‘सुपरहीरो’ हा चित्रपट प्रकार हॉलीवूड आणि पाश्चात्य जगतात खूप लोकप्रिय ठरला. कॉमिक पुस्तकांमधील अनेक सुपरहीरोंवर भव्य चित्रपट गाजले. राकेश रोशन यांनी हिंदीतही ‘क्रिश’ मालिकेद्वारे सुपरहीरो साकारला. आता ‘बाजी’ नावाचा मराठी सुपरहीरो अवतरणार आहे. ‘इक्बाल’ आणि ‘वेलकम टू सज्जनपूर’ या चित्रपटांद्वारे हिंदीत आपले पाय रोवणारा अभिनेता श्रेयस तळपदे हा ‘बाजी’ साकारणार आहे, अशी माहिती या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ‘पुणे ५२’ द्वारे मराठीत दिग्दर्शकीय पदार्पण करणारे निखिल महाजन यांनी दिली.
‘आई शप्पथ’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केलेला श्रेयस तळपदे ‘बाजी’द्वारे मराठी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हॉलीवूड व पाश्चात्त्य जगतात गाजलेल्या सुपरहीरो या चित्रपट प्रकाराला मानाचा मुजरा म्हणून आपण हा चित्रपट करणार असलो तरी त्या चित्रपटांमधील सुपरहीरोसारखे कोणतेही साम्य आपल्या ‘बाजी’मध्ये नसेल. ‘क्रिश थ्री’ आला म्हणूनही आपण मराठीत सुपरहीरो साकारायचा असे काहीच ठरविले नाही. तर मला आता माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर छान मजेदार गोष्ट आपल्या मातीतील सुपरहीरोची गोष्ट सांगावी असे तीव्रतेने वाटले, म्हणूनच हा चित्रपट करणार आहोत, असे महाजन यांनी नमूद केले. प्रेमासाठी लढणारा अगदी तुमच्या-माझ्यात दडलेला हा बाजी असेल, असेही ते म्हणाले. दार मोशन पिक्चर्स, सुहृद गोडबोले यांचे इंडियन मॅजिक आय आणि निखिल महाजन यांची ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स अशा तीन चित्रपट संस्थांच्या वतीने ‘बाजी’ चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.