हॉलीवूड असो या बॉलीवूड अ‍ॅक्शनपट हा प्रेक्षकांच्या विशेष आवडीचा विषय आहे. आपल्या आवडत्या अभिनेता, अभिनेत्रीला स्टंटबाजी करताना पाहणे ही चाहत्यांसाठी खरी पर्वणीच असते. त्यामुळे अशा चित्रपटांना पुरस्कार मिळो ना मिळो प्रेक्षकांची दाद आणि लोकप्रियता नक्कीच मिळते. परंतु अनेकदा अशी अ‍ॅक्शनदृश्ये कलाकारांच्या जिवावर बेततात. नुकताच याचा अनुभव हॉलीवूड स्टार जेरेमी रेनर याने घेतला आहे. ‘टॅग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तो गंभीर जखमी झाला असून त्याचा हात फॅ्रक्चर झाला आहे.‘द अ‍ॅव्हेंजर्स’ या चित्रपट मालिके तील ‘क्लिंट बार्टन’ व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झालेल्या जेरेमीने एक अ‍ॅक्शन स्टार म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. एका चित्रपट सोहळ्याला हजर राहिलेल्या जेरेमीचा हात पाहून अनेकांना त्याच्या दुखपातीची घटना कळली. सतत त्याबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना कंटाळून त्याने स्वत:च पत्रकार परिषद घेऊन सगळी घटना कथन केली. त्याच्या मते, मैदानी खेळात शारीरिक व मानसिक जखमा होतच असतात. किंबहुना त्यातूनच तुम्ही अधिक अनुभवी व उत्तम खेळाडू होत जाता. स्टंटबाजी हासुद्धा एक मैदानी खेळच आहे. लहानपणी फु टबॉल खेळताना झालेल्या अनेक जखमा पाहता आत्ता झालेला अपघात काहीच नसून यापेक्षा जास्त भयानक अनुभव वाटय़ाला आला असल्याचे त्याने सांगितले. मात्र लोक जेव्हा चित्रपटाच अ‍ॅक्शन सीन पाहून आपली स्तुती करतात तेव्हा घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले असे वाटते. त्यामुळे काळजीचे काहीच कारण नसून लवकरच तो यातून बाहेर पडेल, असेही त्याने स्पष्ट केले.