सुंदर दिसण्यासाठी, बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी आजकाल बरेच कलाकार प्लास्टिक सर्जरी करतात. अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी, श्रुती हसन, वाणी कपूर, कंगना रणौत यांसारख्या अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली आहे. बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी अभिनेत्रींवर सतत सुंदर दिसण्याचा दबाव असतो. नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने प्लास्टिक सर्जरी आणि या दबावाबाबत तिचं मत व्यक्त केलं आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये तिने वडिल सैफ अली खानसोबत हजेरी लावली होती. या एपिसोडची काही पडद्यामागील दृश्य समोर आली आहेत. त्यात सारा प्लास्टिक सर्जरीबद्दल बोलताना दिसते.

‘बॉलिवूडमध्ये सुंदर दिसण्यासाठी तुझ्यावर दबाव होता का,’ असा प्रश्न करणने साराला विचारला. त्यावर ती म्हणाली, ‘तुम्ही बरोबर बोलत आहात असं मी म्हणू शकते का? हा दबाव सतत असतोच याची सवय आता आपल्याला करून घ्यावी लागेल. कारण सध्याचा काळच तसा आहे. तुम्ही जसे आहात तसे योग्य आहात, हा आत्मविश्वास प्रत्येकाला असला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की तुमचं वजन ९६ किलो झालंय, आणि त्यातही तुम्ही खूश रहा. अशा परिस्थितीत तुम्ही व्यायाम करा, फिट राहा. मात्र प्लास्टिक सर्जरीसारख्या गोष्टींना बळी पडू नका. तुम्ही स्वत:शी, तुमच्या अंतर्मनाच्या सुंदरतेशी खूश असलं पाहिजे. तसं नसल्यास तुम्हाला कमी लेखणारे पाचशे लोक तुम्हाला इथे भेटतील,’ अशी भूमिका तिने मांडली.

इंडस्ट्रीतील बरेच लोक तुम्हाला कमी लेखण्याचा किंवा खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्हाला स्वत:वर पूर्ण विश्वास असायला हवा, असंही ती पुढे म्हणाली.