News Flash

झीरो  चा हीरो

‘यु टय़ूब’वर या गाण्याने आत्तापर्यंत दीड कोटींहून अधिक ‘हिट्स’ मिळविल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय पॉप गायक  क्रिस ब्राऊनच्या ‘झीरो’चे गीत, संगीत आणि निर्मिती मराठमोळ्या तुषार आपटेची 

सध्या ‘यु टय़ूब’वर प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉप गायक क्रिस ब्राऊन याच्या ‘झीरो’ या गाण्याचा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात क्रिस ब्राऊन याचे ‘झीरो’ हे गाणे (रेकॉर्ड) प्रकाशित झाले. ‘यु टय़ूब’वर या गाण्याने आत्तापर्यंत दीड कोटींहून अधिक ‘हिट्स’ मिळविल्या आहेत. क्रिस ब्राऊनच्या या गाण्याचा गीतकार, संगीतकार आणि निर्माता तुषार आपटे हा मराठमोळा तरुण असून या ‘झीरो’ गाण्याने तुषारला ‘हीरो’ केले आहे.

सध्या लॉस एंजेलिस येथे स्थायिक असलेल्या तुषारने बारावीत असताना ‘संगीत’ या विषयात विशेष प्रावीण्य मिळविल्यानंतर सिडनी येथील ‘सिडनी कॉन्झरव्हेटोरियन ऑफ म्युझिक’ येथे संगीताचे पुढचे शिक्षण घेतले. त्याने सिडनी विद्यापीठातून ‘बॅचलर ऑफ लिबरल स्टडीज’ तसेच ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स’ येथून ‘मास्टर ऑफ जर्नालिझम’ही केले आहे. संगीताचा वारसा तुषारला त्याच्या घरातूनच मिळाला आहे. तुषारची आई मिनोती आपटे या शास्त्रज्ञ आहेत. मात्र त्या स्वत: उत्तम नर्तिका आणि कलाकार आहेत. तर त्याचे वडीलही सिडनीतील मान्यवर शास्त्रीय गायकांमध्ये गणले जातात. त्यामुळे संगीताचा वारसा त्याला घरातूनच मिळाला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. २०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात टोरांटो येथील एका संगीत कार्यशाळेसाठी ऑस्ट्रेलियामधून ‘ऑस्ट्रेलियन परफॉर्मिग राइट असोसिएशन’ने तुषारची निवड केली होती. या कार्यशाळेत तुषारने ‘झीरो’ची निर्मिती केली. त्यानंतर अनेक आघाडीच्या कलाकारांनी हे गाणे ध्वनिमुद्रित करण्यासाठी आपली इच्छा व्यक्त केली. अखेर आघाडीचा पॉप गायक क्रिस ब्राऊन याच्या आवाजात गाण्याची ध्वनिमुद्रिका निघाली. भारतातही ‘व्हीएच वन’ या वाहिनीवर हे गाणे दाखविले जात आहे.

हॉलीवूडच्या एका चित्रपटासाठीही तुषारने ‘ख्रिसमस साँग’ लिहिले असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, मात्र अद्याप चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख नक्की झालेली नाही. ‘एमटीव्ही’वरील युवकांसाठी असलेल्या एका रिअ‍ॅलिटी शोसाठी (द चॅलेंज) सध्या तो काम करतो आहे. ‘युके’ (आयटीव्ही)नेटवर्कवर सेलिब्रेटी शेफ अ‍ॅडम रिचमन यांचा सहभाग असलेल्या ‘बीबीक्यू चॅम्प’या कुकिंगविषयक रिअ‍ॅलिटी शोच्या काही भागांचे संगीतही त्याचे होते. ‘एनबीसी’वरील ‘बिगेस्ट लुझर यूएसए’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या १७ व्या पर्वासाठीही तुषारनेच संगीत  दिले असून हा शो युके, ऑस्ट्रेलिया येथे प्रसारित होणार आहे.

पॉप संगीताची आवड असलेल्या तरुणांमध्ये क्रिस ब्राऊन हे नाव लोकप्रिय आहे. ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’सारख्या सोशल मीडियावरही क्रिस ब्राऊन तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’वर त्याचे अनुक्रमे दीड कोटी फॉलोअर्स व चार कोटी चाहते आहेत. मात्र सध्या त्याचे जे गाणे त्याच्या चाहत्यांच्या ओठावर रुळले आहे त्याचे श्रेय मराठमोळ्या तुषार आपटे या तरुणाने केलेल्या कामाला आहे. तुषारचे संगीत, त्याच्या शब्दांची किमया याची साथ क्रिसच्या ‘झीरो’ या गाण्याला मिळाल्याने ते अधिक लोकप्रिय ठरले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 1:10 am

Web Title: article on singer tushar apte
Next Stories
1 ‘..के दिल अभी भरा नहीं!’ ठाय लयीतला निवृत्तीसंघर्ष 
2 ‘नीरजा’च्या भूमिकेने कणखर बनवले
3 नुसताच झगझगाट!
Just Now!
X