हिंदी, तेलगू आणि तामिळ या भाषांमध्ये बनवण्यात आलेल्या ‘द गाझी अॅटॅक’ या सिनेमाचे डिजिटल राइट्स तब्बल १२.५ कोटींना अॅमेझॉन प्राइमने खरेदी केले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझी अॅटॅकचे सर्व भाषांमधले डिजिटल अधिकार हे १२.५ कोटींमध्ये विकण्यात आले आहेत. एका नवोदित दिग्दर्शकाला त्याच्या सिनेमासाठी मिळालेली ही रक्कम फार मोठी आहे. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, याबद्दल अधिकृत माहिती घेण्यासाठी निर्मात्यांना संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

आतापर्यंत संपूर्ण जगभरात जेवढी युद्ध झाली ती सगळीच प्रसारमाध्यमांसमोर आली होती. पण यातली काही युद्ध अशीही होती जी कोणीही विसरु शकत नाही. युद्धात शहीद झालेल्या जवानांना आपण आजही विसरु शकत नाही. पण त्यात असेही काही शूरवीर आहेत, ज्यांच्या कतृत्वाबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, असेही काही पुरुष आणि महिला आहेत ज्यांनी देशासाठी वीरमरण पत्करले पण ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. गाझी अॅटॅक ही भारत- पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या युद्धाची आणि शहीदांची गोष्ट आहे. या सिनेमात राणा डगुबत्ती, तापसी पन्नू, अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच ओम पुरी यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने आणि एए फिल्म्स यांनी संयुक्तपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. ही भारताची पहिली सागरी लढाई होती. या लढाईबद्दल कोणालाच काही माहित नाही, कारण ही एक गुप्त मोहीम होती. ही मोहीम १९७१ मध्ये भारतीय पाणबुडी एस-२१ मधील त्या जवानांची आहे, ज्यांनी पाकिस्तानच्या पीएनएस गाझी पाणबुडीपासून भारताच्या आयएनएस विक्रांतला बुडण्यापासून वाचवले होते. याशिवाय या जवानांनी विशाखापट्टणमला पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासूनही वाचवले होते. ही कथा १८ दिवस पाण्याखाली घालवलेल्या त्या नौदल अधिकाऱ्याच्या टीमची आहे. १७ फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला.