भारतात ओटीटी माध्यमांची एकच लाट आली आहे. या नव्या माध्यमाचे लोकांनी भरभरून स्वागत करायला हवे. ओटीटी माध्यमांनी प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण आशय उपलब्ध करून दिला हे जसे खरे आहे, तसेच चित्रपट क्षेत्रावर काही थोड्याच लोकांची असलेली मक्ते दारीही या माध्यमाने संपवली आहे. ओटीटीमुळे नवीन कथांबरोबरच नवनव्या कलाकारांनाही संधी मिळते आहे. त्यामुळे आपल्याकडे लोकांनी ओटीटी माध्यमांना जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायला हवा, असे प्रतिपादन अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने केले.  ‘झी ५’ ही भारतीय ओटीटी वाहिनी आता अमेरिकी बाजारपेठेत प्रवेश करती झाली आहे. या वाहिनीचे युएसमधील उद्घघाटन आभासी सोहळ्याच्या माध्यमातून प्रियांकाच्या हस्ते करण्यात आले. ‘झी ५ ग्लोबल’च्या मुख्य व्यवसाय अधिकारी अर्चना आनंद यांनी या सोहळ्यात वाहिनीच्या उद्घाटनाची घोषणा के ली. या वाहिनीच्या माध्यमातून अमेरिके तील भारतीय आणि आशियाई प्रेक्षकांना मालिकांच्या बरोबरीनेच भारतीय चित्रपट आणि वेबमालिका पाहता येणार आहेत. हिंदी चित्रपट क्षेत्रात ठरावीक  संख्येतच लोकांना संधी होती. ही दीर्घकाळची मक्ते दारी मोडून काढत ओटीटी माध्यमांनी नवीन दिग्दर्शक, लेखक, कलाकारांना मनोरंजन उद्योगात येण्याची संधी दिली आहे, याकडे तिने लक्ष वेधले. ओटीटी माध्यमांमुळे चित्रपटगृहे लयाला जाणार, असा एक सूर आळवला जातो आहे. प्रियांकाने मात्र याबद्दल असहमती दर्शवली. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा अनुभवच वेगळा आहे, त्याच्याशी इतर कु ठल्याच माध्यमाची तुलना होऊ शकत नाही, असे तिने स्पष्ट के ले.

पुन्हा एकदा ‘शिवप्रवाह’

 

स्टार प्रवाहवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. असेच एक दमदार शिवपर्व घेऊन पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनी सज्ज झाली आहे. येत्या २६ जुलैपासून रात्री १० वाजता  ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जिवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांच्या कार्याला या मालिकेतून उजाळा दिला जाईल. अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असून अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसतील. तर अभिनेता कश्यप परुळेकर नेताजी पालकरांच्या भूमिकेत आहे. मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशनने केली आहे.  ‘छत्रपती शिवाजी महाराज साकारणे हे माझे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झाले. ही भूमिका साकारताना जबाबदारीचे भान नक्कीच आहे. ,’ अशी प्रतिक्रिया भूषण प्रधान यांनी दिली.   बाजीप्रभू देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अजिंक्य म्हणाले, ‘माझ्या कारकीर्दीची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे.’

 

महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्ने होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा शिलेदारांची गोष्ट सांगणारी आमची मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. – सतीश राजवाडे, कार्यक्रम प्रमुख, स्टार प्रवाह