दीपिकाने केलेला उपवास आणि सिद्धिविनायकाला घातलेले साकडे फळले खरे.. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटाला तिकीटबारीवर प्रचंड यश मिळाले असले तरी या चित्रपटाच्या यशामुळे दीपिकापेक्षा रणबीरचाच जास्त फायदा झाला आहे. तीन दिवसांत ६२.११ कोटी रुपये गोळा करत यावर्षीचा प्रदर्शित झाल्याझाल्या सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. रणबीर कपूरच्या ‘बर्फी’पाठोपाठ १०० कोटी क्लबमध्ये सामील होणारा हा दुसरा चित्रपट ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रणबीर कपूर आणि दीपिकाची केमिस्ट्री, आत्ताच्या पिढीचे प्रतिनिधित्व करू शकेल अशी प्रेमकथा आणि ‘बदतमीज दिल’, ‘घागरा’ सारखी सगळी हिट गाणी यामुळे हा चित्रपट तिकीटबारीवर चांगली कमाई करेल, असे आडाखे ट्रेड विश्लेषकांनी बांधलेच होते. मात्र, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १९.४५ कोटी रुपयांची कमाई करत ट्रेड विश्लेषकांना धक्का दिला. दुसऱ्या दिवशी २०.१६ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी २२.५ कोटी अशा चढत्या क्रमाने या चित्रपटाने कमाई केली आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘अप्रतिम कामगिरी’ या शब्दांत चित्रपटाचे कौतुक के ले आहे.
यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत शंभर टक्के कमाई करणारा हा चित्रपट आहे. ‘यह जवानी है दिवानी’ने एका अर्थी सलमान खानच्या ‘दबंग २’, ‘बॉडीगार्ड’ आणि ‘एक था टायगर’सारख्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले असेही म्हणता येऊ शकते. सलमानच्या एक था टायगरने प्रदर्शित झाल्या झाल्या पहिल्याच दिवशी २१ कोटींची कमाई करत विक्रम केला होता.  रणबीरचा ‘यह जवानी..’ काही आकडय़ांनी हा रेकॉर्ड मोडण्यात कमी पडला असला तरी ‘एक था टायगर’ हा साडेतीन हजार थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता तर ‘यह जवानी..’ ३ हजार थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. हा फरक पाहता ‘यह जवानी है दिवानी’ चित्रपटाला मिळालेले यश मोठेच असल्याचे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे. तीन दिवसांत ६२.११ कोटी रुपये जमवणारा हा चित्रपट आठवडा संपता संपता शंभर कोटी क्लबमध्ये पोहोचेल अशा विश्वास तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे.  विदेशातही चित्रपटाने मोठी कमाई केली असून अमेरिकेत १६० थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १६ लाख डॉलरची कमाई केली आहे. त्यामुळे ‘यूएस वीकएन्ड टॉप चार्ट’मध्ये या चित्रपटाने आठव्या स्थानावर झेप घेतली आहे.
 याआधी ‘जब तक है जान’ला पहिल्या दहामध्ये जागा मिळाली होती. त्यामुळे ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजानुसार आठवडय़ाच्या अखेरीस या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा आकडा पार केला तर शंभर कोटी क्लबचा नायक म्हणून रणबीर कपूर आघाडीच्या नायकांमध्ये स्थान मिळवेल.
* तीन दिवसांत ६२.११ कोटी रुपये गोळा करत यावर्षीचा प्रदर्शित झाल्याझाल्या सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.