रवींद्र पाथरे

नाटककार रत्नाकर मतकरी यांनी साहित्याचे अनेक प्रकार लीलया हाताळले. त्या, त्या साहित्यप्रकारात त्यांनी आपली नाममुद्राही निश्चितपणे उमटविली. भयकथा हा त्यांनी हाताळलेला त्यांतलाच एक साहित्यप्रकार. परंतु नाटकातून मात्र त्यांनी तो फारसा वापरला नाही. नुकतंच त्यांच्या ‘कामगिरी’ या भयकथेवर आधारित ‘२१७, पद्मिनी धाम’ हे नाटक लेखक नचिकेत दांडेकर व संकेत पाटील यांनी संकेत पाटील यांच्याच दिग्दर्शनाखाली रंगभूमीवर आणलं आहे. मराठी रंगभूमीवर अशी भयनाटय़ं फारच क्वचित आली आहेत. रहस्यनाटकं त्यामानाने जास्त येतात. मुळात मतकरींच्या ‘कामगिरी’ या कथेचा जीव फार मोठा नाहीए. परंतु या लेखकद्वयीनं त्याचं केलेलं नाटयरूपांतर मात्र दोन अंकी आहे. अर्थात त्यासाठी त्यांना कथा ताणावी लागली, हे उघड आहे. पण त्यांनी जे काही सादर केलं आहे ते खिळवून ठेवणारं आहे. सहसा बॉक्ससेटमध्येच अडकलेलं मराठी नाटक त्यांना त्याकरता त्या चौकटीबाहेर आणावं लागलं आहे. आणि नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी हे शिवधनुष्य उत्तमरीत्या पेललं आहे. अलीकडच्या काळात ‘प्रयोग’शील नेपथ्यकार म्हणून त्यांचा झपाटयानं उदय होत आहे. भयकथेचा आत्मा गूढतेत आणि तिच्या मांडणीत असतो. प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे यांनी सिनेमॅटिक प्रकाशयोजनेतून नजरबंदी करणाऱ्या पद्धतीनं हे साध्य केलं आहे. अचूक पात्रयोजना आणि इतर चोख तांत्रिक बाबींनी संपृक्त असं हे नाटयरसायन प्रेक्षकाला खुर्चीला जखडून ठेवतं, हे नक्की.

Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?

हेही वाचा >>> KGF स्टार यशच्या साधेपणाने जिंकली मनं; बायकोसाठी केली ‘ही’ गोष्ट, फोटो झाला व्हायरल

रावराजे या उद्योगपतीची मुलगी पद्मिनी कॉलेजचा लॅब असिस्टंट मुरंजनच्या प्रेमात पडते, तिथून या नाटकाची सुरुवात होते. रावराजे गावातलं एक बडं प्रस्थ आहेत. गावातल्या कॉलेजचं भलंबुरंही त्यांच्याच हाती असतं. त्यांचा प्रचंड दरारा आहे. ते वाट्टेल ते करू शकतात. तशी त्यांची पंचक्रोशीत दहशतही आहे. आपली मुलगी एका फडतुस लॅब असिस्टंटच्या प्रेमात पडलीय हे त्यांना सहन होणं शक्यच नसतं. त्यांनी पद्मिनीला जरी लाडाकोडात वाढवलेलं असलं तरी तिची ही जुर्रत ते खपवून घेऊ शकत नाहीत. पद्मिनीचं प्रेम त्यांच्यापासून लपून राहत नाही. पण ती स्वत:हून आपल्याला ते कधी सांगतेय याची ते वाट पाहतात. मुरंजनला रावराजेंचा दबदबा माहीत असतो. आपलं प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकत नाही हेही तो जाणून असतो. तो पद्मिनीला ते परोपरीनं समजवायचा प्रयत्न करतो. पण ती ऐकायला तयार नसते. मुरंजनने प्रयत्न तरी करायला हवेत असं तिचं म्हणणं. पण आपणा दोघांच्या भविष्यात काय वाढलंय याची पुरेपूर कल्पना असलेला भित्रा मुरंजन तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करतो. शेवटी पद्मिनीच आपलं मुरंजनवर प्रेम असल्याचं रावराजेंना सांगते आणि ते खवळतात. तिला घरात कोंडून ठेवतात. तीही हट्टाला पेटते. खाणंपिणं सोडते. अखेर तिचं प्राणोत्क्रमण होतं. पण तीही आपल्या हट्टापासून माघार घेत नाही, आणि रावराजेही! मुरंजन त्या धक्क्यानं कोसळून पडतो. त्याच्या कॉलेजला दांडया होऊ लागतात. त्याच्यावर या घटनेचा भयंकर मानसिक ताण येऊन तो मनोरुग्णावस्थेपर्यंत जातो. पण ज्याच्यामुळे आपली मुलगी आपल्याला गमावावी लागली त्या मुरंजनला धडा शिकवण्याचं रावराजे ठरवतात. ते मुरंजनला आपल्याला कॉलेजला एक भेटवस्तू द्यायचीय आणि ती घ्यायला तूच यायला हवंस, अशी अट घालतात. तो नाइलाजास्तव त्याप्रमाणे रावराजेंच्या घरी जातो. ते पद्मिनीचा सापळा त्याला भेट देतात आणि तो कॉलेजच्या लॅबमध्ये घेऊन जायला सांगतात. त्याच्यामुळेच आपल्या मुलीनं हट्टानं आपला जीव गमावला असा आरोप ते मुरंजनवर करतात. मुरंजन ते नाकारायचा प्रयत्न करतो, पण चिडलेले रावराजे त्याचं काहीएक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. शेवटी मुरंजन तो सापळा घेऊन जाण्याचं मान्य करतो..

हेही वाचा >>> साखरपुड्यानंतर होणाऱ्या बायकोसह प्रथमेश परब पोहोचला कोकणात! सासरी श्रीवर्धनला ‘असं’ झालं जावयाचं स्वागत

नचिकेत दांडेकर-संकेत पाटील या लेखकद्वयीनं ही भयकथा नाटकात रूपांतरित करताना त्यातलं भयनाटय नेमकेपणानं कोरून काढलं आहे. एकीकडे फ्लॅशबॅक पद्धतीनं पद्मिनी-मुरंजनची प्रेमकथा उलगडून दाखवत असतानाच रावराजेंची विलक्षण दहशत, त्यांची ‘हम करेसो कायदा’ वृत्ती आणि त्यातून घडलेली भीषण शोकांतिका त्यांनी रंगतदारपणे मांडली आहे. पद्मिनी आणि मुरंजनमधील प्रेम, त्यातले तिढे, वळणवाटा, मुरंजनची कचखाऊ वृत्ती, त्याउलट पद्मिनीचा दृढनिश्चय, तिचं आत्मसमर्पण, रावराजेंची त्यांच्या प्रेमाप्रतीची आडमुठी भूमिका, त्यास्तव कोणत्याही थराला जाण्याची त्यांची प्रवृत्ती हे सारं अत्यंत प्रत्ययकारीतेनं नाटकात येतं. चपखल, लयबद्ध संवाद हे या नाटकाचं आणखीन एक वैशिष्टय. त्यांतला फ्रेशनेस दाद देण्याजोगा आहे. अर्थात मुळात कथेचं बीजच छोटंसं असल्याने नाटक थोडं पसरट झालंय, हेही खरं. पण ते प्रेक्षकांना खिळवून मात्र ठेवतं.

दिग्दर्शक संकेत पाटील यांनी व्यावसायिक धारेतील नाटकांच्या ठरीव चाकोरीला छेद देत हे नाटक बसवलं आहे. कमानी रंगमंचाच्या बाहेरचा अवकाश त्यांनी यात आणला आहे. आणि त्यांना याकामी नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी उत्तम साथ दिली आहे. कॉलेजचं ऑफिस, पद्मिनी धामचा बाहेरचा आणि आतला परिसर, काळोख्या वाटेतला सापळ्याबरोबरचा मुरंजनचा घोडागाडीचा प्रवास साकारणं त्यांच्यामुळेच दिग्दर्शकाला शक्य झालं आहे. सापळ्याची करामत हा आणखीन एक धक्का. त्याच्या भयकारी हालचाली नाटकात प्राण फुंकतात. पद्मिनीच्या घरभरातील अस्तित्वाचा भास दर्शवणारा नृत्यप्रसंग तर अविस्मरणीयच. प्रत्येक पात्राची मानसिकता, वेगळं व्यक्तिमत्त्व त्यांच्या संवादांतून, वागण्या-बोलण्यातून, व्यक्त होण्यातून यथार्थपणे दृगोचर होतं. नाटकातील हा भास-आभासाचा खेळ दिग्दर्शकानं छान रंगवला आहे. संदेश बेंद्रे यांनी पद्मिनी धामचा  परिसर, आतील अवकाश आणि धावत्या घोडागाडीचं केलेलं नेपथ्य अवर्णनीय आहे. हॅट्स ऑफ टू हिम! यथातथ्य वातावरणनिर्मितीने नाटकाच्या परिणामकारकतेत विलक्षण भर घातली आहे. शीतल तळपदे यांनी पठडीबाह्य प्रकाशयोजनेतून या आगळ्या नाटकाला रंगरूप दिलं आहे.. जणू आत्माच दिला आहे. शुभम ढेकळे यांच्या संगीताने नाटकाचा पोत अचूक पकडला आहे. नृत्याच्या जागाही नाटयनिर्मितीची उंची वाढवतात.

मिलिंद शिंदे यांनी रावराजेंच्या भूमिकेत निर्विकार चेहरा ठेवत केलेली लयबद्ध संवादफेक अपेक्षित परिणाम साधते. त्यांचं मधूनच बासरी वाजवणं भयात भर घालणारं. त्यांचा एकूणात वावर त्यांची दहशत किती आहे हे सांगण्यास पुरेसा आहे. आवश्यक त्या ठिकाणी त्यांचे पाणावलेले डोळे त्यांना जे म्हणायचंय ते त्यांच्या मुखवटयाआडून खरं ते बोलून जातात. ऋतुराज फडके यांनी काहीसा घाबरट, रावराजेंच्या दहशतीनं हवालदिल झालेला, पद्मिनीवरच्या सच्च्या प्रेमाचं नीट प्रदर्शनही करू न शकणारा मुरंजन त्याच्या सगळ्या छटांसह साकारला आहे. त्याची झालेली कोंडी, तीवर मात करता येत नसल्याची भीती, परिस्थितीच्या करकचून विळख्यात सापडल्यानं मुरंजनची झालेली द्विधावस्था त्यांनी उत्कटपणे दाखवली आहे. अमृता पवार यांनी पद्मिनीची बिनधास्त वृत्ती, तिचं मुरंजनवरचं प्रगाढ प्रेम आणि त्याची परिणती लग्नात होऊ शकत नसल्याने आलेली हतबलता, रावराजेंच्या दहशतीविरोधात दाखवलेला अंगभूत ठामपणा.. हे सारे भाव नेमकेपणानं अभिव्यक्त केले आहेत. अनिकेत कदम यांचा शिपाई बाबू छोटया भूमिकेतही छाप पाडतो. सचिन नवरे (प्रिन्सिपल) आणि सुबोध वाळणकर (चहावाला) यांनी आपली कामं चोख केली आहेत. ‘२१७, पद्मिनी धाम’ हे एक आगळंवेगळं भयनाटय यानिमित्तानं पाहण्याचा योग मराठी प्रेक्षकांना येत आहे, हे विशेष.