News Flash

मालिकांचे थांबणे..

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली.

मालिका

लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अचानक मालिका बंद झाली तर प्रेक्षकांना धक्का तर बसतोच पण अरे ही मालिका का बंद केली, असा प्रश्नही मनात येतो. प्रेक्षकांना मालिकेचा कंटाळा येऊन आणि एपिसोडचे पाणी घालून ती लांबवण्यापेक्षा प्रेक्षकांना मालिका हवीहवीशी वाटत असतानाच बंद करणे केव्हाही चांगले असते. झी मराठी वाहिनीवरील दिल दोस्ती दुनियादारीही मालिका लोकप्रिय असतानाच काही काळासाठी अल्पविराम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २८ फेब्रुवारी रोजी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या अगोदरही प्रपंच’, ‘गुंतता हृदय हे’, ‘लज्जा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘जुळून येती रेशीमगाठीआदी मालिकाही प्रेक्षकांना हव्याहव्याशा वाटत असतानाच थांबविण्यात आल्या होत्या. मालिकांचे हे थांबणे प्रेक्षकांच्या मनात हुरहूर निर्माण करणारे ठरते.. 

दूरचित्रवाहिन्यांच्या मनोरंजन आणि मालिका विश्वात काही वर्षांपूर्वी फक्त दूरदर्शनच्या मुंबई केंद्राची म्हणजेच आत्ताच्या ‘स’ााद्री’ वाहिनीची मक्तेदारी होती. दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या ‘चिमणराव गुंडय़ाभाऊ’ या कार्यक्रमाला म्हटले तर मालिकेला अमाप लोकप्रियता मिळाली. दूरचित्रवाहिनीवरील मराठी मालिकांची सुरुवात मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित झालेल्या ‘श्वेतांबरा’ या मालिकेने झाली. गूढ व रहस्यमय असलेली ही मालिका त्या काळात खूप गाजली. पोलीस तपास, गुन्हेगारी यावर आधारित असलेली शिवाजी साटम यांची ‘एक शून्य शून्य’या मालिकेवरही प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटविली होती. ‘झी मराठी’ वाहिनीने (पूर्वीची अल्फा मराठी) पूर्णपणे व्यापारीदृष्टय़ा मराठी मनोरंजन विश्वात प्रवेश केला आणि या वाहिनीवरील मालिकांनी प्रत्येकाच्या मनात घर केले. गेल्या काही वर्षांत ‘कलर्स मराठी’ (पूर्वीची ई टीव्ही मराठी), ‘स्टार प्रवाह’ या दोन वाहिन्यांचीही त्यात भर पडली आहे. या सर्व वाहिन्यांवरून मालिकांचा रतीब दररोज घातला जातो. दूरदर्शन असताना मालिकांना १३ आणि जास्तीत जास्त २६ भागांचीच परवानगी मिळायची. खासगी मनोरंजन वाहिन्या आल्या आणि त्यांनी मालिका कितव्या ‘एपिसोड’मध्ये संपवायची याची गणितेच बदलून टाकली. मालिकांचे एपिसोड ‘वाढता वाढता वाढे’या उक्तीप्रमाणे लांबतच गेले. मालिका विशिष्ट एपिसोडनंतर संपविण्याचे बंधन राहिले नसल्याने त्यात पाणी टाकून, उपकथानक जोडून- आणि हे सर्व प्रेक्षकांना आवडते या नावाखाली- मालिकांचे एपिसोड लांबत गेले. १००, १२६, २०० असे होता होता एपिसोडचे हे आकडे काही शे किंवा हजाराच्या घरात पोहोचले. आतही तेच चक्र सुरू आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली. मालिकेतील ‘कैवल्य’, ‘आशू’, ‘सुजय’, ‘अ‍ॅना’, ‘रेश्मा’, ‘मीनल’ हे माजघरातील सर्व जण प्रेक्षकांच्या जणू काही घरातील सदस्यच झाले होते.

तरुण पिढीत विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेली ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तात्पुरती थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मालिका सुरू करतानाच त्याचे सिझन १ आणि सिझन २ करायचे ठरविण्यात आले होते. मालिका कंटाळवाणी होण्यापूर्वीच ती थांबवलेली बरी. त्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच मालिकेने ‘अल्पविराम’ घेण्याचे ठरविले आहे. असाच प्रकार काही वर्षांपूर्वी ‘प्रपंच’ या मालिकेच्या बाबतीत घडला होता. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही मालिकाही प्रेक्षकांना हवीहवीशी वाटत असताना थांबली होती. ‘गुंतता हृदय हे’, ‘लज्जा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ आदी मालिकाही एका ठरावीक टप्प्यानंतर प्रेक्षकांना हव्या असतानाही थांबविण्यात आल्या होत्या. ‘झी मराठी’वरील ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रम मालिकेबद्दलही तसेच म्हणता येईल. रूढार्थाने ‘नक्षत्रांचे देणे’ ही मालिका नव्हती. मराठीतील नाटय़, संगीत, साहित्य आदी कलांमधील निवडक रत्ने निवडून त्यांच्या जीवनाचा आणि कारकिर्दीचा समग्र आढावा गाण्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमात घेण्यात येत होता. ‘नक्षत्रांचे देणे’सारख्या मालिकाबाह्य़ कार्यक्रमालाही अमाप लोकप्रियता मिळाली होती. हा कार्यक्रमही पुढे सुरू ठेवता आला असता पण एका ठरावीक भागानंतर ‘नक्षत्रांचे देणे’ थांबविण्यात आले. या कार्यक्रमाच्या आठवणी प्रेक्षकांनी अद्यापही जपून ठेवल्या आहेत. या कार्यक्रमाच्या ध्वनिचित्रफिती बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. जुन्या चांगल्या मालिका प्रेक्षकांच्या अजूनही मनात घर करून आहेत. ‘स्वामी’, ‘िपपळपान’, ‘लज्जा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘गुंतता हृदय हे’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘गहिरे पाणी’, ‘असंभव’, ‘अग्निहोत्र’ आदी मालिकांची जादू अजूनही कायम आहे. ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, दूरदर्शनवरील ‘दामिनी’ आदी मालिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ‘आभाळमाया’ मराठी मालिकांच्या इतिहासातील खासगी दूरचित्रवाहिन्यांवरील ‘महामालिका’ होती, तर ‘दामिनी’ मालिकेने ‘महामालिके’चा पाया घातला असे म्हणता येईल.

हळुवारपणे उलगडणारे मानवी नातेसंबंध, एकत्र कुटुंबपद्धती, त्यातील कडू-गोड प्रसंग, वास्तवतेच्या जवळ जाणारे संवाद व व्यक्तिरेखा, त्यांचे घरातील सहज वावरणे, त्यांचा पेहराव हे ज्या मालिकांमध्ये असते त्या मालिका सर्वसामान्य प्रेक्षकांना ‘आपल्या’ वाटतात. मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या घरातील होऊन जातात. त्यामुळे आपली मालिका प्रेक्षकांना आवडते, ती अजून सुरू राहावी असे वाटणे हेच खरे तर त्या मालिकेचे यश असते. अर्थात या सगळ्यात मालिकेतील कलाकारांसह मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कथा-पटकथा व संवाद लेखक, मालिकेचे शीर्षकगीत, त्याचे संगीतकार आणि अन्य सर्व संबंधित मंडळींचे महत्त्वाचे योगदान असते. ते नाकारून चालणार नाही. मालिकेत पाणी घालून किंवा उपकथानकांची जोड देऊन मालिकांचे भाग वाढवून ती रेटून नेण्यापेक्षा एका ठरावीक भागानंतर ती थांबविणे केव्हाही श्रेयस्कर असते. ज्या मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना थांबविल्या गेल्या त्याच प्रेक्षकांच्या अद्यापही स्मरणात आहेत व हेच त्या मालिकांचे मोठे यश आहे.

मालिकांच्या यशाचे किंवा त्यात दाखविण्यात येणाऱ्या कथानकाचे गणित हल्ली ‘टीआरपी’वर अवलंबून असते. ‘टीआरपी’च्या लंबकाप्रमाणे मालिका व त्यातील कथानक वळण घेत असते. एखादे रबर ताणून ताणून किती ताणले जाणार, त्यालाही काही मर्यादा आहेच ना. एका मर्यादेच्या पलीकडे गेले की ते तुटणारच. पण जणू त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून बिनधास्तपणे मालिकांच्या भागात पाणी टाकण्यात येऊन ‘एपिसोड’ वाढविले जातात. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांची आजची स्थिती काही अपवाद वगळले तर निव्वळ डोकेदुखी अशीच आहे. तीस मिनिटांच्या मालिकेत १६ मिनिटे जाहिराती, २ मिनिटे आधीच्या भागाचे सार आणि १२ मिनिटे कथानक दाखविले जाते. सर्वच मालिकांमध्ये एकाच वेळी साधारण प्रेम, विवाहबा’ा संबंध, एकत्र कुटुंबातील हेवेदावे, सासू-सून भांडणे, एकमेकांविरोधातील कटकारस्थाने, अंधश्रद्धा, पांचट विनोद हेच सर्रास दाखविले जाते. याच विषयांभोवती मालिका फिरत राहतात. अनेक मालिकांचे विषय चांगले असतात पण भागांची संख्या वाढते आणि मूळ कथानक बाजूला राहून मालिका कुठल्याकुठे भरकटत जाते. आता वाहिन्यांची संख्या वाढल्यामुळे मालिकांची एकूण संख्या, मालिकांचे भाग यात वाढ झाली आहे. कलाकारांना तसेच लेखक, दिग्दर्शक यांना चांगली संधी मिळाली असली तरी अपवाद वगळता मलिकांची गुणवत्ता घसरली आहे. दोन-चार दिवस मालिका पाहिली नाही तरी फारसे काही घडलेले नसतेच.

खरे तर त्याच त्याच चावून चोथा झालेल्या आणि ठरावीक चाकोरीत अडकलेल्या मालिकांपेक्षा काही वेगळ्या विषयांवर मालिका तयार करण्याचे आणि या मालिका ‘प्राइम टाइम’मध्ये प्रसारित करण्याचे धाडस निर्माते आणि दूरचित्रवाहिन्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दाखविण्याची गरज आहे. असे प्रयत्न अगदी झालेच नाहीत असे नाही. पण ते प्रमाण खूप कमी आहे. सर्वजण मळलेल्या वाटेवरूनच जात आहेत.

वेगळ्या वाटेवरून जाण्याचा किंवा आपली नवी वाट निर्माण करण्याचा प्रयत्न अधिक मोठय़ा प्रमाणात झाला पाहिजे. तसे झाले तर मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाईल. मनोरंजनाबरोबरच प्रबोधन होईल. कोणतीही कला ही मनोरंजन न राहता त्यातून प्रबोधनही होणे गरजेचे आहे.

मनात घर करून राहिलेल्या काही मालिका

 • स्वामी
 • चाळ नावाची वाचाळ वस्ती
 • प्रपंच
 • आभाळमाया
 • वादळवाट
 • अवंतिका
 • ४०५ आनंदवन
 • श्रीयुत गंगाधर टिपरे
 • एका लग्नाची दुसरी गोष्ट
 • पिंपळपान
 • एक शून्य शून्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 3:23 am

Web Title: continuously marathi serial stopping
Next Stories
1 मराठमोळ्या अनुजाची हिंदी ‘तमन्ना’!
2 चाहा है तुझको!
3 जिथे प्रेमापेक्षा अश्रू जिंकतात..
Just Now!
X