करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. तसेच हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल होत असल्यामुळे त्यांनी आपापल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाउनमुळे त्यांना चालत घरी जावे लागत आहे. अशातच या कामगारांसाठी अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने अनेक कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सोनूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच एका चाहत्याने सोनू सूदचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सध्या सोनू सूद सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशाच एका चाहत्याने सोनू सूद किती दिलदार आहे हे सांगितले आहे. ‘सर, मी तुम्हाला १९९४ पासून ओळखतो. त्यावेळी ही तुम्ही मित्राला मदत करण्यासाठी स्वत:ची बाईक गहाण ठेवण्यासाठी तयार होतात. आणि आज देखील त्याच भावनेने तुम्ही लोकांची मदत करत आहात. तुम्ही खूप चांगले काम करत आहात. बाबांकडून मी तुमच्याविषयी खूप काही ऐकत असतो’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

चाहत्याने सोनू सूदचा हा किस्सा सांगत त्याला ट्विटमध्ये टॅग केले होते. त्यावर सोनूने उत्तर देत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘तुझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच अनेक कामगारांनी सोशल मीडियाद्वारे सोनूचे आभार मानले आहेत. एका कामगाराने ‘सर आम्ही गावी जाण्यास निघालो आहोत, तुम्ही काळजी करु नका. मी तुम्हाला कुठे पोहोचलो याची माहिती देत राहीन’ असे म्हणत सोनूचे आभार मानले आहेत.