‘माय नेम इज बॉण्ड.. जेम्स बॉण्ड’ या आपल्या अनोख्या शैलीत स्वत:ची ओळख करून देणारा हा अ‍ॅक्शन स्टार गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. १९५३ साली इयान फ्लेमिंग यांच्या लेखणीतून निर्माण झालेली ही ब्रिटिश गुप्तहेर व्यक्तिरेखा आजवर बॅरी नेल्सन, शॉन कॉनरी, पियर्स ब्रॉसनन, डॅनियल क्रेग यासारख्या अनेक सुपरस्टार कलाकारांनी साकारली. परंतु चाहत्यांच्या मनात या व्यक्तिरेखेबाबत नेहमीच संभ्रम राहिला आहे. प्रत्येक नवीन पिढीला त्यांनी पाहिलेला बॉण्ड हा आधीपेक्षा नेहमीच श्रेष्ठ वाटत राहिला. त्यामुळे आज तब्बल सहा दशकांनंतरही सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा ‘जेम्स बॉण्ड’ अद्याप सापडलेला नाही.

सुरुवातीला चाहत्यांमध्ये असलेला हा वादविवाद बॉण्डपटात काम करणाऱ्या कलाकाराची उंची किती असावी, त्याच्या डोळ्यांचा रंग, त्याची अभिनय शैली, चित्रपटातील अ‍ॅक्शनदृश्ये, तो कलाकार अमेरिकन असावा की ब्रिटिश यांसारख्या मिष्किल विषयांवर होत असे. अलीकडच्या काळात या सौम्य प्रकारच्या वादाला आता वर्णद्वेष आणि स्त्रियांचे लैंगिक शोषण या गंभीर मुद्दय़ांची किनार लागली आहे.

लेखक इयान फ्लेमिंग यांनी ‘जेम्स बॉण्ड’च्या निर्मिती दरम्यान तो गौरवर्णीय असावा, त्याचे डोळे निळे असावे, त्याची उंची किमान ६ फूट असावी असे काही ठोकताळे मांडले होते. आणि आजवर तयार झालेल्या प्रत्येक बॉण्डपटात दिग्दर्शकांनी लेखकाच्या या नियमांचे काटेकोरपणे पालन केलेले दिसते. यापुढे ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी एखाद्या अभिनेत्रीला किंवा कृष्णवर्णीय कलाकाराला संधी द्यावी अशी मागणी हॉलीवूड सिनेसृष्टीत एद्रीस एल्बा, चॅडविक बोसमन, अँथोनी मॅकी, हॅले बेरी, केरी वॉशिंग्टन यांच्यासारखे काही कलाकार करत आहेत. त्यांच्या मते ‘जेम्स बॉण्ड’ या व्यक्तिरेखेने आजवर अनेक स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच प्रत्येक बॉण्डपटात कृष्णवर्णीयांना नकारात्मक व गौरवर्णीयांना सकारात्मक भूमिका दिल्या जातात. आणि हा त्यांच्यावर केला जाणारा अन्याय आहे. तसेच बॉण्डपटांच्या माध्यमातून स्त्रिया व कृष्णवर्णीयांच्या हक्कांना डावलणाऱ्या समाजातील विकृत शक्तींना प्रोत्साहन दिले जाते असे काही गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. यावर बॉण्डपटाची निर्माती ‘ईओएन प्रॉडक्शन कंपनी’तर्फे याबाबात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.