|| मितेश जोशी

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील संत तुकारामांच्या आयुष्यावर चितारलेली लोकप्रिय मालिका ‘तू माझा सांगाती’ आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. लवकरच या मालिकेचे १३०० भाग पूर्ण होणार आहेत. गेली चार र्वष ही मालिका प्रेक्षकांचं प्रबोधन करते आहे. संत तुकारामांची व्यक्तिरेखा जगवत असलेला अभिनेता चिन्मय मांडलेकरला त्याच्या चार वर्षांच्या प्रवासात नाना अनुभव आले. तुकोबांच्या जीवनपरिचयासोबतच, त्यांची दिव्य शिकवण, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चिन्मयने जवळून अभ्यासला व अनुभवला. त्यानिमित्ताने चिन्मयशी केलेली ही खास बातचीत.

  • चार वर्षांपूर्वी ही मालिका आणि तुकारामांची व्यक्तिरेखा स्वीकारावीशी का वाटली ?

मला माझी जी प्रतिमा तोवर निर्माण झाली होती ती कुठेतरी तोडायची  होती. ‘तू माझा सांगाती’ या मालिकेच्या अगोदर मी ‘झी मराठी’ या वाहिनीवर ‘तू तिथे मी’ मालिकेत नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली होती. एक दैनंदिन मालिका केल्यानंतर मला लगेच पुन्हा मालिका करायची नव्हती. मालिकेतील व्यक्तिरेखांसाठी जेव्हा ऑडिशन सुरू होतं तेव्हा एक गमतीशीर किस्सा घडला. व्यक्तिरेखेसाठी लूक टेस्ट झाल्यावर संगीत कुलकर्णी मला येऊन म्हणाले होते की, तू या व्यक्तिरेखेसाठी कोणालाच नको आहेस. तू वाहिनीला देखील नापसंत आहेस व निर्मात्याला देखील. त्याचं हे बोलणं ऐकून मी केवळ शांत होतो. काही दिवसांनंतर मला दिग्दर्शकाचा फोन आला आणि त्याने तुकोबांच्या व्यक्तिरेखेसाठी तुझ्या नावावर शिक्कामोर्तब करायचं ठरलंय तर तुला ही व्यक्तिरेखा साकारायला आवडेल का, असा प्रश्न विचारला. क्षणाचाही विलंब न करता मी होकार कळवला आणि एक आव्हान म्हणून मी तुकोबांची मालिका स्वीकारली.

  • चार वर्षांत कोणकोणती आव्हाने आली?

अनेक आव्हाने होती. सर्वप्रथम मला प्रेक्षकांना माझी नवीकोरी प्रतिमा पटवून द्यायला लागली, कारण ‘मोरया’ व ‘झेंडा’ या चित्रपटातील आणि ‘तू तिथे मी’ या मालिकेतील माझी नकारात्मक प्रतिमा तोडून तुकोबांची सात्विक, सकारात्मक व शांत प्रतिमेत प्रेक्षकांनी मला स्वीकारणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. ज्या आव्हानात मी खरोखर जिंकलो. दुसरं आव्हान म्हणजे सेटवर अनवाणी फिरणं. तुकोबांचा काळ असल्यामुळे त्या काळी चप्पल हा प्रकार नाही. त्यामुळे सेटवर मी पोहोचलो की माझ्या पायातली चप्पल गायब व्हायची. प्रसंग नसला तरीही मी इथे तिथे अनवाणी फिरायचो. एकदा उन्हाळ्यात दुपारच्या रणरणत्या उन्हात माझं चित्रीकरण सुरू होतं. मला काही अंतर चालायचं होतं. पायात चप्पल नसल्याने तेव्हा माझे पाय जबरदस्त भाजले होते. या आणि अशा अनेक प्रसंगांमध्ये मी तुकोबांना त्या काळी झालेल्या वेदना अनुभवल्या. तिसरं आव्हान माझ्या दृष्टीने म्हणशील तर एकाच व्यक्तिरेखेत सलग चार र्वष वावरणं हे म्हणता येईल.

  • तुकोबांच्या आचारविचाराचा प्रभाव खऱ्या आयुष्यावर पडला का?

डोळसपणे आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी मला या व्यक्तिरेखेने दिली. संत तुकाराम हे केवळ संत नव्हते तर ते एक समाजसुधारकदेखील होते. त्या काळी त्यांनी आपल्या विचारांच्या सामर्थ्यांवर अंधश्रद्धेवर घणाघाती हल्ला केला होता. आजच्या काळात अंधश्रद्धेमुळे घडणाऱ्या घटना पाहता तुकोबांचे ग्रंथ सर्वानीच वाचायलाच हवेत असं मला वाटतं. ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे’, या उक्तीचा अवलंब करत मी देवळात देवाच्या दर्शनासाठी जाणं बंद केलं.

  • मालिकेचा शेवटचा टप्पा कसा असणार आहे?

गेल्या चार वर्षांत मालिकेत अनेक पर्व उलगडली गेली. आता तुकोबांना परमात्मारूपी विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. ज्याचं चित्रीकरण सध्या सुरू आहे. मालिकेची सांगता विठ्ठल तुकोबा भेटीने होणार आहे.

  • ‘तू माझा सांगाती’नंतर पुढे काय ?

तीन वर्षांपूर्वी माझं व्यावसायिक रंगभूमीवर ‘समुद्र’ हे नाटक आलं होतं. जे काही कारणास्तव थांबलं होतं. ते नाटक पुन्हा एकदा नव्या अंगात व नव्या ढंगात २७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात स्पृहा जोशीची जागा हरहुन्नरी विनोदी अभिनेत्री श्रेया बुगडे घेणार आहे. मालिका संपल्यानंतरचा पुढचा काही वेळ आता ‘रंगभूमीसाठी’.