‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत अभिनेत्री रिचा चड्ढाने ब्लॉग लिहिला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असला तरी कलाकारांना त्या यशाचा वाटा मिळाला नसल्याची खंत तिने व्यक्त केली. तिच्या पाठिंबा दर्शवत दिग्दर्शक अनुराग कश्यपने ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी त्याची संपूर्ण फी गमावल्याचं सांगितलं.

‘ती बरोबर बोलत आहे. अनेक कलाकार व क्रू मेंबर्सना इतकंच किंवा याहून कमी मानधन मिळालं होतं. मला तर माझं संपूर्ण मानधन गमवावं लागलं होतं. मजेशीर गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे ५० टक्के आयपीआर (बौद्धिक संपदा अधिकार) आपल्या नावावर आहेत आणि आम्हाला त्यातला एक रुपयासुद्धा मिळाला नाही किंवा त्या रकमेबाबत काही माहितीसुद्धा नाही. स्टुडिओच्या मते हा चित्रपट फ्लॉप आहे,’ असं ट्विट अनुरागने केलं.

त्यापुढे त्याने लिहिलं, ‘असो, इथे अशाचप्रकारे स्टुडिओचं काम चालतं. फक्त एकच स्टुडिओ आहे आणि होती जी आम्हाला नेहमी चित्रपटांच्या व्यवसायाची योग्य ती माहिती द्यायची, ती म्हणजे UTV.’

‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या दोन्ही चित्रपटांसाठी रिचा चड्ढाला केवळ अडीच लाख रुपये मानधन मिळालं होतं. याविषयी तिने तिच्या ब्लॉगमध्ये लिहिलं, “आणि हे ठीकच होतं. दिग्दर्शक अनुराग कश्यपने मला संधी दिली होती आणि त्याची मी आभारी आहे. त्या चित्रपटासाठी मला मानधन मिळेल असंही मला वाटलं नव्हतं. पण बॉक्स ऑफिसवर तो हिट झाला आणि त्यामुळे माझ्या करिअरला गती मिळाली.” हे सांगत असतानाच रिचाने रॉयल्टीचा मुद्दा मांडला. “चित्रपटाला विविध माध्यमांवर प्रचंड यश मिळालं. अर्थात या यशाचा रॉयल्टीच्या रुपात काहीतरी फायदा ठराविक लोकांना मिळाला असेल. जरी मला या चित्रपटासाठी रॉयल्टी मिळत असती तरी त्याची रक्कम खूपच कमी असती.”