रेश्मा राईकवार

हैदराबाद, उत्तर प्रदेश वा देशभरातील अन्य शहरांमध्येही चित्रिकरणाच्या दृष्टीने पायाभूत सोयीसुविधा निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. सध्या चित्रपटांमध्ये देशातल्या विविध शहरांतील कथा सांगितल्या जातात. कथेनुसार हल्ली देशभरात अनेक ठिकाणी सातत्याने चित्रिकरण सुरू असते. त्यामुळे केवळ मुंबईतच चित्रिकरण होते हा समज जसा चुकीचा आहे. तसेच अन्यत्र कुठे फिल्मसिटी उभी राहिली तर इथला चित्रपट उद्योग तिथे जाईल, हे जे चित्र रंगवले जाते आहे तेही पूर्णपणे चुकीचेच असल्याचे मत चित्रपटसृष्टीतील जाणकार आणि अभ्यासक व्यक्त करताना दिसतात.

मुंबईतून बॉलीवूड उत्तर प्रदेशात हलणार का?, इथपासून ते फिल्मसिटी इथून हलवून दाखवाच.. असा इशारा देईपर्यंत उत्तरप्रदेशात नव्याने उभी राहणारी फिल्मसिटी आणि तद्अनुषंगाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी के लेला मुंबई दौरा यावरून घमासान चर्चा झाली. या चर्चेचा धुरळा पुरता खाली बसायच्या आतच दोन घडामोडी घडल्या आहेत, ज्या या विषयावरची दिशा स्पष्ट करण्यासाठी पुरेशा आहेत. एक म्हणजे शुक्रवारी चित्रपटसृष्टीतील अग्रेसर संघटना म्हणून नावाजल्या जाणाऱ्या ‘इम्पा’ने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र दिले आहे. या पत्राच्या माध्यमातून मुंबईतील चित्रनगरीबद्दलची कळकळ आणि प्रेम जाहीरपणे व्यक्त के ल्याबद्दल आणि इथला उद्योग उत्तरप्रदेशात जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याबद्दल समस्त निर्मात्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. आणि आम्ही मुंबई सोडून कुठे जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत ज्या कलाकाराची पहिली भेट घेतली त्या अक्षय कुमारने आपला आगामी ‘रामसेतू’ या चित्रपटाचे अयोध्येत चित्रिकरण करण्यासाठी त्यांची परवानगी मिळवली आहे.

या दोन्ही घटना या विषयाच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आणि बोलक्या आहेत. पहिल्या घटनेत चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांनी एकत्रितपणे आपल्याला मुंबईतच काम करायचे आहे हे ठामपणे सांगितले आहे. मुंबई हे चित्रपटसृष्टीचे केंद्र मानले जाते, इथे या क्षेत्राची खऱ्या अर्थाने रुजवात झाली. शंभर वर्षांंहून अधिक काळ केलेल्या वाटचालीनंतर आज बॉलिवूड नामक हा वटवृक्ष इथे फोफावला आहे. मुंबईतील वातावरण आणि इथल्या सोयीसुविधा यामुळे कुठल्याही मौसमात इथे सलग चित्रिकरण करणे सोपे जाते. राजस्थान, उत्तर प्रदेश असो वा किनाऱ्यालगतची केरळासारखी राज्ये असोत इथले वातावरण एकतर एकदम थंड असते किंवा अगदी गरम असते. त्यामुळे सलग चित्रिकरण तिथे शक्य होत नाही, त्याउलट मुंबईत आणि महाराष्ट्रात सगळीकडे चित्रिकरण करणे सहजशक्य होत असल्याने चित्रपटसृष्टी इथे स्थिरावली, असे निर्मात्यांनी म्हटले आहे. निर्मात्यांप्रमाणेच मुळात उत्तरप्रदेश आणि देशाच्या इतर भागातून आलेले अनेक कलाकार, तंत्रज्ञ आज मुंबईत काम करत आहेत. त्यांच्या मते इथे इतक्या समृध्दपणे हा व्यवसाय वसलेला आहे. इथे काम करण्यासाठी आपले गाव, घर सोडून गेली कित्येक वर्ष आम्ही मुंबईतच स्थिरावलो. आता पुन्हा कामासाठी म्हणून उत्तरप्रदेशात जाण्यात आम्हाला रस नाही. इथेच कामाच्या संधी आणि चित्रिकरण वाढायला हवे, अशी अपेक्षा ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी व्यक्त केली.

चित्रपटसृष्टी म्हणजे एखादा गाडी किंवा व्यवसायाचा इथून दुसरीकडे हलवता येईल असा प्रकल्प नाही. त्यामुळे इथून चित्रपटसृष्टी उत्तरप्रदेशात हलवणार या म्हणण्यात काहीच तथ्य नसल्याचे ट्रेड विश्लेषक कोमल नहाटा यांनी स्पष्ट केले. शिवाय, योगी आदित्यनाथ यांनी आम्ही काही घेऊन जायला आलेलो नाही, असे स्पष्ट केले आहे याकडे लक्ष वेधताना सध्या आपल्याकडे ज्या वेगाने चित्रपट आणि वेबमालिकांची निर्मिती होते आहे ते पाहता उत्तरप्रदेशप्रमाणे आणखी काही ठिकाणी फिल्मसिटी प्रकल्प उभे राहिले तरी काही फरक पडणार नाही, उलट निर्मात्यांना फायदाच होईल, असे मत नहाटा यांनी व्यक्त केले. मात्र उत्तरप्रदेशात अद्ययावत फिल्मसिटी उभी राहिली तरी जोपर्यंत चित्रिकरणासाठी तिथे भरघोस सवलत आणि अनुदान दिले जात नाही तोवर निर्माते तिथे जाणार नाहीत, असेही नहाटा यांनी स्पष्ट केले. आपल्याकडे मुंबईतच चित्रिकरण होते असे नाही. हैदराबादामध्ये रामोजी फिल्मसिटी उभी राहिल्यावर तिथेही चित्रिकरण केले जाऊ लागले. आताही आमच्या तीन चित्रपटांचे सेट्स रामोजी फिल्मसिटीमध्ये लागले आहेत. मात्र त्यामुळे मुंबईतील व्यवसायावर काही फरक पडलेला नाही. हा शेवटी सगळा सोयीसुविधा आणि सवलतींचा खेळ आहे, असे चित्रपट वितरक आणि निर्माते मुरली छटवानी सांगतात. उत्तरप्रदेशमध्ये यापूर्वी अनेकदा हिंदी चित्रपटांचे चित्रिकरण झालेले आहे. तिथे चित्रित झालेल्या काही हिंदी चित्रपटांना उत्तरप्रदेश सरकारने अनुदानही दिलेले आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीचा ‘बाबुमोशाय बंदुकबाज’ हा चित्रपट तिथे चित्रित झाला होता आणि त्यासाठी चित्रपटाला काही लाख रक्कमेचे अनुदानही मिळाले होते.

खरोखरच एनसीआर परिसरात उभ्या राहणाऱ्या या फिल्मसिटीकडे हिंदी चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करायचे असेल तर त्यांना चित्रिकरणासाठी भरघोस आर्थिक सवलती देणे बंधनकारक ठरणार आहे, असे कोमल नहाटा सांगतात. अनेक देश अशाप्रकारे चित्रिकरणासाठी निर्मात्यांना आर्थिक सवलती देतात. मालदीव, फिनलंड, युके अशा अनेक देशांमध्ये चित्रिकरणासाठी मोठय़ा प्रमाणावर अनुदान दिले जाते. त्यामुळे अनुदानाच्या रक्कमेत वाढ आणि मजबूत पायाभूत सुविधा असतील तरच निर्माते तिथे चित्रिकरणासाठी प्राधान्य देतील. अन्यथा महाराष्ट्रात सगळीकडे चित्रिकरण होते, असे नहाटा यांनी सांगितले. तर उत्तरप्रदेशातच चित्रिकरण करून आता प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ’इंदु की जवानी’ या चित्रपटाच्या निर्मात्या मोनिषा अडवाणी यांच्या मते दिग्दर्शक त्याच्या कथेच्या गरजेनुसार चित्रिकरण स्थळांची निवड करतो. ‘इंदु की जवानी’ची कथाच उत्तरप्रदेशमध्ये घडणारी असल्याने आम्ही तिथे चित्रिकरण केले. याआधी जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ची कथा मुंबईतलीच असल्याने हा संपूर्ण चित्रिपट आम्ही मुंबईतच केला होता, असे अडवाणी यांनी सांगितले. ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटाच्या निर्मितीचा किस्साही त्यांनी सांगितला. कुवैतमधील भारतीयांच्या संघर्षांची कथा सांगणारा हा चित्रपट अबुधाबीत चित्रित करावा, असा खूप आग्रह झाला, पण त्याऐवजी आणखी वेगळी आणि वास्तव वाटावी अशी जागा आम्हाला हवी होती. आम्ही हा चित्रपट अरब अमिरातीच्या राजधानीत रस-अल-खैमा येथे चित्रित केला. त्यामुळे दिग्दर्शकाला त्याची कथा जिथे घडते आहे तिथे किंवा त्याच्याशी जास्तीत जास्त साधर्म्य साधणाऱ्या परिसरात चित्रिकरण करणे गरजेचे असते. आणि ही गरज एखाददुसऱ्या फिल्मसिटीकडून भागवण्यापेक्षा राज्या-राज्यातून पाठिंबा मिळाला पाहिजे. हल्ली सेल्यूलॉईडवर आपले राज्य चित्रित झाले तर ते लाखो लोकांपर्यंत पोहोचते हे लक्षात आलेल्या राजस्थानसारख्या अनेक राज्यांनी चित्रपट निर्मात्यांना सहकार्य दिले असल्याचेही मोनिषा अडवाणी यांनी सांगितले.