24 February 2019

News Flash

सेलिब्रिटी रेसिपी : करंज्यांना मिळाला फुलवाचा टच

सर्वांच्याच आवडीचा पदार्थ

फुलवा खामकर

सध्या दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तसं पाहिलं तर दिवाळीला सुरुवातही झाली आहे. कारण, वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते असं म्हणतात. यंदा सण इतक्या पटापट आल्यामुळे गृहिणींची चांगलीच धांदल उडतेय. त्यातही दिवाळीच्या फराळासाठीची लगबग, तो नीट होतोय की नाही यासाठी जीवाला लागून राहिलेली हुरहूर या साऱ्या गोष्टी सध्या घराघरात पाहायला मिळत आहेत. अशा या सणाच्या शुभमूहुर्तावर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ काही पाककृती तुमच्या भेटीला आणत आहे. ह्या पाककृती तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींनी सांगितल्या आहेत.

दिवाळीत लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या या सर्व पदार्थांची रेलचेल असतेच. त्यातही करंज्या खूप कमी लोकांना आवडतात. पण याच करंज्या जर ओल्या नारळाच्या असतील तर ते आवडीने खाल्ले जातात. विशेष म्हणजे ओल्या नारळाच्या करंज्या बनवतानाच त्याच साहित्यातून उकडीचे मोदकही बनवले जाऊ शकतात. त्यामुळे जाणून घेऊया फुलवा या पदार्थाबद्दल काय म्हणतेय…

त्यासाठी लागणारं साहित्य आहे-

पाऊण कप मैदा
पाव कप रवा
१ टिस्पून साजूक तूप, पातळ केलेले
१/२ ते पाऊण कप दूध
तळण्यासाठी तेल

सारणासाठी साहित्य-

सव्वा कप खोवलेला ओला नारळ
पाऊण कप किसलेला गूळ
१/२ टिस्पून वेलची पूड

कृती-

– गूळ व नारळ एकत्र करून पातेल्यात, मध्यम आचेवर शिजवावे. वेलचीपूड घालावी आणि घट्टसर मिश्रण करावे.
– करंजीच्या आवरणासाठी एका भांड्यात रवा आणि मैदा एकत्र करावा. तूप कडकडीत गरम करून मोहन घालावे. थोडे थंड झाले कि मोहन घातलेले तूप सर्व मैद्याला लागेल असे मिक्स करावे. अंदाजा घेत गार दूध घालावे आणि घट्ट मळून घ्यावे. थोडा वेळ झाकून ठेवून द्यावे.
– १५-२० मिनिटांनी दूधाचा हबका मारून पीठ जरा कुटून घ्यावे. पिठाचे एकेक इंचाचे गोळे करून घ्यावेत.
– त्यानंतर गोल आणि पातळसर पुरी लाटून घ्यावी. मध्यभागी एक चमचाभर नारळाचे सारण ठेवावे. पुरीच्या अर्ध्या कडेला किंचीत दूध लावावे म्हणजे दोन्ही कडा निट चिकटतील आणि तळताना करंजी फुटणार नाही. उरलेली रिकामी अर्धी बाजू दूध लावलेल्या बाजूवर आणून चिकटवावी. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. कातणाने अधिकचे पीठ कापून घ्यावे.
– तळणीसाठी तेल गरम करावे. मध्यम आचेवर करंज्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
– हेच सारण वापरून मोदकाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ घेऊन उकडीचे मोदकही बनवता येतील.

शब्दांकन- स्वाती वेमूल

swati.vemul@indianexpress.com

First Published on October 17, 2017 4:35 am

Web Title: marathi celebrity choreographer phulwa khamkar sharing special recipe how to make coconut karanji and modak