16 December 2017

News Flash

नटांचा दिग्दर्शक

एकाच वेळेला बरीच नाटकं पूर्ण ताकदीनिशी रंगमंचावर आणण्यात त्यांचा हातखंडा.

प्रसाद लाड | Updated: August 13, 2017 1:03 AM

विजय केंकरे सर मात्र ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ असेच काहीसे.

काही वेळा नाटकांच्या आणि कुस्तीच्या तालमींमध्ये फारसा फरक पाहायला मिळत नाही. आरडा-ओरड, मारून-मुटकून, हेकेखोर पद्धतीने दिग्दर्शक नाटक बसवतानाही काही जणांनी पाहिलं असेलही. पण सरतेशेवटी नाटक ही एक कला आहे. नट हे व्यावसायिक असतात आणि त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, हे दिग्दर्शन करताना डोक्यात ठेवून काम करणारे दिग्दर्शक मोजकेच. पण त्यांच्या तालमीत फार गप्पा रंगतात. पण त्या गप्पांच्या फडामधून नाटक कधी बसतं, हे त्या नटांनाही कळत नाही. नाटकाचा विषय कोणताही असो, ते विनोदी, गंभीर, सस्पेन्स, नाटकाच्या पोत जसं तसं त्यांची शैली बदलते. तालमीत मी मास्तरगिरी करत नाही, ती करायची असेल तर विद्यापीठात शिकवताना, अशी पिंक ते सहजपणे टाकतात. नाटकामधून आपल्याला काय अभिप्रेत आहे हे त्या नटांना सांगतात. आणि त्यांच्याकडून ते काम काढून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. तेही अगदी हलक्याफुलक्या वातावरणात. शिवीगाळ नाही, हेकटपणा नाही, मी कुणीतरी असल्याचा आविर्भाव तर नाहीच नाही.

खरंतर नाटक त्यांच्या घरात लहानपणापासूनच. दामू केंकरे त्यांचे वडील. घर कलानगरध्ये. त्यामुळे लहानपणापासून घरी कलाकारांची ऊठबस नित्याचीच. साहित्य मंदिरात बरंच काही ते शिकले. सुरुवातीच्या काळात ‘ऑथेल्लो’सारखं नाटकही केलं. त्यानंतर आत्तापर्यंत विविध रंगछटा असलेली नाटकं त्यांनी रंगभूमीवर आणली. एकाच वेळेला बरीच नाटकं पूर्ण ताकदीनिशी रंगमंचावर आणण्यात त्यांचा हातखंडा. प्रत्येक नाटकाचा रंग वेगळा, पण विजय केंकरे सर मात्र ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ असेच काहीसे.

केंकरे हे फार अभ्यासू दिग्दर्शक आहेत, त्यांचा नाटय़शास्त्राचा अभ्यास आहे. देशाबाहेरची नाटकं त्यांनी पाहिली आहेत, वाचली आहेत. त्यांना वेगवेगळ्या नाटकाच्या शैली माहिती आहेत, त्यांना त्याचा अभ्यास आहे. त्यामुळे व्यावसायिक नाटक सोप्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचू शकेल, यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. मुख्यत: काही महत्त्वाची दृश्य रंगभूमीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बसवली जातात, पण केंकरे तेच दृश्य प्रेक्षकांना सहज समजावं म्हणून काहीवेळा रंगमंचाच्या मध्यभागीही करतात. भारतीय शैली आणि सामान्य माणूस यांचा विचार करून ते नाटक बसवतात. प्रत्येक नाटकाचा, त्यातील पात्रांचा ते सखोल अभ्यास करतात आणि नटांना ते त्या पात्राचं महत्त्व समजावून सांगतात. हे पात्र कसं वागेल, याचे विविध पर्याय ते नटापुढे ठेवतात आणि त्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यांचं भाषेवर प्रभुत्व आहेच, त्यामुळे निरनिराळ्या भाषा कशा बोलल्या जातात, हे त्यांना माहिती आहे. कोणत्या प्रकारच्या नाटकात कशी भाषा वापरायला हवी, हे ते नकळतपणे मांडतात. दिग्दर्शन करताना कुठेही शिकवण्याचा भाव त्यांच्यामध्ये नसतो. ते सहजपणे करून घेतात, हा त्यांचा मोठेपणा आहे, असं त्यांच्याविषयी अभिनेता संजय नार्वेकरला वाटतं.

सध्याच्या घडीला नट फार व्यस्त आहेत. चित्रपट, मालिका करत असताना त्यांना नाटकासाठी सलग १०-१५ दिवस वेळ देणं शक्य होत नाही. ही गोष्ट समजून घेऊन केंकरे यांनी सकाळी सात वाजता नाटकाची तालीम घ्यायला सुरुवात केली. नटांनीही त्यांना पांठिबा दिला आणि सकाळच्या तालमीतून बरीच नाटकं रंगभूमीवर आली आहेत.

मी विजयबरोबर गेले १५-२० काम करतोय. तो अतिशय बुद्धिमान दिग्दर्शक आहे. नाटक कसं दिसेल, हे त्याला पटकन कळतं. नाटय़ दिग्दर्शक म्हणून त्याची थिअरी पक्की आहे. त्याच्याकडे बऱ्याच शैली आहेत. परदेशांमध्ये जाऊन नाटक पाहणं, त्याचा अभ्यास करणं, हे विजयने केलं आहे. काही वयाने मोठे, समवयस्क किंवा त्याच्यापेक्षा वयाने फारच लहान नटांबरोबर त्याने काम केलं आहे. त्याने नटाला दिलेलं स्वातंत्र्य, हे त्याचं बलस्थान आहे. नटांकडून अभिनय काढून घेण्याचं काम तो करतो. काही दिग्दर्शकांना त्यांना काय हवंय, हे ते त्यांच्या पद्धतीने नटांकडून करवून घेतात. पण विजय नटाला सूर सापडून द्यायला मदत करतो. एक असा दिग्दर्शक ज्याला नटाच्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहेत. जिथे नट अडतो तो तिथे जरूर मदत करतो. पण नाटक बसवताना त्याला सर्व माहीत असतं, त्यामध्ये नट काय करू पाहतो, हे तो बघतो. त्याचा मोठा गुण म्हणजे तो प्रयोग करायला घाबरत नाही. नाटकात काय आहे आणि काय दाखवायचं, हे त्याला नेमकं कळतं. काही दिवसांपूर्वी तो विनोदी नाटक करत होता. पण मध्येच ‘ढोल-ताशे’, ‘हा शेखर खोसला कोण आहे?’ अशी नाटकं बसवून त्याने धक्का दिला. त्याचं ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘मित्र’, ‘सुंदर मी होणार’सारखी नाटकं, केवढी विविधता. रत्नाकर मतकरी, शफाअत खान, मधुगंधा कुलकर्णी या विविध पिढय़ांतील लेखकांबरोबर त्याने काम केलं आहे. नव्या पिढीला काम देण्याचं कामंही तो करतो. तो तालमींमध्ये गप्पा भरपूर मारतो, पण त्याने नाटकावर कधीही परिणाम झालेले नाही, उलटपक्षी फायदाच झालेला आहे, असं अभिनेता आनंद इंगळेला वाटतं.

आपल्या दिग्दर्शनाबाबत केंकरे यांनीच काही गोष्टी सांगितल्या. एकतर माझी अशी शैली नाही. नाटकाप्रमाणे शैली बदलावी लागते. पण माझा एक स्थायीभाव आहे. माझा लोकशाहीवर विश्वास आहे. माझ्यासाठी तालमीचं वातावरण मोकळं लागतं. तालीम ही मजा करायची जागा आहे, तो काही तुरुंग नव्हे. एकदा नाटकाबद्दलची संपूर्ण माहिती दिल्यावर नटांना याबद्दल काय म्हणायचं आहे, ते त्यांना सांगता यायला हवं, तरच ते नाटकाशी एकरूप होतात. मी दिग्दर्शकाचा नट आहे, या संकल्पनेवर माझा विश्वास आहे. संजय नार्वेकरबरोबर मी जेव्हा ‘सर्किट हाऊस’ करतो आणि त्यानंतर ‘तीन पायांची शर्यत’ करतो, तेव्हा शैली बदलते. जेव्हा कारकीर्द सुरू झाली तेव्हा मी अधिक आग्रही होतो. मी त्या वेळी रात्री काम करायचो, नट थकले की मला जोर यायचा. पण परिपक्वता जशी वाढली तेव्हा समजलं की, कधी कधी आग्रही असणं घातकही ठरू शकतं. आग्रही आणि हेकट किंवा हेकेखोर याच्यातली सीमारेषा तुम्हाला समजायला हवी, ती पुसली जाऊ नये. केदार शिंदे किंवा संतोष पवार एखादी गोष्ट लवकर फुलवतात, पण मला त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. खूप वर्षे माझा लिखित संहितेवर विश्वास होता. कालानुरूप आपल्याला बदलावं लागतं. दृष्टिकोन बदलायला हवा. नाटकातील वाक्यांचा आपल्याला लागलेला पर्यायी अन्वयार्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा. मला तालमीत आरडाओरड, शिवीगाळ आवडत नाही. माझ्या मते नट हे व्यावसायिक आहेत, त्यांना जबाबदारीची जाणीव असायला हवी. गप्पा मारत मारत नाटक करायला मला आवडतं, नाटक कधी बसलं हे नटाला कळतही नाही. मोकळं वातावरण असेल तरच तुमच्यामध्ये संवाद होऊ शकतो. काही नाटककारांबरोबर माझं छान जमतं, जसं रत्नाकर मतकरींच्या नाटकांबद्दल. कारण त्यांच्या नाटकाची संरचना पक्की असते. नाटक बसवताना, मला नटांपेक्षा जास्त समजतं, असं मनात आणत नाही. काही वेळा बाहेरची माणसं येऊन आपल्याला जे सांगतात ते ऐकतो, पण महिनाभर ज्या नटांबरोबर आहोत, त्यांचं ऐकत नाही. मी दिग्दर्शक म्हणून दीडशहाणा आहे, असं दाखवणं ही पद्धत बरोबर नाही. केंकरे म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. ज्यांना माणसांना समजून घ्यायला आवडतं, बोलायला आवडतं. पण ज्यांना त्यांची तालीम म्हणजे टाइमपास वाटतो, त्यांना केंकरे समजलेच नाहीत, असं वाटतं. टाइमपास केला असता तर केंकरे यांना जवळपास ३५ वर्ष कामच करता आलं नसतं, हेच समजून घ्यायला हवं.

First Published on August 13, 2017 1:03 am

Web Title: veteran marathi theatre actor and director vijay kenkre