प्रतिनिधी

मराठी चित्रपटात नवनवीन विषय आणि आशय असलेला चित्रपट आपल्यासमोर येत आहेत. त्यांची व्याप्ती पाहता त्यांच्या सादरीकरणाची कल्पना येते. असाच एक जबरदस्त विषय लवकरच मराठी रूपेरी पडद्यावर येणार आहे. ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ आणि ‘पर्पल बुल एन्टरटेन्मेंट’ या संस्था ‘बच्चन’ या नावाचा चित्रपट घेऊन येणार आहेत. आजच्या पिढीचा तरुण, तंत्रकुशल दिग्दर्शक समित कक्कड या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

‘लय भारी’सारखा चित्रपट दिल्यानंतर ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ने ‘येरे येरे पैसा’सारखा धम्माल पैसा वसूल चित्रपट दिला. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ यांसारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती करत अमेय विनोद खोपकर यांची ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ संस्था, मनोरंजन क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करत आहे. ते आता नवीन काय घेऊन येणार? याची चर्चा चित्रपटसृष्टीत रंगली असतानाच त्यांनी ‘बच्चन’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

‘आयना का बायना’ आणि ‘हाफ तिकीट’सारखे मनोरंजक आणि आशयघन चित्रपट दिग्दर्शक समित कक्कड यांनी दिले आहेत. त्यांच्या ‘हाफ तिकीट’ चित्रपटाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बहुमान मिळवले असून जवळपास २८ नामांकित चित्रपट महोत्सवात ३१ मानाच्या पुरस्कारांनी समित कक्कड यांना गौरवण्यात आले आहे.

ओम प्रकाश भट, स्वाती खोपकर, सुजय शंकरवार निर्मित ‘बच्चन’ चित्रपटाचे लेखन समित कक्कड आणि ऋषिकेश कोळी यांनी केले आहे. या दोघांच्या लेखणीतून साकारलेल्या ज्वलंत विषयाची कथा-पटकथा समित-ऋषिकेश यांचीच आहे तर संवाद ऋषिकेश कोळी यांचे आहेत.

‘बच्चन’ या शीर्षकावरून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली असली तरी या ‘बच्चन’मध्ये नेमकं काय असणार हे गुलदस्त्यात असून हे रहस्य उलगडण्यासाठी पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.