पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधल्यानंतर नेटीझन्सनी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर जोरदार टीका केली. ‘ऐ दिल है मुश्किल चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे त्याला चांगलेच महागात पडले. उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वातावरण तापले असताना पाकिस्तान कलाकारांच्या भूमिकेवरुन वादात सापडलेल्या चित्रपटाबद्दल व्यक्त होताना अनुरागने मोदींना लक्ष्य करुन नेटीझन्सचा राग ओढावून घेतला. ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.  एका नेटीझन्सने चित्रपटावर कोणत्या ठिकाणी बंदी घातली आहे? असा सवाल अनुरागला ट्विटरच्या माध्यमातून केला. लोकप्रियता मिळविण्यासाठी अनुरागने हे वक्तव्य केले असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहे. एका नेटीझन्सने भारतामध्ये यापूर्वी बंदी घालण्यात आलेल्या चित्रपटांची आठवण करुन देणारा फोटो शेअर केला आहे. काहींनी तर अनुराग याच्यावर अरविंद केजरीवालांची सावली पडल्याचे देखील म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींवर वारंवार टीका करत असतात.

‘ऐ दिल है मुश्किल’च्या वादा्च्या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला होता. पाकिस्तानला भेट देणाऱ्या पंतप्रधानांनी अद्याप  देश वासियांची माफी मागितलेली नाही, असे त्याने ट्विटरवरुन म्हटले. ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असताना २५ डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला भेट दिल्याची आठवण करुन देण्याचा त्याने प्रयत्न केला. अनुरागवर राजकीय नेत्यांनी तसेच बॉलीवूडमधील दिग्गजांनीही टीका केली आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटासंदर्भातील वादंगाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.