‘बाहुबली : द कन्क्लुजन’ अपेक्षेप्रमाणे सुपरहिट झाला आहे. या चित्रपटाने आपल्याच कमाईचे विक्रम मोडत यशाचा नवा मापदंड निर्माण केला. बॉलीवूडमध्ये चित्रपट जेव्हा अशा पद्धतीने सुपरहिट होतो तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा त्या चित्रपटाच्या ‘हिरो’ला होतो. किती कोटी क्लबमध्ये त्या हिरोचा चित्रपट शिरला आहे त्यानुसार त्याचे पुढच्या चित्रपटांसाठीचे मानधन ठरते. नंबर वनच्या शर्यतीतलं त्याचं स्थान काय हेही सहज पक्कं होतं. हाच फंडा खरं म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही लागू होत असेल, असं आपण स्वाभाविकपणे म्हणू शकतो. म्हणजे ‘बाहुबली : द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ असे दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर या चित्रपटाचा पडद्यावरचा खरा ‘हिरो’ प्रभास हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा नंबर वन अभिनेता असेल, असा कयास आपण बांधत असू तर तो खोटा आहे. ‘बाहुबली’च्या यशाने प्रभासच्या पदरी आणखी काही चांगले चित्रपट, मानधनाचा मोठा आकडा आणि ‘मादाम तुसाँ’ संग्रहालयात प्रतिकृती असणारा पहिला दाक्षिणात्य अभिनेता म्हणून मिळालेला बहुमान या तीनच गोष्टी पडल्या आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा लोकप्रिय अभिनेता असण्याच्या बहुमानापासून अजून तो कोसो दूर आहे. यानिमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे नंबर वन हिरो कोण? त्यांची लोकप्रियता कशी ठरते? याचा हा गमतीदार मामला..

तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषिक चित्रपटांची मिळून अशी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी उभी राहिली आहे; पण आपल्यासाठी ती एकच एक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असली तरी तिथे मात्र तामिळ चित्रपटसृष्टी वेगळी, तेलुगू आणि मल्याळम यांचाही स्वतंत्र चित्रपट उद्योग आहे. त्यामुळे या तिन्ही भाषिक इंडस्ट्रीला पुरून उरलेला अभिनेता वेगळा आणि त्या त्या चित्रपटसृष्टीत लोकप्रिय असलेला अभिनेता वेगळा अशी गमतीदार परिस्थिती आहे. गेली कित्येक र्वष या तिन्ही इंडस्ट्रीच्या गळ्यातील ताईत असणारा एकच एक अभिनेता आहे तो म्हणजे ‘रजनीकांत’. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारा आणि ज्याला त्याचे चाहते ‘देव’ म्हणून पुजतात असं एकच नाव आजही कायम आहे ते रजनीकांत यांचंच.. ‘कबाली’ चित्रपटासाठी रजनीकांत यांना एकूण ८० कोटी रुपये मिळाले होते. आत्ताही ‘रोबोट २’साठी त्यांना ६० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. रजनीकांत यांची लोकप्रियता आणि त्यांची तिकीटबारीवरची सद्दी आजही कोणी मोडून काढू शकलेलं नाही हे वास्तव आहे. तसं पाहायला गेलं तर अजूनही या तिन्ही इंडस्ट्रीवर अनुभवी कलाकारांचीच मदार आहे. तामिळमध्ये रजनीकांत आणि त्यांच्या मागोमाग अभिनेता-दिग्दर्शक कमल हसन यांचं स्थान अजूनही पक्कं आहे.

main hoon na movie completed 20 years interesting facts
‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

तेलुगूमध्ये चिरंजीवी आजही नंबर वन आहे. नुकताच चिरंजीवी यांच्या कारकीर्दीतील १५० वा चित्रपट प्रदर्शित झाला. दहा वर्षांनंतर चिरंजीवी यांनी ‘कैदी नंबर १५०’ हा चित्रपट केला. या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्याचा काडीमात्र परिणाम या अभिनेत्याच्या लोकप्रियतेवर झालेला नाही. बॉलीवूडमध्ये सध्या नेपॉटिझमच्या नावाने कितीही शंख होत असला तरी तेलुगूसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी मात्र याच जोरावर सुखाने नांदते आहे. त्या अर्थाने सध्या आंध्र प्रदेशचे खासदार म्हणून कार्यरत असणाऱ्या चिरंजीवी यांचा पूर्ण परिवारच तेलुगू चित्रपटसृष्टीवर राज्य करतो आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण तेजा तेलुगू चित्रपटांचा यशस्वी चेहरा आहे. त्याने हिंदीतही काम केलं आहे. चिरंजीवी यांचा धाकटा भाऊ पवन कल्याण हा आजही तेलुगू चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. पवन कल्याण एका चित्रपटामागे भलेही १८ ते २२ कोटी रुपये मानधन घेत असेल, मात्र तो लोकांच्या गळ्यातील ताईत आहे. चिरंजीवी यांच्या मेहुण्याचा मुलगा अल्लू अर्जुन हेही तेलुगू चित्रपटसृष्टीत नव्याने आलेल्या फळीतलं लोकप्रिय नाव आहे.

मल्याळम चित्रपटसृष्टीवरही मोहनलाल, माम्मूटी, गोपी सुरेश अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्यांचंच गारूड आहे. नाही म्हणायला तिथेही नव्या कलाकारांची एकच लाट आली आहे. त्यातही कमी-जास्त प्रमाणात लोकप्रिय असलेले अनेक तरुण कलाकार आहेत. पृथ्वीराज सुकुमारन हे तिथल्या नव्या फळीतलं आघाडीचं नाव आहे. पृथ्वीराजने हिंदीतही ‘अय्या’, ‘औरंगजेब’ आणि हल्लीच आलेल्या ‘नाम शबाना’सारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं असल्याने त्याच्या कारकीर्दीचा परीघ आधीच विस्तारलेला आहे. पृथ्वीराजपाठोपाठ मणिरत्नम यांच्या ‘ओके कानमणी’चा नायक दलेकर सलमान हाही मल्याळम चित्रपटसृष्टीचा नव्या पिढीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जातो आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मुळात कोणी एकच

अभिनेता प्रेक्षकांवर राज्य करेल, अशी संकल्पनाच नाही आहे. तिथे जो तो आपल्या चित्रपटांमुळे, शैलीमुळे लोकप्रिय आहे. प्रत्येकाचं लोकप्रिय असण्याचं एक वेगळं कारण आहे. तिथे नंबर वनचा खेळच नसल्याने प्रत्येकाला आपली कारकीर्द घडवण्यासाठी वाव मिळतो, असं ज्येष्ठ सिनेपत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी सांगितलं. तामिळचंच उदाहरण घ्यायचं झालं तर रजनीकांत यांचा वावर, त्यांची लोकप्रियता तिन्ही ठिकाणी आहे. मात्र त्यांच्यानंतर आलेल्या पिढीतही विजय, अजित कुमार, सुरिया, धनुष, विक्रम हे सध्याचे आघाडीचे कलाकार आहेत. रजनीकांत यांच्यानंतर तामिळ चित्रपटात सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणून विजयचं नाव घेतलं जातं. ‘पुली’ या चित्रपटासाठी विजयने ३० कोटी रुपये घेतले होते. विजयच्या खालोखाल अजित कुमारलाही २५ कोटींपेक्षा जास्त मानधन दिलं जातं.

दाक्षिणात्य चित्रपटांचा हिरो म्हणून उत्तम अभिनय, उत्तम नृत्य असणं ही गरज आहे. त्यांची स्टाइल प्रेक्षकांना त्यांच्याकडे जास्त आकर्षित करते, अशी माहिती ‘रामोजी फिल्मसिटी’चे जनसंपर्क अधिकारी पवन कु मार यांनी दिली. तेलुगूमध्ये पवन कल्याणची लोकप्रियता मोठी आहे. आमच्याकडे ‘पवनिझम’ हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखादा स्टाइल मारतो आहे किंवा काही अचाट करण्याच्या प्रयत्नात असेल तर ‘काय रे तू पवनिझम करतो आहेस का?’ असा प्रश्न विचारला जातो. लोकांच्या नेहमीच्या बोलण्यामध्ये हा ‘पवनिझम’ शब्द रूढ झाला आहे इतकी या अभिनेत्याची लोकप्रियता जास्त आहे. पवन कल्याण आणि महेश बाबू हे लोकांचे इथले आवडते क लाकार आहेत. हे दोघे खूप हिट चित्रपट देतात वगैरे असं काही नाही; पण या दोघांच्या चाहत्यांची संख्या इतर कोणत्याही तेलुगू कलाकारापेक्षा मोठी असल्याचं त्यांनी सांगितलं. बॉलीवूडची यशाची फुटपट्टी तर इथे अगदीच कुचकामी ठरते असं सध्याचं चित्र आहे. म्हणजे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या तेलुगू अभिनेत्यांमध्ये भलेही प्रभासचं नाव आघाडीवर येईल कदाचित, पण आजही तो एक चांगला अभिनेता आहे, सर्वोत्तम अभिनेता नाही, हीच धारणा इथल्या प्रेक्षकांमध्ये आहे. ‘बाहुबली’च्या यशात प्रभासचा कितीही मोठा वाटा असला तरी लोकांच्या दृष्टीने या चित्रपटाचा खरा हिरो चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली हेच आहेत. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांची संख्या वाढेल, पण लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला इतक्या लवकर मान मिळण्याची शक्यताच नसल्याचं ते म्हणतात. खुद्द राजामौली यांनीही प्रभासपेक्षा ‘बाहुबली’च्या भूमिकेसाठी ज्युनिअर एनटीआर योग्य आहे, असं सांगितलं होतं. ज्युनिअर एनटीआरची लोकप्रियताही जास्त आहे. मात्र त्याच्या गेल्या दोन चित्रपटांना तिकीटबारीवर फारसं यश मिळवता आलेलं नाही. त्यामुळे तो सध्या पिछाडीवर आहे, पण तो चांगला अभिनेता आहे, याबद्दल कोणाचंच दुमत नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शिरलेली ही नवी पिढी आपापल्या पद्धतीने आपले स्थान कमावून आहे. ‘हिरो’ म्हणून त्यांचं इतरांपेक्षा वेगळं असणं, दिसणं, त्यांची डान्सची स्टाइल, त्यांची ऊर्जा याच सगळ्या गोष्टी प्रेक्षकांवर मोहिनी घालतात. पडद्यावरची त्यांची ‘प्रत्यक्षाहूनी उत्कट प्रतिमा’ हीच त्यांच्या यशाचं आणि लोकप्रियतेचं गमक ठरते आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा विचार करायचा झालाच तर अमुक एक कलाकार यशस्वी ठरेलच, याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. खुद्द तो कलाकारही त्या विश्वासाने काम करत नाही. त्यामुळे एखादा आपल्या डान्सच्या, हाणामारीच्या स्टाइलनेही लोकप्रिय ठरतो. त्यांच्या यशासाठी त्यांच्या चित्रपटांची कमाई कधीच गृहीत धरली जात नाही.

– ज्योती व्यंकटेश, ज्येष्ठ सिनेपत्रकार

 दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कोणी एकच एक अभिनेता कधीही राज्य करू शकत नाही. त्यांची अभिनय क्षमता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव या सगळ्याकडे पाहण्याचे प्रेक्षकांचे मापदंडच वेगळे असल्याने प्रत्येक कलाकार स्वत:ची एक ओळख घेऊन येतो. त्याच्या चित्रपटांनुसार त्याची लोकप्रियता एक तर वाढत जाते किंवा घटत जाते.

– पवन कुमार, जनसंपर्क अधिकारी