बॉलिवूडचा खिलाडी कुमार आणि त्याचा जवळचा मित्र साजिद नाडियाडवाला हे दोघेही झी टीव्हीवरील यारों की बारात या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात गेले होते. या शोचा हा शेवटचा भाग ११ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता प्रदर्शित होणार आहे. कलाकारांमधली मैत्री अशी या कार्यक्रमाची धाटणी होती. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक कलाकार येऊन गेले.

यावेळी अक्षय आणि साजिद यांनी क्वाड बाइकवरुन दमदार एण्ट्री केली. यावेळी साजिद नाडियाडवाला याने अक्षयची अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल..

  • साजिद आणि अक्षय एकत्र शाळेच्या बसने जायचे.
  • २२५ नंबरच्या बेस्टच्या बसनेही या दोघांनी एकत्र प्रवास केला आहे.
  • दोघंही एकाच वर्गात शिकायचे. पण अक्षयचे अभ्यासात कधीच लक्ष नसायचे त्यामुळे तो दोन वेळा नापास झाला होता. तेव्हा साजिद त्याच्याहून दोन वर्ग पुढे निघून गेला.
  • हे दोघं फक्त एकत्र शाळेतच जायचे असे नाही तर दोघांनी एकाच वर्षी लग्नही केले.
  • याशिवाय दोघांची मुलंही एकाच रुग्णालयात, एकाच वर्षी जन्माला आली. त्यांच्या मुलांमध्ये फक्त तीन दिवसांचा फरक आहे.
  • दोघांच्याही मुलांचा जन्म ब्रीच कॅण्डी रुग्णालयात झाला होता आणि मुलांच्या जन्मानंतर दोघांच्याही पत्नींना एकाच खोलीत ठेवण्यात आले होते.
  • आजही दोघं एकाच इमारतीत राहतात आणि एकमेकांचे पक्के शेजारी आहेत राहतात.
  • दोघांकडे वेगवेगळ्या रंगाच्या पण समान कंपनीच्या गाड्या आहेत.
  • त्या दोघांची मुलेही एकाच शाळेत जातात आणि एकाच वर्गात शिकतात.

या कार्यक्रमात साजिदने अक्षयला बातों बातों में या नक्कल करणाऱ्या खेळात आणि अंदाज लावणाऱ्या खेळात हरवले. त्यामुळे अक्षयला शिक्षा म्हणून पोल डान्स करायला लावला. मांग मेरी भरो या त्याच्याच सिनेमातल्या गाण्यावर हा डान्स करायचा होता. अक्षयनेही मग आपल्या अनोख्या अंदाजात पोल डान्स केलाच.

यानंतर हो किंवा नाही या सत्रात अक्षयला विचारले गेले की तो ट्विंकलशी कधी खोटं बोलला आहे का? यावर त्याने हो असे उत्तर दिले तर, तो ट्विंकलला घाबरतो का या प्रश्नावरही त्याने हो असेच उत्तर दिले. त्यानंतर साजिद खानने त्याला विचारले की किती घाबरतोस, यावर अक्षय सोफ्यावर उभा राहिला आणि दोन्ही हात लांब करुन म्हणाला एवढा…

या कार्यक्रमाचे चित्रिकरणावेळी अक्षय प्रेक्षकांकडे बॉल फेकायचा आणि त्यांना झेल पकडायला सांगायचा. जर कोणी झेल पकडला नाही आणि बॉल खाली पडला तर त्या व्यक्तिला स्टेजवर येऊन व्यायाम करायला लावायचा किंवा गाणे गायला लावायचा. अशा खेळत्या वातावरणात त्याने या कार्यक्रमाचे चित्रिकरण केले.