अभिषेक तेली  

अभिनयाचे बाळकडू पाजणारी कार्यशाळा म्हणून प्रामुख्याने ‘बालरंगभूमी’कडे पाहिले जाते. ‘बालरंगभूमी’ ही एक सर्वगुणसंपन्न कलाकार घडविण्याची पहिली पायरी असते. काळानुरूप बालरंगभूमीनेही अनेक स्थित्यंतरे पाहिली, त्यात विविधांगी बदल होत गेले. वैविध्यपूर्ण विषय बालरंगभूमीच्या माध्यमातून मांडण्यात आले. प्रायोगिक, व्यावसायिक नाटय़सृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी रंगभूमीच्या माध्यमातून काही विशेष प्रयत्न केले जात आहेत का? बालनाटय़ांचा मुलांच्या विकासासाठी कशाप्रकारे वापर केला जातो, या बाबींचा बालदिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट

काळानुरूप बालरंगभूमीने अनेक स्थित्यंतरे पाहिली आणि नाटय़चळवळीही उभ्या राहिल्या. या नाटय़चळवळीच्या माध्यमातून बालरंगभूमीवर नाटय़कला नव्या पद्धतीने सादर होऊ लागली आणि हळहळू ती लहान मुलांच्या मनात रुजण्यास मदत झाली. त्यापैकीच बालरंगभूमीशी निगडित एक नाटय़चळवळ म्हणजे  ‘ग्रिप्स थिएटर’. ‘ग्रिप्स थिएटर’ हे मूळचं जर्मनीतील. ‘ग्रिप्स थिएटर’ची संकल्पना भारतातही चांगली रुजली असून महाराष्ट्रात प्रामुख्याने तिचा वापर केला जातो आहे.  ‘ग्रिप्स थिएटर’मध्ये लहान मुलांना सोबत घेऊन नाटय़सादरीकरण केले जात नाही, तर लहान मुलांना प्रेक्षक म्हणून केंद्रस्थानी ठेवले जाते.

‘लहान मुलांच्या भावविश्वातील नाटकं, त्यांना पडणारे प्रश्न आणि त्यांचे जग उलगडणारी नाटकं ‘ग्रिप्स थिएटर’च्या माध्यमातून सादर केली जातात. ‘ग्रिप्स थिएटर’ची नाटय़चळवळ लहान मुलांमध्ये कलाकार म्हणून नाही तर प्रेक्षक म्हणून अनेक पिढय़ा रुजलेली आहे. १९८६ सालापासून ही नाटय़चळवळ सुरू आहे. कल्पनारम्य, भूताखेतांच्या गोष्टी यापलीकडे जाऊन वेगळय़ा प्रकारच्या नाटकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न ‘ग्रिप्स थिएटर’ने केला आहे’, असं अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी सांगितलं. सध्याच्या काळातील मुले ही तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने खूपच पुढे असून त्यांची विचारशक्तीही वेगळी आहे. आजच्या पिढीला इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील आशय सहज पाहायला मिळतो आहे. परिणामी त्यांची दृश्यसाक्षरता खूपच वाढलेली आहे. त्यामुळे सध्याच्या युगात मुलांसाठी नाटक करताना त्यांच्या कल्पनेच्या आणि अपेक्षेच्या पलीकडे जाऊन नाटय़सादरीकरण करण्यासह त्यांना खिळवून ठेवणं आवश्यक आहे. आता आशय आणि सादरीकरणाच्या अनुषंगाने आव्हान निर्माण झालं आहे. वेगळय़ा प्रकारची मांडणी व आशय असणं ही काळाची गरज आहे’, असं मत विभावरी देशपांडे यांनी व्यक्त केलं. 

‘नाटय़ शाला’ ही संस्था १९८१ सालापासून म्हणजेच गेल्या ४२ वर्षांपासून कर्णबधिर, मूकबधिर, अंध, गतिमंद, मतिमंद आदी सर्व प्रकारच्या दिव्यांग मुलांसाठी संगीत, नृत्य, नाटय़ आणि इतर कलांच्या माध्यमातून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास कसा घडवता येईल व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कसं आणता येईल, यासाठी कार्यरत आहे. नाटय़शालेचा हा अनोखा प्रयोग सर्वाच्याच पसंतीस पडला आहे. आजवर नाटय़शालेने ‘भरारी’, ‘शहाणपण देगा देवा’ आदी ८० ते ८५ बालनाटय़ांची निर्मिती केली असून संपूर्ण भारतभर सतराशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. पथनाटय़ाचेही सादरीकरण करण्यात आले आहे. शाळा, नाटय़गृह, ग्रामीण व शहरी भाग आणि विविध महोत्सवांमध्ये हे प्रयोग करण्यात आले आहेत. नाटय़शालेअंतर्गत दिव्यांग मुलांच्या कार्यशाळा घेण्यासह शिक्षकांच्या कार्यशाळाही घेण्यात आल्या आणि त्यांना नाटय़कलेसंबंधित प्रशिक्षण दिले गेले.  मुळात या मुलांना नाटक सादर करणं शक्य आहे हे नाटय़ शाला या संस्थेनं प्रत्यक्ष सिद्ध केलं आहे.

‘नाटय़ शाला’च्या कांचन सोनटक्के सांगतात, ‘सुरुवातीला ‘नाटय़ शाला’अंतर्गत दिव्यांग मुलांची कार्यशाळा घेत त्यांना या माध्यमाबाबत समजावून सांगितलं. त्यानंतर मुलांसोबत छोटय़ा नाटुकल्या बसविल्या आणि त्याचे प्रयोग केले. या सर्व दिव्यांग मुलांना मोठमोठय़ा नाटय़गृहांमध्ये नेऊन नाटय़ सादरीकरणही केलं आणि त्यांना नाटकंही दाखविली. तर शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळांच्या माध्यमातून साडेसात हजारांहून अधिक शिक्षक तयार झाले. पुढे या शिक्षकांनी वर्गावर्गामध्ये नाटकं बसविली. या सर्वाना प्रोत्साहन देण्यासाठी नाटय़ स्पर्धाही घेतली. याद्वारे ज्या नाटय़संहिता तयार व्हायच्या, तिची आम्ही पुस्तकं छापली आणि त्याचे संग्रहही तयार झाले. ही पुस्तकं शिक्षकांनाही देण्यात आली. मूकनाटय़ाचीही संहिता लिहिली जायची. आम्ही विशेषत: इतिहास, भूगोल विषयांवर आणि नीतिमूल्यांवर आधारित नाटकं केली. माझ्यासोबत अरुण मडकईकर, शिवदास घोडके, देवेंद्र शेलार या मंडळींनीही काम केले, या सर्वाचं हे श्रेय आहे.’ तर ‘नाटय़ शाला’चे अरुण मडकईकर यांच्या मते,  ‘गेल्या ४२ वर्षांपासून मी ‘नाटय़ शाला’ या संस्थेचा सचिव म्हणून कार्यरत आहे. या नाटय़चळवळीमुळे दिव्यांग मुलांचा झालेला व्यक्तिमत्त्व विकास हा अत्यंत अभूतपूर्व आहे’.

बालरंगभूमीवर विविध प्रयोग आणि नाटय़चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यही घडते आहे. विविध विषयांद्वारे समाजप्रबोधन केले जाते. त्यामुळे एक चांगला समाज, भविष्यातील उत्तम कलाकार आणि सुजाण प्रेक्षक घडविण्यासाठी बालरंगभूमीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असा सूर रंगकर्मीमध्ये पाहायला मिळतो आहे.

बालरंगभूमीला मुख्य प्रवाहात स्थान मिळणं आवश्यक

बालरंगभूमीला मुख्य प्रवाहात स्थान मिळणं अत्यंत आवश्यक आहे. जसं युरोपियन देशांमध्ये बालरंगभूमीला अत्यंत गांभीर्याने घेतलं जातं. त्याठिकाणी बाल रंगभूमीसाठी स्वतंत्र नाटय़गृह, कलाकार, लेखक, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, तंत्रज्ञ असतात. आपली यंत्रणा व नाटकाची पद्धत वेगळी असल्यामुळे युरोपियन देशांप्रमाणे आपल्याला व्यवस्था उभी करणं शक्य नाही, पण बालरंगभूमी हा अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय आहे, हे रंगकर्मी, प्रेक्षक आणि संबंधित यंत्रणांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण तुम्ही बालरंगभूमीवर विविध विषयांच्या माध्यमातून जे मुलांसमोर सादर करता, त्या पद्धतीने मुलं घडतात. लहान मुलं ही कोणत्याही समाजाचं भविष्य असतात, त्यामुळे लहान मुलं काय पाहत, वाचत मोठी होतात हे खूप महत्त्वाचं आहे, असं मत अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी व्यक्त केलं.

‘ . . . तरच नाटय़चळवळ अधिक बळकट होईल’

विविध संस्था, केंद्र तसंच राज्य शासन आणि इतर एनजीओच्या सहकार्याने काम करत असताना करोना ही वैश्विक आपत्ती आली आणि या नाटय़कार्यास उतरती कळा लागली. शासनाकडून प्राप्त होणारं अनुदान थांबलं आणि जे दिव्यांग व सर्वसाधारण कलाकार बालनाटय़ासाठी दरमहा मानधनावर काम करत होते, त्यांची कुचंबणा झाली. आम्ही अजूनही शासनाच्या वार्षिक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहोत. सध्या प्रयोग खर्च परवडत नाही. त्यामुळे आमच्या प्रयोगाचा अनुभव लक्षात घेऊन जे काही प्रयोग मिळत आहेत आणि जिथे करणं शक्य आहे तिथे नाटय़प्रयोग करीत आहोत. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने दरमहा प्रयोगांच्या अनुषंगाने आर्थिक मानधन दिलं, तर नाटय़चळवळ अधिक बळकट होईल’, असं मत ‘नाटय़शाला’चे अरुण मडकईकर यांनी व्यक्त केलं.