रेश्मा राईकवार

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतरच्या काळात चित्रीकरणाला पहिल्यांदा सुरुवात करणारा अभिनेता स्वप्निल जोशी दीड वर्षानंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या दीड वर्षाच्या कालावधीत करोना आणि टाळेबंदीमुळे जवळपास सगळीच चित्रपटसृष्टी जिथल्या तिथे थांबली होती. मात्र चित्रीकरणावर आलेला निर्बंधांचा काही काळ सोडला तर दरम्यानच्या काळात स्वप्निलने एका वेबमालिके चे चित्रीकरण पूर्ण केले. त्याची ‘समांतर’ ही वेबमालिका गेल्या वर्षी प्रदर्शितही झाली आणि आता त्याचे दुसरे पर्वही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे करोनामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि अनिश्चिततांचे सावट चित्रपटसृष्टीवर कायम असतानाही स्वप्निलचा ‘बळी’ हा चित्रपट १५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. टाळेबंदीनंतर प्रदर्शित होणारा ‘बळी’ हा मराठीतील पहिला मोठा चित्रपट असणार आहे.

चित्रपटगृहे अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. एकीकडे पुन्हा करोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत आपला चित्रपट प्रदर्शित करणे हा निर्मात्यांच्या आणि एक कलाकार म्हणून आपल्या दृष्टीनेही धाडसी निर्णय असल्याचे स्वप्निल मान्य करतो. या परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित करणे खरोखरच कठीण आहे. परिस्थिती पूर्वपदावर यायला अजून काही महिन्यांचा कालावधी जावा लागेल हे खरं आहे, मात्र गेलं वर्षभर आपण सगळेच एका तणावाखाली होतो. आता कु ठे त्या ताणातून बाहेर पडून हळूहळू का होईना सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न के ला जातो आहे, त्याच पद्धतीने मनोरंजन व्यवसायही पुन्हा नव्याने सुरू होणं हे गरजेचं आहे, असं मत स्वप्निल व्यक्त करतो. आता काही मराठी चित्रपटांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, काही हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत; पण आता हे धाडस निर्मात्यांनी-कलाकारांनी करायलाच हवं. काहीशा आक्रमकतेनेच चित्रपट व्यवसाय सुरू क रायला हवा, असं तो म्हणतो.

टाळेबंदीच्या काळात चित्रीकरणाला परवानगी मिळाली तेव्हाच स्वप्निलने ‘समांतर’च्या चित्रीकरणाला सुरुवात के ली होती. दुसरीक डे ‘झी मराठी’वर ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पाहुणा परीक्षक म्हणूनही तो लोकांसमोर येऊ लागला. त्या वेळी चित्रीकरण करताना मनात प्रचंड धास्ती होती, असं तो सांगतो. करोनामुळे रोज रुग्ण दगावत होते. सरकारने अशा परिस्थितीतही आवश्यक ते परवाने घेऊन आणि नियमांचे पालन करून चित्रीकरणाला परवानगी दिली होती. मात्र तरीही सतत अनिश्चित आणि ताणाच्या परिस्थितीत चित्रीकरण करावं लागत होतं, अशी आठवण तो सांगतो. अनेकदा आवश्यक त्या परवानग्या घेतलेल्या असल्या तरी चित्रीकरणाच्या आदल्या रात्री ११ वाजेनंतरही प्रशासनाकडून अमुक एका भागात रुग्ण सापडले आहेत, तिथे चित्रीकरण करू नका, असा निरोप यायचा. सतत एक टांगती तलवार सेटवर काम करणाऱ्यांच्या डोक्यावर असायची. अमुक एका सेटवर इतक्या कलाकारांना करोनाची लागण झाली, असेही सतत ऐकू  यायचे. त्यामुळे भीती होती; पण मला निर्मात्यांचं कौतुक करावंसं वाटतं. सरकारचं काम हे नियमावली जाहीर करणं होतं, मात्र त्याचं काटेकोर पालन करून चित्रीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी ही निर्मात्यांवर होती आणि आमच्या दोन्ही निर्मात्यांनी ती चोख पार पाडली. सेटवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं, दर दोन तासांनी कलाकार-तंत्रज्ञ सगळ्यांची तपासणी करणं, नियमावलीत दिलेल्या गोष्टींची व्यवस्था करणं हे खर्चीक होतं आणि त्यावर लक्ष ठेवणं हेही जिकिरीचं होतं; पण निर्मात्यांनी सगळ्या अडीअडचणींवर मात करत चित्रीकरण सहज होईल यावर भर दिला होता, असं तो म्हणतो.

‘समांतर’ ही वेबमालिका दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि अभिनेता स्वप्निल जोशी या जोडीने के लेली मालिका म्हणून चांगलीच गाजली. ‘समांतर २’च्या निमित्ताने स्वप्निलने पहिल्यांदाच दिग्दर्शक समीर विद्वांसबरोबर काम के ले आहे. हे दोघेही ताकदीचे दिग्दर्शक आहेत, असं तो सांगतो. सतीश हा जिवलग मित्र आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करतानाचा अनुभव वेगळाच असतो. समीर विद्वांसबरोबर पहिल्यांदा काम के लं आहे, पण विषयावर पकड असणारा असा हा दिग्दर्शक आहे. पहिल्या पर्वापेक्षा दुसरे पर्व अधिक मजेदार असेल, असं तो म्हणतो. कारण पहिल्या पर्वात सोडलेले अनेक संदर्भ, अनेक प्रश्न हे या पर्वात उलगडणार आहेत. त्या पर्वात मारून ठेवलेल्या गाठी या नवीन पर्वात सोडवायच्या असल्याने हा भाग अधिक रंगतदार असल्याचे त्याने स्पष्ट के ले.

गेलं वर्ष-दीड वर्ष चित्रपट व्यवसायासाठी फार अवघड गेलं आहे, त्यामुळे आता जे चित्रपट प्रदर्शित होतील ते यशस्वी होतील की अयशस्वी ठरतील, हा प्रश्न महत्त्वाचा उरलेला नाही, असं तो म्हणतो. लोकांना आपला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात यावंसं वाटतंय की नाही, हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी सातत्याने प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपट देत राहणं महत्त्वाचं आहे. टाळेबंदीच्या या काळात कितीही समस्या आल्या तरी काम करत राहणं, व्यवसायाची घडी पुन्हा बसवण्यासाठी प्रयत्न करत राहणं ही सगळ्यांमधली जिद्द, जे क रू ते उत्कृष्टच करू ही भूक नव्याने सापडली, असं स्वप्निल सांगतो. काम करण्याची ही ऊर्जाच येत्या काळात आपल्या सगळ्यांसाठी संजीवनी ठरणार असल्याचा विश्वासही त्याने  व्यक्त के ला.

चाहते तक्रार तरी करणार नाहीत…

‘बळी’च्या निमित्ताने स्वप्निल पहिल्यांदाच भयपटात काम करताना दिसणार आहे. याआधी भयपट कधीच के ले नव्हते, त्यामुळे ‘बळी’ चित्रपट करताना आपली पाटी कोरी होती, असं तो म्हणतो. दिग्दर्शक विशाल फु रीया यांनीच समजून घेत, समजावून सांगत माझ्याकडून काम करून घेतले आहे. त्यांच्या दिग्दर्शनात एक शिस्त आहे. मी एका उत्तम विद्याथ्र्याप्रमाणे त्यांनी शिकवल्यानुसार चोख काम के ले आहे, असं तो सांगतो. त्यामुळे भयपटातील माझी भूमिका यशस्वी होईल की नाही हे आत्ताच सांगता येत नाही; पण गेल्या काही वर्षांत ‘भिकारी’, ‘रणांगण’, ‘मोगरा फु लला’ आणि आता ‘बळी’ असे वेगवेगळ्या आशयशैलीतील चित्रपट मी के ले आहेत. त्यामुळे निदान स्वप्निल जोशी रोमँटिक सोडून इतर काहीच करत नाही, अशा तक्रार तरी कोणी करणार नाही, असं तो गमतीने म्हणतो.

चित्रपटकर्मींनीच लोकांना चित्रपटगृहांपर्यंत आणायला हवे…

गेले काही महिने एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित होईल आणि लोक चित्रपटगृहात येतील, या एकाच तर्कावर चित्रपट व्यवसायाचे गणित अडकू न पडले आहे. प्रेक्षक चित्रपटगृहात कधी येतील? याची वाट निर्माते पाहतायेत. तर एखादा मोठा चांगला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच प्रेक्षक चित्रपटगृहात येतील, असे चित्रपटगृह व्यावसायिकांना वाटते आहे. ही कोंडी प्रेक्षक फोडणार नाही आहेत, ते काम चित्रपटकर्मींनाच करावे लागणार आहे. एखादा चांगला चित्रपट प्रदर्शित करून लोकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्याची जबाबदारी ही आम्हा चित्रपटकर्मींचीच आहे, असं स्वप्निल सांगतो.