‘कॅप्टन अमेरिके’च्या सीरीजमध्ये काम करणारी हॉलिवूड अभिनेत्री स्कार्लेट जोहानसन या वर्षातली सगळ्यात जास्त कमाई करणारी अभिनेत्री ठरली आहे. फोर्ब्सच्या मते, २०१६ मध्ये स्कार्लेटच्या सिनेमांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे.

स्कार्लेटने यावर्षी ‘कॅप्टन अमेरिकाः सिव्हिल वॉर’ आणि ‘हेल सीजर’सारख्या सिनेमात काम केले आहे. या दोन्ही सिनेमांनी जगभरात बॉक्स ऑफिसवर साधारणतः १२० कोटींची कमाई केली आहे. स्कार्लेटनंतर दुसऱ्या नंबरवर ‘कॅप्टन अमेरिका’चा अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर आणि क्रिस इवांस आहेत. यांच्या सिनेमांनी यावर्षी ११५ कोटी रुपयांची कमाई केली. फॉर्ब्सच्या यादीत मानाचे स्थान मिळाल्याबद्दल स्कार्लेट म्हणाली की, ‘मला फार आनंद होत आहे की माझे सिनेमे जगभरात चांगली कमाई करण्यात यशस्वी झाले.’

https://www.instagram.com/p/BOXlmoDg8k_/

दरम्यान, फोर्ब्सने यंदाची टॉप १०० सेलिब्रेटींची यादी जाहीर केली असून, यात बॉलीवूडचा दबंग सलमान खानने बादशाहाला मागे टाकत अव्वल स्थान मिळविले आहे. मागील वर्षी शाहरुख खान अव्वल स्थानावर होता. फोर्ब्स यादी ही सेलिब्रेटींचे वर्षभरातील उत्पन्न आणि त्यांची प्रसिद्धी यावरून तयार करण्यात येते. या यादीमध्ये लोकप्रियतेमध्ये सलमान दुसऱ्या स्थानावर असून शाहरुखला तिसऱ्या स्थानावर स्थान मिळाले आहे.

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने दोन्ही खानांपेक्षा अधिक लोकप्रियता मिळवत लोकप्रियतेच्या वर्गवारीत अव्वल स्थान मिळविले आहे. उत्पनाच्या बाबतीत सलमान अव्वल स्थानी आहे. २७०.३३ कोटींची कमाई करत सलमानने सर्वाधिक कमाई केली आहे. तर शाहरुख खान (२२१.७५ कोटी) इतकी आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने १३४.४४ कोटींची कमाई करत तिसरे स्थान मिळविले आहे. सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘सुलतान’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये देखील सलमान खान गलेलठ्ठ मानधन घेऊन सूत्रसंचालन करताना दिसत आहे.