पदार्पणापासून सलग चार हिट चित्रपट देणारी अभिनेत्री आलिया भट्ट बॉलिवूडमधील तिच्या यशामुळे चर्चेचा, तर लोकांमध्ये चेष्टेचा विषय बनली आहे. तिच्या तथाकथित हुशारीबद्दल उठलेल्या वावडय़ा आणि विनोदांचा तिने स्वत:च काही सेकंदाच्या लघुपटातून समाचार घेतला. पण, तेवढय़ावरच ती थांबलेली नाही. आलियाने आणखी एका लघुपटात काम केले आहे आणि त्यातील तिच्या अभिनयाला हॉलिवूड अभिनेता अ‍ॅश्टन कचरने कौतुकोची पावती दिली आहे.
महिलांची सुरक्षा ही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली समस्या आहे. मात्र, ‘क्वीन’ फेम दिग्दर्शक विकास बहल याने याच विषयावर एकदम वेगळा दृष्टिकोन दाखवणारा ‘गोइंग होम’ नावाचा लघुपट बनवला आहे. यामध्ये आलिया भट्टने मुख्य भूमिका केली आहे. कामावरून उशिरा घरी परतणारी तरुणी, तिची गाडी वाटेत बंद पडते. त्या रस्त्यावरून येणारी एकच गाडी तिला दिसते.
काही तरुण या गाडीत बसले आहेत. ती त्यांच्याकडे मदत मागते. मात्र, तिला पाहून तरुणांच्या मनात वाईट विचार सुरू होतात.
गाडी दुरूस्त होत नाही तेव्हा त्यांच्याच गाडीत बसून घर गाठण्याशिवाय तिच्याकडे पर्याय उरत नाही. ती कुठलाही संकोच न बाळगता त्यांच्याबरोबर बसते, बोलते. तिच्यामागे त्यांचे काय कारस्थान शिजते आहे याची कुठलीही कल्पना नसलेली ती अखेर घरी पोहोचते तेव्हा मनापासून त्यांचे आभार मानते. काही मिनिटांच्या या लघुपटात कु ठलेही नाटय़ न घडवता विकास बहलने अचूकपणे यावर भाष्य केले आहे. आलियाचा या लघुपटातला सहजअभिनय ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे आणि हा लघपुट सध्या तरुणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. १७ ऑक्टोबरला हा लघुपट यू टय़ूबवर आल्यापासून २० हजारांहून अधिक हिट्स या लघुपटाला मिळाले आहेत. ‘द टू अँड अ हाफ मॅन’ या हॉलिवूडपटाचा नायक अ‍ॅश्टन कचर यानेही हा लघुपट बघितला. त्याला हा लघुपट आणि आलियाचा अभिनय इतका आवडला की त्याने त्याच्या फे सबुकवर या लघुपटाची लिंक दिली असून जाहीर स्तुतीही केली आहे.