रेश्मा राईकवार

चित्रपटात जे चेहरे दिसतात, ते सहसा वेबमालिके त दिसत नाहीत आणि जे वेबमालिके तून प्रसिद्ध झाले आहेत ते चित्रपटांच्या वाटय़ाला फारसे जात नाहीत, हा प्रघात अजूनही बऱ्याच प्रमाणात पाळला जातो आहे. चित्रपट आणि ओटीटी माध्यमातील अंतर पुसट होत चाललं असलं तरी हा प्रघात पुरता पुसला गेलेला नाही. तरीही काही चेहरे चित्रपटातही त्याच आत्मविश्वासाने आणि चांगल्या भूमिकांमधून लोकांसमोर येतात आणि ओटीटीवरही कलाकारांच्या गर्दीत उठून दिसतात. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’, ‘मिशन मंगल’सारखे चित्रपट आणि ‘फोर मोअर शॉट्स’, ‘क्रिमिनल जस्टिस’सारख्या वेबमालिकांमधून ठळकपणे लोकांसमोर आलेला चेहरा म्हणून अभिनेत्री कीर्ती कुल्हारीचे नाव घ्यावे लागेल. ‘क्रीमिनल जस्टिस’ या वेबमालिके च्या दुसऱ्या पर्वातील भूमिके मुळे कौतुकाचा विषय ठरलेल्या कीर्तीच्या मते कलाकार हा के वळ सेटवर येऊन अभिनय करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आशयनिर्मितीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग झाला आहे.

सध्या चित्रपट आणि वेबमालिका दोन्हीकडे दर्जेदार आशयनिर्मिती होते आहे. दोन्ही माध्यमातून दिग्दर्शक आणि कलाकार सहजपणे वावरत आहेत, त्यांना ठरावीक एका माध्यमाचे किं वा आशय-अभिनय शैलीचे बंधन उरलेले नाही. आशयनिर्मितीची ही प्रक्रियाच पूर्णपणे बदललेली आहे आणि त्याचे श्रेय हे प्रेक्षकांबरोबरच चित्रपट-वेबमालिकाकर्त्यांनाही जाते, असे कीर्ती सांगते. लेखक किं वा दिग्दर्शक म्हणून सातत्याने नवनवीन आशय मांडणी असावी यावर भर दिला जातो आहे. त्यांच्याकडून होत असणाऱ्या प्रयोगांना प्रेक्षकांकडूनही तितकाच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दोन्ही बाजूंनी ही प्रक्रिया घडत असल्यानेच दर्जेदार आशयनिर्मितीत वाढ झाली आहे, असे मत कीर्तीने व्यक्त के लं.

‘क्रीमिनल जस्टिस’च्या दुसऱ्या पर्वातील कीर्तीची व्यक्ति रेखा अनुराधा चंद्रा ही खूप गुंतागुंतीची आहे. तिच्यावर हत्या के ल्याचा आरोप आहे आणि तिनेही तो मान्य के ला आहे, इतक्या अवघड परिस्थितीत हत्येमागचा खरा सूत्रधार शोधणं आणि तिचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी तिच्या वकिलांवर आहे. माझ्या व्यक्तिरेखेला फारसे संवादही नाहीत किं बहुना काहीच न बोलता तिला बरंच काही सांगायचं आहे. इतकी गुंतागुंतीची व्यक्तिरेखा मी आजवर साकारली नव्हती. त्यामुळे अनुराधासारखी परिस्थिती कोणावर ओढवली तर तिची मानसिकता काय असू शकते,  हे समजून घेण्यासाठी मी पहिल्यांदा मानसशास्त्रज्ञाची भेट घेतली, असं तिने सांगितलं. त्यांच्याशी झालेली चर्चा आणि मग लेखक-दिग्दर्शक यांच्याबरोबरचा सतत संवाद या सगळ्याची मदत घेऊन मग मी माझी अनुराधा शोधली. कोणतीही भूमिका साकारण्यापूर्वी मी अशाच पद्धतीने माझ्या व्यक्तिरेखांचा अभ्यास करते. या अभ्यासामुळे लेखकाने मांडलेली व्यक्तिरेखा पडद्यावर त्याच ताकदीने रंगवणं शक्य होतं, असं ती म्हणते. इतकी भावनाप्रधान व्यक्तिरेखा साकारणं हे कायम आव्हान वाटत आलं आहे, त्यामुळे नेहमीच अशा भूमिकांच्या आपण शोधात असतो, असं म्हणणारी कीर्ती एक कलाकार म्हणून आपण या भूमिकांमधून अडकू न पडत नाही, हेही मोकळेपणाने सांगते. एखाद्या व्यक्तिरेखेतून बाहेर पडणं कलाकारांना अवघड जातं, मात्र त्याबाबतीत मला तितका त्रास होत नाही. कितीही गुंतागुंतीची किं वा भावगर्भ व्यक्ति रेखा असली तरी कॅ मेरा समोर आला की मी आपोआप भूमिके त शिरते आणि कॅ मेरा बाजूला झाला की त्यातून सहज बाहेरही पडते, असं ती म्हणते.

‘क्रीमिनल जस्टिस – बिहाईंड क्लोज्ड डोअर्स’ या वेबमालिके बरोबरच कीर्तीच्या ‘फोर मोअर शॉट्स’ या वेबमालिके चे दुसरे पर्वही गेल्यावर्षी प्रदर्शित झाले होते आणि आता तिसरे पर्वही येऊ घातले आहे. सध्या गाजलेल्या वेबमालिकोंचे सिक्वे ल्स सातत्याने येत राहतात. एकच व्यक्तिरेखा तीन-चार पर्व होईपर्यंत साकारणं हे कलाकारांसाठीही आव्हान ठरतंय, असं ती म्हणते. पहिलं पर्व गाजलं की लोकांच्या त्या त्या व्यक्तिरेखेबद्दल मनात काही अपेक्षा निर्माण होतात. त्यांना ती व्यक्तिरेखा पहिल्या पर्वात जशी आवडली आहे, त्याच पद्धतीने ती साकारणं आपल्याला शक्य होईल का, असा विचार सुरुवातीला माझ्याही मनात यायचा. कारण वेबमालिके चे चित्रीकरण हे सलग नसते. मध्ये मध्ये काही काळ गेलेला असतो. त्या दरम्यान इतर भूमिका के लेल्या असतात, पण दुसऱ्या पर्वात काम करताना आपोआपच अंजना सापडली आणि आता कितीही वेळ मध्ये गेला तरी ती माझ्यातच दडलेली आहे, हे मला कळून चुकलं आहे. त्यामुळे सुरुवातीची भीती आता उरलेली नसल्याचे तिने सांगितले. ‘क्रीमिनल जस्टिस’नंतर ती रिभू दासगुप्ता दिग्दर्शित ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटात दिसणार आहे. यात परिणिती चोप्रा आणि आदिती राव हैदरी यांच्याबरोबर ती मुख्य भूमिके त आहे.

कलाकाराचे काम साधारणपणे हातात पटकथा पडल्यानंतर सुरू होत होते. आता मात्र तसं होत नाही. वेबमालिके चे काम सुरू होण्यापूर्वी त्याची कथा काय आहे? तुमची व्यक्तिरेखा कोणती आहे आणि दिग्दर्शकाला ती कशा पद्धतीने मांडणं अभिप्रेत आहे? अशा विविध मुद्दय़ांवर सांगोपांग चर्चा होते. चित्रीकरणाच्या आधी तयारी म्हणून कार्यशाळा घेतल्या जातात. सविस्तर पटकथा वाचन के ले जाते. या सगळ्यामुळे कलाकारांनाही आपली तयारी चोख करता येते. लेखक-दिग्दर्शकाशी समोरासमोर चर्चा करून व्यक्तिरेखेचा सूर शोधता येतो. ही सगळी प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. आणि ही प्रक्रिया रंगभूमीवर काम करताना आपल्याला समजली, त्याचा आता चित्रपटातही फायदा होत आहे.