दाक्षिणात्य चित्रपटांमधील सुपरस्टार नागार्जुन बऱ्याच वर्षांनी बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या बिग बजेट चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अमिताभ बच्चनसुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाची स्टारकास्ट पाहता प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता निर्माण झाली आहे.

जवळपास २५ वर्षांपूर्वी नागार्जुनने ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘खुदा गवाह’, ‘क्रिमिनल’ आणि ‘जख्म’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने भूमिका साकारली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘LOC कारगील’ या चित्रपटानंतर तो आता बऱ्याच वर्षांनी ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.

वाचा : ‘संजू’नंतर रणबीरला लागली लॉटरी?

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्यांना हिंदी चित्रपटात काम करण्याच इच्छा होती. मात्र ते चांगल्या पटकथेच्या प्रतिक्षेत होते. अखेर ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने त्याला ही संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे बिग बीसुद्धा स्क्रिन शेअर करणार असल्याने नागार्जुनने निर्मात्यांना लगेच होकार कळवला आहे.

पुढील आठवड्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून त्यासाठी नागार्जुन मुंबईला येणार असल्याचं कळतंय. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता असून पुढच्यावर्षी १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.