पौराणिक कथेत नेहमीच दुय्यम महत्त्व दिल्या गेलेल्या व वेळप्रसंगी बंडखोरी करणाऱ्या पात्रांना सध्याच्या काळात शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून बोलते करण्याचे श्रेय ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’च्या संस्थापिका व संचालिका डॉ. कनक रेळे यांच्याकडे जाते. महाभारतातील अंबा, द्रौपदी व गांधारी या व्यक्तिरेखांवर झालेला अन्याय लक्षात घेता शास्त्रीय नृत्यातून हे सामाजिक भान जपणे महत्त्वाचे आहे, या भावनेतून त्यांनी सुमारे २१ वर्षांपूर्वी पौराणिक पात्रांना नृत्यातून बोलके करण्याऱ्या कार्यक्रमाची निर्मिती केली. त्यांनी देशविदेशांमध्ये आपल्या नृत्याच्या माध्यमातून हा विषय लोकांपर्यंत पोहोचवला आहे. यंदा ‘नालंदा’चे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘अ-निती’ शीर्षकाखाली पौराणिक पात्र नृत्यातून सादर करण्यात आली. एकलव्य व नंदनार या नव्या व्यक्तिरेखांची भर या कार्यक्रमात टाकण्यात आली आहे.

कनक रेळेंनी ५० वर्षांपूर्वी ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’ची स्थापना केली. नृत्यामध्ये अभ्यास आहे. साधना आहे. हा फक्त तुमच्यातील अतिरिक्त गुण नसून नृत्य शिकण्यासाठी समर्पणाची भावना असावी लागते हा मूलमंत्र घेऊन फक्त नृत्याला समर्पित संस्था उभी करण्यासाठी कनक रेळेंना खूप कष्ट करावे लागले. नृत्य हे स्वत:ला व्यक्त करण्याची भाषा असून त्यात अदाकारी आणि तितकीच परिपक्वताही आहे. १९७२ साली मुंबई विद्यापीठात नृत्यावर स्वतंत्र पदवी सुरू करण्यासाठी सर्वाचा विरोध होता. वेश्यांसाठी पदवी सुरू करीत असल्याची वाईट प्रतिक्रियाही त्यांना ऐकावी लागली होती. मात्र नृत्यावरील प्रेमाखातर नृत्य हा अभ्यासाचा विषय म्हणून मुंबई विद्यापीठात रुजू करण्यासाठी रेळे यांनी पाठपुरावा केला. गरीब घरातल्या नृत्य प्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्यासाठीचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘नालंदा केंद्रा’चे शुल्कदेखील कमी ठेवले आहे. त्यामुळे आजही या संस्थेत आदिवासी भागातील कित्येक मुली नृत्याच्या प्रेमाखातर शिकण्यासाठी येतात. शिक्षणाचा गंध नसलेल्या या मुली ‘नालंदा’ मधून नृत्य शिकून आपल्या गावामध्ये नृत्याची शाळा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतात. या केंद्रात प्रशस्त अभ्यासिका व ग्रंथालयदेखील आहे. याव्यतिरिक्त या केंद्रात योगा व संस्कृतचे शिक्षणही दिले जाते. ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’स थेट भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याकडून वैज्ञानिक व औद्यागिक संशोधन केंद्र म्हणून ओळख मिळाली आहे.  भारतामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये ‘पीएचडी’ करणाऱ्या कनक रेळे या पहिल्या आहेत. वयाच्या सहाव्या वर्षांपासून त्यांनी ‘कथकली’ या शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले. पुढे कायद्याची पदवी मिळविली. इंग्लंडमध्ये जाऊन ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयात शिक्षण घेतले. पण कायद्याच्या क्षेत्रात मन न रमल्याने त्यांनी नृत्य हेच ध्येय ठेवले. त्यांनी ‘मोहिनी अट्टम’ या नृत्य प्रकाराचेही शिक्षण घेतले आहे. भारत सरकारकडून त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. वयाची ८० ओलांडल्यानंतरही त्या नृत्य शिकणाऱ्या अनेक पिढय़ा तयार करण्यात व्यग्र आहेत. मात्र सध्या नृत्याच्या वाढत्या खासगी शिकवणींबाबत त्या खंत व्यक्त करतात. नृत्याचे अभ्यासपूर्ण शिक्षण न घेता या शिकवणीतून पुढच्या पिढीपर्यंत नृत्याचे महत्त्व पोहोचत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे फक्त मनोरंजनापेक्षा सादरीकरणाची श्रेष्ठ कला म्हणून नृत्याकडे पाहिले जावे यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाची जोड देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ