पुणे : चार पुस्तकांच्या पलीकडचे शिकवणारे, परदुख समजून घेण्याची क्षमता रुजवणारे आणि तळमळीने शिकवणारे शिक्षक दिवसेंदिवस नाहीसे होत आहेत. शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. खरे नट, खरे कवी कोणाला म्हणावे याचे निकष नसल्याने सांस्कृतिक कुपोषण होत आहे. आपल्या समाजात सर्वत्र आलेला वैराणपणा पुढच्या पिढीकडे जाऊ नये असे वाटत असेल तर रुचेल किंवा नाही याची पर्वा न करता रोखठोकपणे भाष्य करणे हे कलेचे दायित्वच आहे, असे परखड  मत अभिनेता गिरीश कुलकर्णी याने मंगळवारी व्यक्त केले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४४ व्या ज्ञानसत्रात मंगळवारी ‘धप्पा’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी बोलत होते.

गिरीश कुलकर्णी म्हणाले, समाजाचे वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन करणे हा लोकशाहीत निवडणुका हमखास जिंकण्याचा उपाय आहे. त्यामुळे आपल्या सभोवताली अनेक राजकीय गट आहेत, यापैकी कोणत्याही गटा-तटाचा नसल्याने मी प्रत्येक सत्तेचा टीकाकार आहे. सत्तेचे लांगुलचालन करणे यासारखा कणाहीन प्रकार दुसरा नाही.

आपली शैक्षणिक व्यवस्था ज्ञानापासून लांब जात असल्याने जमिनीवर कुदळ मारुन रोकडं ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने मी पाणी फाउंडेशन सारख्या मातीतल्या कामाकडे वळलो. आपल्या व्यवस्थेने नद्यांची गटारे, गावांची वाळवंटे केली आहेत. दूरचित्रवाणी वरील कार्यक्रमांना साहित्याचा दर्जा दिला जात आहे. नट कोण, साहित्यिक कोण याबद्दलच्या व्याख्या ठोस नसल्याने विचारांना कोणतीही दिशा न देणारे कवी आणि नट आपण मोठे केले, त्यातून सांस्कृतिक कुपोषण होत आहे. साहित्य संमेलने ही राजकीय वादांसाठीच चर्चेत राहतात, धंदेवाईक कल्पनांमधून आपण कोणता साहित्य व्यवहार साधतो असा प्रश्न विचारत, संमेलने म्हणजे व्यक्तींचे प्रस्थ माजवणारे साधन असल्याची टीकाही कुलकर्णी यांनी या वेळी केली. देशातील पुढच्या पिढय़ांनी देशातच राहावे असे वाटत असेल तर आत्ताच त्यासाठी मशागत करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

स्मार्ट सिटी, बालगंधर्व आणि पुरस्कार

पुणे शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करण्यात आला आहे, त्यादृष्टीने नियोजनही केले जात आहे, पण त्यातील नागरिकांच्या सांस्कृतिकतेची जाण आणि पोच येथील सत्ताधाऱ्यांना आहे का, असा प्रश्न कुलकर्णी यांनी विचारला. ‘बालगंधर्व’ सारखे रंगमंदिर पाडायची भाषा बोलली जाते, मात्र वास्तूंचे जतन सोडाच, त्यांची दुरवस्था पाहूनच, कसले त्यांचे पावित्र्य आणि कसले महत्त्व. राष्ट्रपती पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते न मिळाल्याचा विरोध करणाऱ्यांनी तो कोणाच्या हस्ते मिळणार हे बघून त्यासाठी अर्ज केले नव्हते, मग विरोधाला विरोध का करण्यात आला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.