अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरूंगात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयातही गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. पोलीस आपल्याला मारहाण करत असल्याचा दावा गोस्वामी यांनी केला होता. दरम्यान दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विटमध्ये अर्णब यांचा व्हिडीओ शेअर केला असून एका चित्रपटातील डायलॉग पोस्ट केला आहे. ‘मुंबई का किंग कौन? ते आहेत मुंबई पोलीस.. आणि हे खरं आहे सत्या’ या आशयाचे ट्विट करत अर्णबवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी अर्णब यांची बाजू घेतली आहे तर काहींनी राम गोपालवर्मा यांचे समर्थन केले आहे.

‘सत्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज बाजपेयी, उर्मिला मातोंडकर हे मुख्य भूमिकेत होते. त्यावेळी या चित्रपटातील अनेक डायलॉग फेमस झाले होते. त्यातील एक म्हणजे ‘मुंबई का किंग कौन? …भिकू म्हात्रे’ हा मनोज बाजपेयीचा डायलॉग देखील लोकप्रिय झाला होता.