सोशल मीडियामुळे आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात डोकावण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या या अनोख्या सुविधेचा वापर करत बरेच सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांसोबच नि:संकोचपणे शेअर करत असतात. अशाच सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन. सिनेसृष्टीत एक वेगळंच, मानाचं असं स्थान असणाऱ्या बिग बींचा प्रवास अनेकांना हेवा वाटेल असाच आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्यानेही सुरुवातीच्या काळात अपयशाचा सामना केला आहे. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरीही अपयश हीच यशाची पहिली पायरी असते यावर अनेकांचाच विश्वास बसत आहे असं म्हणायला हरकत नाही.

इन्स्टाग्रामवरुन अमिताभ बच्चन यांनी एक फोटो पोस्ट करत ‘चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी म्हणून आपण ज्यावेळी आलो होतो, तेव्हा हा फोटो आपल्याजवळ होता’, असं कॅप्शन लिहिलं. याच कॅप्शनमध्ये त्यांनी आणखी एक ओळल लिहिली, ज्यामध्ये त्यांनी हा फोटो पाहून अनेकांनीच आपल्याला नकार दिल्याचं स्पष्ट केलं. स्वत:विषयीची ही माहिती देत आणि अपयशालाही विनोदी अंगाने घेत बिग बींनी एक सकारात्मक दृष्टीकोनच जणू सर्वांना दिला आहे.

१९६८ मधील हा फोटो पोस्ट करत बिग बींनी सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. चित्रपटसृष्टीत शहेनशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बराच संघर्ष केला होता. खुद्द बिग बींनीच काही मुलाखतींमध्ये याविषयीचा उल्लेखही केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांनी शेअर केलेला हा फोटो म्हणजे त्याच दिवसांची आठवण करुन देतोय, असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : …म्हणून आईच्या निधनानंतर ३ वर्षांनी संजय दत्तच्या भावनांचा बांध फुटला

बऱ्याच दशकांपासून प्रेक्षकांची मनं जिंकणारे अमिताभ बच्चन सध्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. पण, योग्य त्या उपचारांनंतर ते पुन्हा एकदा चित्रीकरणाकडे ते मोर्चा वळवणार आहेत.