प्रसिद्ध मुस्लिम बुद्धिवादी आणि समाज सुधारक सर सैयद अहमद खान यांच्या जीवनावर पहिल्यांदाच एका चित्रपटाची निर्मिती होत असून, यात त्यांच्या संपूर्ण जीवनाचे चित्रिकरण केले जाणार आहे. ‘सर सैयद : द मसीहा ऑफ एज्युकेशन’ या नावाने बनत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती व्हिज्युअल कंसेप्ट नावाची निर्मिती संस्था आणि अमेरिकेतील सर सैयद हेरिटेज फाउंडेशन एकत्रितपणे करत आहेत. सर सैयद यांच्या जीवनावर याआधी अनेक महितीपट बनवले गेले आहेत. परंतु, पहिल्यांदाच त्यांच्यावर संपूर्ण चित्रपट बनत आहे.
व्हिज्यु्ल कंसेप्टचे संचालक आणि या चित्रपटाचे निर्माते शोएब म्हणाले, सर सैयद यांच्यावर चित्रपट बनविण्याचा विचार माझ्या मनात अनेक वर्षांपासून होता. या विषयावरची माहिती गोळा करत असताना माझी भेट सर सैयद फाउंडेशनचे संचालक डॉ. मशर्रत अली यांच्याशी झाली. त्याचवेळी हा चित्रपट एकत्रितरित्या बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला.
या चित्रपटाचा पहिला प्रोमो पुढच्या वर्षी २१ जूनला अमेरिकेतील ह्यूस्टन शहरात दाखवला जाईल, ज्यात एएमयूचे कुलपती जमीरूद्दीन शाह यांच्यासह अमेरिका आणि युरोपात राहणारे एएमयूचे माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.