ऐतिहासिक चित्रपटांसाठी लोकप्रिय असणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तब्बल तीन वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहेत. २०१६ मधील ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटानंतर आता त्यांचा ‘पानिपत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा करताच प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात संजय दत्त हा अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत आहे. त्याच लुकमधला संजय दत्तचा फोटो नुकताच आशुतोष गोवारीकरने ट्विट केला. आता चित्रपटाती अर्जुन कपूर आणि क्रिती सनॉनचा लूक समोर आला आहे.

‘पानिपत’ चित्रपटात अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती पार्वतीबाईंची भूमिका साकारणार आहे. या दोघांचाही लूक पाहून चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. चाहत्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आशुतोष गोवारीकर उद्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे.

१४ जानेवारी १७६१ या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात लढाई हरलेल्या मराठ्यांची शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे. अहमद शाह अब्दाली याने ही लढाई जिंकली खरी पण चर्चा घडली ती मराठ्यांच्या साहसाची आणि पराक्रमाचीही. सदाशिवरावभाऊ या युद्धात कामी आला. हा सगळा इतिहास आशुतोष गोवारीकर मोठ्या पडद्यावर घेऊन येतो आहे.