आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा अभिनेता अर्जुन कपूरच्या भूमिकेवरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. अर्जुन यामध्ये सदाशिवराव पेशवे यांची भूमिका साकारत आहे. पण तो या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. अनेकांनी त्याला ट्रोलसुद्धा केलं. या ट्रोलिंगवर अखेर अर्जुनने मौन सोडलं आहे.

“प्रत्येकजण ट्रोल होत असतो. मला असं वाटतं की नकारात्मक बोलणं ही आता लोकांची सवयच झाली आहे. ट्रोल करणारे लोक त्यांच्या खासगी आयुष्यात ज्या काही समस्यांना सामोरं जात असतील त्याचा राग सोशल मीडियावर काढतात”, असं अर्जुन म्हणाला. या ट्रोलिंगला जुमानत नसल्याचंही अर्जुनने स्पष्टपणे सांगितलं. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तो बोलत होता.

आणखी वाचा : ‘पानिपत’च्या कथेवर हक्क सांगत विश्वास पाटील यांचा सात कोटींचा दावा

तो पुढे म्हणाला, “लोकांनी माझी थट्टा केली तर मला काही फरक पडणार नाही. पण ज्या लोकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची थट्टा करू नका अशी माझी विनंती आहे. सोशल मीडियावरील ट्रोलिंगची मला आता सवयच झाली आहे. अशा गोष्टींवर मी आता हसतो. पण ऐतिहासिक चित्रपटांवर व त्यातील व्यक्तीरेखांवर मस्करी करणं चुकीचं आहे.”

मीम्सवर व्यक्त होत असताना भगत सिंग व सुभाष चंद्र बोस यांच्यावरील चित्रपटांना कधीच ट्रोल केले गेले नाही असं अर्जुन म्हणाला. मात्र सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेवरून ट्रोल करणाऱ्यांना कोणी काहीच बोलत नाही, अशा शब्दांत त्याने नाराजी बोलून दाखवली.

‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट येत्या ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अर्जुनसोबतच क्रिती सनॉन, संजय दत्त यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.