रणवीर कपूर आजच्या घडीचा बॉलिवूडमधला टॉपचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘पद्मावत’, ‘सिम्बा’ या २०१८ मध्ये आलेल्या त्याच्या सुपरहिट चित्रपटामुळे रणवीर आता बॉलिवूडमधल्या सुपरस्टार हिरोंच्या यादीत गणला जातो. मात्र बॉलिवूडमध्ये येण्यासाठी त्याच्या वडिलांनी दिग्दर्शक आदित्य चोप्राला पैसे दिले होते अशा चर्चा दबक्या आवाजात रंगू लागल्यानं रणवीर कमालीचा दुखावला आहे.

रणवीरनं यशराज फिल्मच्या ‘बँड बाजा बारात’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र या चित्रपटात महत्त्वाची भूमिका रणवीरच्या वाट्याला यावी यासाठी रणवीरच्या वडिलांनी आदित्य चोप्राला १० लाख रुपये दिले होते अशा चर्चा होत्या. मात्र रणवीरनं हे वृत्त नाकारलं आहे. बॉलिवूड पदार्पणासाठी माझ्या वडिलांनी कोणालाही लाच दिली नाही असं म्हणत रणवीरनं या वृत्ताचं खंडन केलं.

‘मी मेहनत करून या क्षेत्रात स्थान मिळवलं आहे. यासाठी माझ्या वडिलांनी कोणालाही पैसे दिले नाही. या निव्वळ अफवा आहेत. जेव्हा या अफवा माझ्या कानावर येतात तेव्हा मला खूप दु:ख होतं. काही होतकरू कलाकार मला मेसेज करून किती पैसे द्यावे लागतात असं विचारतात पण मी त्यांना नेहमी सांगतो की या केवळ अफवा आहेत यावर कधीही विश्वास ठेवू नका. ‘ असं रणवीर म्हणाला.

रणवीरचा ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच चालला होता. या चित्रपटानंतर रणवीरनं यशराज फिल्मसोबत ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’, ‘बेफ्रीक्रे’ सारख्या चित्रपटात काम केलं.