मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मांदियाळीमध्ये एक नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट. २००० साली आलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटामधून प्रियाने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत तिने तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये एक गुणी अभिनेत्री म्हणून कायमच प्रियाकडे पाहिलं जातं. त्याच प्रियाचा आज आज वाढदिवस.

१८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये जन्म झालेल्या प्रियाने प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘आनंदी आनंद’ , ‘शुभंकरोती’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या प्रियाने ‘काकस्पर्श’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा नवा ठसा उमटविला. त्याप्रमाणेच ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटामध्ये प्रभावीपणे काम करुन तिने तिच्यातील अभिनयाची एक वेगळी झलकही दाखवून दिली.

मराठी चित्रपटांप्रमाणेच प्रियाने ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ या हिंदी चित्रपटामध्येही छोटेखानी भूमिका पार पाडली आहे. त्यानंतर ‘अधुरी एक कहाणी’ आणि मग झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ मध्ये केलेल्या निवेदिकेच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली. तसंच ‘नवा गडी.. नवं राज्य’ या मराठी नाटकामध्ये आघाडीच्या भूमिकेत चमकली आहे.