पाकिस्तानी चित्रपटसृष्टीचा विकास साधायचा असेल तर भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात पूर्णपणे बंदी घालायलाच हवी अशी मागणी पाकिस्तान चित्रपट निर्माता संघटनेनं (PFPA) केली आहे. जर भारतात पाकिस्तानचे चित्रपट प्रदर्शित होत नसतील तर मग पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करायला का परवानगी द्यावी असा सवाल चौधरी इजाझ कमरान यांनी केला आहे. पाकिस्तान चित्रपट निर्माता संघटनेचं ते वरिष्ठ अधिकारी आहेत.

भारतीय चित्रपट प्रदर्शित करून चित्रपट वितरक मोठा नफा कमावतात पण यामुळे आपल्या चित्रपटसृष्टीची प्रगती मात्र होत नाही. भारतीय चित्रपटामुळे स्थानिक चित्रपटांनाही वाव मिळत नाही. त्यामुळे भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यानं केली आहे. तसेच  यासाठी  लाहोर उच्च न्यायालयात PFPA तर्फे  याचिकाही दाखल करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बंदीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनादेखील ते पत्र लिहिणार आहे.

या वर्षभरात ‘पॅडमॅन’, ‘विरे दी वेडिंग’, ‘मुल्क’, ‘राझी’ या चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पण भारतीय चित्रपटामुळे वितरक चांगली कमाई करतात, वितरकांचा तोटा भरून निघतो त्यामुळे चित्रपटांवर बंदी घालणं पूर्णपणे चुकीचं आहे असं पाकिस्तानमधील वितरकांचं म्हणणं आहे.