चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्टचे ६८ किलो इतके वजन होते. उपाशी न राहता योग्य तेच खाणे हेच आलियाचे डाएट मंत्र आहे. आपले शरीर आनंदी असणे आवश्यक आहे, असे आलियाचे मत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी वजन कमी करण्यासाठी आलियाने खूप मेहनत घेतली. हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आलियाने आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांच्यासोबत आपले डाएट सिक्रेट चाहत्यांसमोर मांडले.

अभिनेत्रींच्या शरीरयष्टीकडे पाहून अनेकांना त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते. ते नेमके काय खातात, व्यायास कसे करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. वजन कमी करण्यासाठी कमी खाणे गरजेचे असते असेच अनेकांना वाटते. मात्र मी नेहमी पोटभरून खाते असे आलिया म्हणते. डाएट प्लॅनमध्ये जे सांगितले फक्त तेच खाण्यापेक्षा आपल्या शरीराला ज्या गोष्टींची गरज आहे ते खावे, असेही ती सांगते.

वाचा : व्यायाम करताना ‘हेही’ लक्षात घ्या

‘दर दोन तासांनी खाण्यापेक्षा पोटभर जेवण करा. अन्नाचे मूल्यमापन करून जेवणे योग्य नाही. सकाळी नाश्तामध्ये पोहा, दुपारी जेवणात चपाती-भाजी आणि रात्री जेवणात दहीभात खाण्यास मला सांगितले होते. एवढे खाऊन वजन कमी कसे होणार असा प्रश्न मला पडला, मात्र खरेच वजन कमी झाले,’ असे ती पुढे म्हणाली. आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकरने आलियाच्या डाएटबद्दल सांगितले की, ‘शूटिंगसाठी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागत असल्याने आलियाचा डाएट प्लॅन ठरलेला नव्हता. मात्र तिच्या जेवणात दहीभात नेहमीच असायचा.’

वाचा : चालण्याचा व्यायाम ‘या’ गोष्टींसाठी फायदेशीर

‘व्यायामानंतर ऊसाचा रस पिणे नेहमीच फायद्याचे असते. त्याचप्रमाणे रात्रीचे जेवण साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत करणे योग्य आहे. व्यायामसुद्धा करणे तितकेच महत्त्वाचे आहे,’ असे आलिया सांगते.