पाणीपुरीच्या चविष्ट ब्रह्मरसांत माझी रसना आकंठ बुडालेली होती. सुखी पुरी खाऊन समाधानाने मी शेजारी पाहिले. तर ‘ती’ कुठे होती तिथे? तिची सुखी पुरी अशीच तिथे पडली होती. मी इकडे-तिकडे पाह्य़लं. कुठे गर्दीत कापरासारखी विरून गेली होती ‘ती’. मला बेचैन करून. सुखी पुरी तशीच टाकून..

पाणीपुरीवाल्यासमोर ती उभी होती. आपल्याला कोणी बघत नाही ना या भीतीने, अंग चोरून! ताकाला जाऊन भांडं लपवण्यासारखंच वाटत होतं ते. काय गरज होती असं अपराध्यासारखं वाटण्याची? ती काही त्या भेळवाल्याच्या पुऱ्या चोरून खात नव्हती. चांगले राजरोस पैसे मोजून खात होती. इतर चारचौघींसारखीच तीही भुकेपोटी आणि त्या चटपटीत चवीसाठी तिथे आली असणार.
मी लांबूनच तिच्याकडे बघत होते. तिच्या अंगावर साधा, सुती, धुवट, इस्त्री नसलेला सलवार-कुर्ता होता. तिशीच्या घरातली वाटत होती. तिच्यात असं काही तरी होतं की मला तिच्यावरची नजर काढावीशीच वाटत नव्हती. मध्यमवर्गीय घरातली, बाळबोध वळणाची. स्वत:ला विसरून संसार करणारी वाटत होती. तिने आपल्या मुळांत सुंदर असलेल्या चेहेऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं दिसत होतं. जराही कुठे रंगरंगोटी दिसत नव्हती. या आमच्या पॉश भागांत असं नैसर्गिक रूप बघायला मिळणं विरळाच. चेहेऱ्यावर मेकअपचे जाड थर, हायहिल्स, गॉगल्स, ब्रॅण्डेड कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजच्या कवच-कुंडलांखाली आपलं नैसर्गिक वय आणि रूप झाकण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत असलेल्या स्त्रियाच दिसायच्या इकडच्या रस्त्यांवर. ‘ती’ त्यामुळे पण संकोचली असेल आणि आपल्या साध्या कपडय़ांचं भान येऊन शरमली असेल. एखाद्या परग्रहावर आल्यासारखं वाटत असेल तिला. तिचा आत्मविश्वासही गेल्यासारखं दिसत होतं.
मी माझ्या गाडीच्या काचेतून तिच्याकडे एकटक बघत होते. का? कोण आहे ती? माझी जुनी ओळखीची आहे का कुणी? मला गाडीत बसवेना. झट्कन उतरले आणि भेळवाल्याकडे निघाले. तशी मी माझ्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे शॉपिंग संपवून त्याच्यासमोर गाडी पार्कच करत होते आणि ‘ती’ तिथे उभी असलेली दिसली आणि कसं, कुणास ठाऊक, तिचंच निरीक्षण करत राहिले. बहुतेक वेळा माझं शॉपिंग संपलं की मी हमखास इथे येते. शॉपिंग एकटय़ानेच करते. एकटं असल्यावर कसं शांतपणे रमत-गमत शॉपिंग करता येतं. एकेका वस्तूमागे मी तासन् तास घालवू शकते. आधी आणलेल्या वस्तू परत करते. हुज्जत घालते. दुपारी उन्हातान्हांत भान हरपून बाजारात हिंडते. मग भूक लागली की या पाणीपुरीवाल्याकडे येते. पण नवरा, मैत्रिणी किंवा नातेवाईकांपैकी जर कोणी बरोबर असेल तर मात्र माझा हा लाडका कार्यक्रम ‘फट्’ होतो. मग त्यांच्या मताप्रमाणे ते मला फरफटत नेतात.
हा चाटवाला इतर परप्रांतीयांप्रमाणेच आधी रस्त्यावर एक उंच, वेताचं, डमरूच्या आकाराचं स्टुल घेऊन संध्याकाळी उभा असायचा. स्टुलावर त्याच्या शेव-पुरी, भेळपुरीचा पत्र्याचा, अर्धगोलाकार डब्बा असायचा. तीन-चार वर्षांतच त्याची ‘चाट’ या मुंबईतल्या पॉश उपनगरांत प्रसिद्ध झाली आणि मग त्याच जागी कधी, कसं त्याचं दुकान उभं राहिलं हे कळलंच नाही. रस्ता अडवून दुकान मिजाशीत पसरलेलं होतं, सरकारच्या आणि माझ्यासारख्या खवय्यांच्या कृपेवर! सदैव गिऱ्हाईकांनी घेरलेलं. कूपन घ्यायचं आणि हातात द्रोण धरून उभं राह्य़चं, सांगायचं, ‘एक मीडियम बनाना’ की तो त्याच्याभोवती उभ्या असलेल्या उभ्या ‘पंक्तीला’ भराभर पाणीपुऱ्या वाढायचा. कुणाला मिठी, कुणाला तिखी, त्याच्या कसं लक्षात राहात होतं आणि तो त्या कशा मोजत होता कोण जाणे? अजब कौशल्य होतं खरं! मेंदू आणि हातांचं चकित करणारं सिंक्रोनायझेशन होतं!
चाटवाल्याकडून कूपन घेता घेता मी ‘ती’च्याकडे बघत होते. आज दुपारची वेळ होती म्हणून की काय जास्त गर्दी दिसत नव्हती. भय्या गर्दी नाही हे बघून आपल्या मोबाइलवर ‘चॅट’ करत होता. ‘ही’ गरीब गाय, एखाद्या भिकाऱ्यासारखी, सहनशीलतेने हातात द्रोण धरून उभी होती. जणू काय त्या मिजासी भय्याचं बोलणं तिच्या पाणीपुरीपेक्षा जास्त र्अजट होतं! तिच्याजागी एखादी जीनस् घातलेली, नखं, तोंड रंगवलेली तरुणी असती, तर तिला असं त्यानं डावललं असतं कां, या विचाराने मी कासावीस झाले. इतका का मी तिचा विचार करतेय? ‘बळी तो कान पिळी’ हे डोळ्यांसमोर दिसत होतं आणि मला अस्वस्थ करत होतं. ‘ती’ पराकोटीच्या सहनशीलतेने हातात द्रोण घेऊन त्याचं मोबाइलवरचं बोलणं संपायची वाट बघत होती. मी न राहवून तिच्याजवळ जाऊन उभी राहिले आणि भय्यावर खेकसले, ‘‘फोन रखो भय्या, हमे जल्दी है’’ त्याने दचकून फोन ठेवला. तिने सुटकेचा नि:श्वास टाकल्याचा मला भास झाला.
भैय्याने पुऱ्या द्यायला सुरुवात केली. मी सांगितलं, ‘मीडियम’. ‘ती’ काहीच बोलली नाही. मुकाटय़ाने जे तो वाढेल ते खात होती. सहा पुऱ्यांची एक पूर्ण मालिका पोटांत गेल्यावर, मी हक्काने द्रोण भरून पाणी वसूल केलं आणि शेवटचा बोनस एक सुखी पुरी वसूल करायच्या मागे लागले. त्या पाणीपुरीच्या चविष्ट ब्रह्मरसांत माझी रसना आकंठ बुडालेली होती. सुखी पुरी खाऊन समाधानाने मी शेजारी पाहिले. तर ‘ती’ कुठे होती तिथे? तिची सुखी पुरी अशीच तिथे पडली होती. मी इकडे-तिकडे पाह्य़लं. कुठे गर्दीत कापरासारखी विरून गेली होती ‘ती’. मला बेचैन करून..
तिच्या राहिलेल्या सुख्या पुरीकडे बघता बघता विजेसारखा एक विचार मनात चमकून गेला. कोणे एकेकाळची, वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची ‘मी’ मला तिच्या जागी दिसू लागली. हो, ती सुखी पुरी खाण्याचं धाडस नसलेली, भय्या त्याचे आणखी पैसे मागेल का काय, या भीतीने काढता पाय घेणारी ‘ती’ मीच होते. लग्न झाल्यावर छोटय़ा शहरांतून या मोहनगरी मुंबईत पहिल्यांदाच घाबरत घाबरत पाऊल टाकलं होतं. घरात लहानपणी बाळबोध संस्कार झालेले होते. बाहेरचं, हॉटेलांतलं वगैरे खायचं नाही. उगीचच्या उगीच पैसे खर्च करायचे नाहीत. कोणाकडे काही मागायचे नाही. गरज असेल तरच नवीन वस्तू आणायच्या नाहीतर जुन्याच दुरुस्त करून वापरायच्या.
वर्षांनुर्वष त्याच चपला, त्याच साडय़ा, तेच पडदे आणि सगळं तेच ते. मोठय़ा भावंडांचे कपडे छोटय़ा भावंडांना. पुस्तकांचही तेच. नाही तर सेकंडहॅण्ड. रिक्षा करायची नाही. चालत, नाही तर फार लांब जायचं असेल तर सायकलवरून! काटकसरीचं बाळकडूच मिळालेलं असायचं. मुंबईत या जड संस्कारांचं ओझं घेऊनच वावरत होते. स्वत:चा विचार करायला विसरलेच होते. मुंबईतली प्रसिद्ध भेळपुरी, बर्फाचा गोळा, शहाळं खायची हिंमत नव्हती. जवळ फॅन्सी कपडे आणि श्रीमंतांचा किंवा नोकरी करणाऱ्या बायकांचा आत्मविश्वासही नव्हता. घरात नवऱ्याला कधी बोनस किंवा तत्सम काही जास्तीचे पैसे मिळाले की मुलांसाठी प्रथम काही तरी चांगलंचुंगलं यायचं. मग सर्व खर्च भागल्यावर काही उरलं तर चौपाटीवर जाऊन भेळ खायची मुलाबाळांसमवेत. एकटय़ा दुकटय़ाने नाही! सासू-सासरे, दीर-जाऊ असे एकत्र कुटुंब. पैसे कमी आणि जबाबदाऱ्या जास्त. बंधनं आणि चालीरीतीच्या चौकटीत आयुष्य चार भिंतींमध्ये लटकलेलं. कुठून मिळणार होतं मनसोक्त खायला आणि फिरायला?
एक दिवस बाहेर काही कामासाठी गेले होते आणि खूप तास अडकून पडले. घरी पोहोचायला आणखी दोन तास तरी लागणार होते. दुपारची वेळ होती. भुकेने जीव व्याकुळ झाला होता. बसची वाट बघत रांगेत उभी होते. जवळच फुटपाथवर एक भेळपुरीवाला उभा होता. सारखं त्याच्याकडे लक्ष वेधलं जात होतं. खाऊ की नको यात माझा किती तरी वेळ गेला. मग हिंमत करून रांगेमधून बाजूला झाले आणि कोणी बघत नाही ना असं बघून हळूहळू त्याच्या जवळ गेले. घशांतून पहिल्यांदा शब्दच फुटत नव्हता. धीर करून हलक्या आवाजात त्याला सांगितलं, ‘‘एक पानीपुरी’’ आणि हातांत द्रोण धरून उभी राहिले. पैसे आधीच काढून त्याच्यासमोर ठेवले, मग घाबरत घाबरत, आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात, कशाबशा भरभर पुऱ्या संपवल्या. खूप चोरटेपणा आणि संकोच वाटत होता खाताना. घरी मुलंबाळं आणि नवऱ्याला सोडून आपण खातोय या कल्पनेने शरमिंदी झाले. त्या दिवशी बससाठी न थांबता बेभानपणे, भर उन्हात चालत, स्वत:ला शिक्षा करत घरी गेले.
आज वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी माझ्या आर्थिक आणि त्यामुळे सामाजिक परिस्थितीत खूप फरक पडलाय. मी आता जरा जादाच आत्मविश्वास असलेल्या धनाढय़ समाजात मोडतेय. सर्व सुखं पायाशी लोळण घालतायत. पण आजही मी ‘ती’ला शोधतेय. मला ‘ती’ला मनाच्या कुपीत जपून ठेवायचंय. भेटेल का ‘ती’ परत? ‘ती’ची सुखी पुरी असोशीनं ‘ती’ची वाट बघतेय!
tejaswinipandit@ymail.com

chaturang article, mazi maitrin, friendship , rohan namjoshi, female friend, memories, college friendship, male and female friendship, college friendship memories, girl and boy, girl and boy friendship, boyfriend, girl friend, mens friendship with girl,
माझी मैत्रीण : लोणच्यासारखी मुरलेली मैत्री
shani dev vakri in kumbha rashi
शनिदेव कुंभ राशीत वक्री होताच ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या, कोणत्या राशींचे नशीब पालटणार?
Father-daughter love
बाप असावा तर असा…! लेकीच्या घटस्फोटानंतर वाजत-गाजत आणलं घरी! वडिलांच्या ‘या’ कृतीचा समाजाने का घ्यावा आदर्श?
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता