दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट ‘पुष्पा २: द रुल’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सातत्याने या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अलीकडेच ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने अल्लू अर्जुनला पॅन इंडिया स्टार बनवलं. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ या पहिल्या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. अल्लू अर्जुनने गाण्याचा प्रोमो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “‘पुष्पा पुष्पा’ १ मेला सकाळी ११.०७ वाजता भेटीस येत आहे”, असं कॅप्शन लिहित अल्लू अर्जुनने गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: निलेश साबळेंच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाचं शीर्षकगीत प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर ‘पुष्पा पुष्पा’ गाण्याचा प्रोमो धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला आवाज देवी श्री प्रसाद यांनी दिला असून ते या चित्रपटाचे संगीतकार आहेत. या गाण्याच्या प्रोमोमध्ये पुष्पाच्या हाताची छोटीशी झलक पाहायला मिळत आहे.

‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील हे पहिलं गाणं १ मेला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता अल्लू अर्जुनच्या या आगामी चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा – ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतून सुरेखा कुडचींची झाली एक्झिट, भावुक पोस्ट करत म्हणाल्या, “‘देवयानी’पासून…”

दरम्यान, येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. ५०० कोटी रुपये या चित्रपटावर एकूण खर्च झाल्याचं म्हटलं जात आहे. माहितीनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स अ‍ॅमेझॉन प्राइमने ३० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहेत. शिवाय नेटफ्लिक्सने देखील या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमने दिलेल्या रक्कमेपेक्षा तीन पट रक्कम नेटफ्लिक्सने ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंग राइट्ससाठी दिली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे. चित्रपटात अल्लू अर्जुनसह अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.