काँग्रेस नेतृत्वावर टीका करत माजी खासदार संजय निरुपम यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला राम राम ठोकला होता. अखेर त्यांनी शुक्रवारी (दि. ३ मे) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. वीस वर्षांपूर्वी मी काही कारणास्तव शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, मात्र आता मी घरवापसी करत आहे, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी पक्षप्रवेशावेळी दिली. तसेच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी संजय निरुपम यांची इच्छा होती, पण उमेदवारी जाहीर केली नाही, तरीही शिंदे गटात प्रवेश करण्याचे कारण काय? यावरही त्यांनी भाष्य केले. तसेच त्यांच्याबद्दल एक विनोद समाजमाध्यमांवर पसरवला गेला, त्याबद्दलही त्यांनी उपरोधिक टिप्पणी केली.

काय म्हणाले संजय निरुपम?

“काँग्रेसने माझ्याशी दगाफटका केल्यानंतर मी जानेवारी महिन्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हाच पक्षप्रवेश करण्याची आमची चर्चा झाली होती. पण माझे विरोधक म्हणतात, ‘संजय निरुपम आतमध्ये भंडारा खायला गेला होता, पण आत गेल्यावर भंडारा संपला आणि बाहेर आल्यानंतर चप्पल चोरी झाली.’ सध्या परिस्थिती अशी आहे. पण काही अडचण नाही. देवाची जी इच्छा आहे, तेच होते. ईश्वराने सांगितले की, शिंदेंचे हात बळकट करावेत. त्याप्रमाणे मी वागत आहे”, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली.

विशेष म्हणजे संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच हे विधान केले. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पहिल्या वाक्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र संजय निरुपम यांनी खिलाडू वृत्तीने त्यांच्यावर झालेली टीका घेतली आणि विनोद केला, त्यामुळे सर्वांनीच हसून याला दाद दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “२० वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रीय होत असल्याबद्दल संजय निरुपम यांचं आम्ही स्वागत करतो. मुंबईतील लोकसभा मतदारसंघासाठी संजय निरुपम यांचे नाव चर्चेत होतं. माध्यमातूनही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही पक्षासाठी काम करा आणि शिवसेना – महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करा. माझ्या विनंतीचा मान ठेवून ते पक्षात आले आणि प्रचारासाठी तयार झाले. अनेक नेते पक्षात येण्यापूर्वी स्वतःला काय मिळणार? याचीच विचारणा करतात. पण संजय निरुपम यांनी पक्षासाठी वेळ देण्याचे वचन दिले, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो.”