‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. रात्री ११ वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेला प्रक्षेकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत मालिका चांगल्या स्थानावर आहे. अलीकडेच ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेने ७०० भागांचा टप्पा पूर्ण केला. यावेळी मालिकेच्या संपूर्ण टीमने निर्माते महेश कोठारेंसह केक कापून सेलिब्रेशन केलं. याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. अशातच आता मालिकेतून अभिनेत्री सुरेखा कुडची यांची एक्झिट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सुरेखा यांनी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी ‘पिंकीचा विजय असो’मध्ये सुरेखा ही भूमिका साकारली होती. मालिकेतील या भूमिकेचा प्रवास आता संपला आहे. त्यामुळेच सुरेखा कुडची यांची एक्झिट झाली आहे. यासंदर्भात सुरेखा यांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये मालिकेतील कलाकारांबरोबरचे फोटो शेअर करत सुरेखा यांनी लिहिलं आहे, “चित्रीकरणाचा शेवटचा दिवस…म्हणता म्हणता ७ महिने कसे निघून गेले कळलं ही नाही… सुनील तावडे, कुणाल सुभाष, आरती मोरे, विजय आंदळकर या सगळ्यांबरोबर खूप मज्जा आली काम करायला. खरंतर ही बाकी सगळी मंडळी गेल्या दोन वर्षांपासून एकत्र काम करता आहेत… मला वाटलं आपल्याशी जुळवून घेतील ना पण खरंच खूप मोठ्या मनाने माझं स्वागत झालं… मी त्यांच्यातली कधी झाले हे कळलंच नाही…”

हेही वाचा – “फक्त भूमिका चोख वठवून चालत नाही,” चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगबाबत प्रसिद्ध कवयित्रीची पोस्ट; म्हणाल्या, “काळ…”

पुढे सुरेखा यांनी लिहिलं, “कोठारे व्हिजनबरोबर ही माझी पहिलीच मालिका…खूप छान वाटलं आपल्या बरोबर काम करुन…’स्टार प्रवाह’बद्दल मी काय बोलावं बस नाम ही काफी है…’देवयानी’पासून सातत्याने काम दिलंय मला…खूप खूप धन्यवाद…”

दुसऱ्या पोस्टमध्ये सुरेखा यांनी मालिकेमधील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला. “तुम्हा सगळ्यांची आठवण येते”, असं कॅप्शन लिहित सुरेखा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – अखेर मुहूर्त ठरला! विशाल निकम व पूजा बिरारीची ‘येड लागलं प्रेमाचं’ नवी मालिका लवकरच होणार सुरू, ‘या’ लोकप्रिय मालिकेची घेणार जागा

दरम्यान, सुरेखा कुडची यांच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या ‘लेक असावी तर अशी’ चित्रपटात झळकणार आहेत. २६ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुरेखा यांच्या व्यतिरिक्त ओंकार भोजने, शुभांगी गोखले, नयना आपटे, सविता मालपेकर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.