्योगात टाकलेला सारा पैसा बुडाला तरी आपण आनंदात राहू इतकं आहे आपल्याकडे. पण तो म्हणतो, हे बोलायला ठीक आहे, पण पाच कोटींचं नुकसान सोसून मला झोप येईल का रात्री?’’ सुरेखानं उसासा टाकला. जिन्यात अश्विनची पावलं वाजू लागली. बायकोनं मनोविकारतज्ज्ञाला घरी बोलावलं हे त्याला आवडलं नव्हतं. एरवी मला गप्पा मारायला मुद्दाम घरी बोलावणाऱ्या अश्विनचा आता इगो दुखावला होता.

‘‘माझ्या अक्कलहुशारीनं कमावलेला पैसा असा बुडत असताना यांना राहवतं कसं? कुणासाठी करतो मी हे सगळं?’’ अश्विनचा बिनतोड सवाल. खरं तर या मन:स्थितीपुरती मी अश्विनची बाजू समजून घेतलीही असती. पण प्रश्न एका दिवसाचा नव्हता. लग्नाच्या तीस वर्षांचा होता. फक्त पैसाच पाहणाऱ्या माणसासोबतच्या संसाराचा होता. पैसा कमावणं वाईट नाही. संपत्तीची निर्मिती वाईट नाही. मात्र त्यापायी आनंदाचा बळी जात असेल तर ती कुठे तरी थांबायला हवी. आयुष्य याच्या पलीकडे आहे याचं भान हवं. सुरेखाला अश्विनच्या आर्थिक फटक्याबद्दल वाईट वाटत होतं. मात्र किती दिवस ते उगाळायचं? महिन्याकाठी एखादा छान सिनेमा पाहण्याचं मन:स्वास्थ्यही हिरावून घेत असेल तर तो पैसा काय कामाचा?

‘‘अश्विनला जाऊ  दे, तू या मन:स्थितीत का स्वत:ला बुडवून घेतेस? एकटी का नाही जात एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला?’’ मी विचारलं. त्यावर तिने जे उत्तर दिलं ते अश्विनच्या मूळ वृत्तीचं निदर्शक वाटलं मला! ‘मी एवढय़ा आर्थिक विवंचनेत सापडलो असताना तुम्हाला नाटक-सिनेमा सुचतोच कसा?’

अश्विनला सगळं घर आपल्या तालावर नाचायला हवं होतं. त्याच्या लेखी त्याने बायकोची, पोरांची मनं विकत घेतली होती. त्यांच्या आयुष्याची खरेदी केली होती. पैशानं सगळं विकत घेता येतं ही त्याची धारणा होती. मात्र ते खरं नाही, हे त्याला आता कुठे तरी जाणवायला लागलं होतं.

पैसा आणि मन:शांती हे अल्पकाळाचे जोडीदार. माणसाच्या प्राथमिक गरजा भागेपर्यंत त्यांची जोडी टिकते. ती एकदा भागली, की ही जोडी समांतर राहू शकत नाही. पैशानं मन:शांती मिळते, तो दुसऱ्यासाठी खर्च करून! मात्र अश्विनचं जग फक्त आपल्या नफ्याचं होतं. पुरुषी होतं. त्याला पैशाशिवाय मिळणाऱ्या आनंदाची जाणीव नव्हती, इच्छाही नव्हती. ज्या आनंदासाठी सुरेखा तळमळत होती, तो अश्विनच्या लेखी तुच्छ होता. ‘काय मिळणारेय भाषणं ऐकून? काय करायचंय संगीत ऐकून? (मुलाच्या लग्नातही त्यानं संतूरचं ‘टुंग’देखील वाजू दिलं नव्हतं!)  जुन्या हिंदी सिनेसृष्टीतील बहुतांशी स्त्री-मनाची गाणी ही  पुरुष गीतकारांनीच लिहिली, (माया गोविंद आणि काही अपवाद वगळता!) तशी संसारात बायकोच्या आशा-आकांक्षाची स्क्रिप्टही त्यानेच लिहिली होती! ती तिने इमानेइतबारे गावी ही त्याची इच्छा. तिला काय म्हणायचं असावं हे राजेंद्र कृष्ण, मजरूह वगैरे लिहिणार अन् नवरा ठरवणार! तिला ‘शाम मस्तानी’ वाटत असली, तरी त्याच्या लेखी तिच्या तोंडी ‘तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो!’

अश्विनची आर्थिक कोंडी यथावकाश सुटली. फ्लॅट विकले जाऊ  लागले, पैसा मोकळा झाला. त्याची मन:स्थिती सुधारली. सुरेखानं त्यातच आनंद मानून घेतला. सुरेखा-अश्विनची ताणलेली कहाणी सुखान्त झाली. राजा-राणी आनंदात राहू लागले, मात्र माझ्या ओटीत काही प्रश्न टाकून!

साठीला पोचलेला अश्विन आता किती दिवस पैशांच्या हिशेबात आयुष्याचं सुख मोजेल? त्याला पुन्हा तोटा झाला तर तो पुन्हा आत्मसमाधान गमावून बसेल? पैशाचा अतिरेकी हव्यास हाही एक प्रकारचा मनोविकारच आहे का?

असल्या प्रश्नांची उत्तरं नसतात. मात्र अश्विनसारखी माणसं कधी तरी आयुष्याचा पैशाबाहेर जाऊन विचार करतील असा आशावाद ठेवायला मला आवडतं. मी त्या मैफलीची वाट पाहतो आहे जेव्हा घरोघरीच्या सुरेखा आपल्या मनासारखं गाणं म्हणू शकतील, ‘ये शाम मस्तानी..!’

डॉ. नंदू मुलमुले nandu1957@yahoo.co.in

First Published on April 15, 2017 2:28 am

Web Title: value of happiness and prosperity in human life
  1. No Comments.