‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात कठीण चित्रपट असल्याची प्रतिक्रिया या चित्रपटात मस्तानीची भूमिका साकारणाऱया दीपिका पदुकोणने दिली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांची भरपूर पसंती मिळाली आहे. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरवरूनच चित्रपटाची भव्यता लक्षात आली होती. तर, बाजीराव-मस्तानीचे ऐतिहासिक महत्त्व आणि कथेचे गांभीर्य ओळखून दीपिका आणि रणवीरने भरपूर मेहनत घेतल्याचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी याआधी सांगितले होते. या चित्रपटातील एका गाण्याच्या अनावरण कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना दीपिकाने ‘बाजीराव मस्तानी’च्या चित्रीकरणावेळीच्या अनुभवांवर प्रकाशझोत टाकला. दीपिका म्हणाली, निश्चितच हा चित्रपट माझ्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात कठीण चित्रपट आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या मागणीनुसार चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी शाररीक, मानसिक आणि भावनिकरित्या स्वत:ला झोकून देणे गरजेचे होते. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी चित्रपटाच्या प्रत्येक सीनबाबत अतिशय काटेकोर असत. चित्रीकरणावेळी अनेक कठीण अनुभवांनासामोरे जावे लागले, अभिनयाचा कस लागला पण अखेरीस आपले काम पाहून परिश्रमांचे चीज झाल्याचे समाधान चेहऱयावर होते, असेही ती पुढे म्हणाली.
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रणवीर, दीपिकासह अभिनेत्री प्रियंका चोप्राचीही भूमिका आहे.